India On Pakistan Nuclear Testing : ट्रम्पनी पाकिस्तानच्या गुप्त अणवस्त्र चाचण्यांचा पर्दाफाश केल्यानंतर त्यावर भारताची पहिली प्रतिक्रिया
India On Pakistan Nuclear Testing : : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बोलता, बोलता पाकिस्तानच्या अणवस्त्र चाचण्यांबद्दल मोठा खुलासा केला. ते म्हणाले की, पाकिस्तानच्या गुप्तपणे अणवस्त्र चाचण्या सुरु आहेत. त्यावर आता भारताने प्रतिक्रिया दिली आहे.

पाकिस्तानच्या अणवस्त्र चाचण्या उघड झाल्यानंतर शुक्रवारी भारताने जोरदार हल्लाबोल केला. गुप्त आणि बेकायद अणवस्त्र कार्यक्रम चालवणं हा पाकिस्तान इतिहास राहिला आहे, असं भारताने म्हटलं. “अनेक दशकांची तस्करी, निर्यात नियमांचे उल्लंघन, गुप्त पार्टनरशिप आणि एक्यू खान नेटवर्क हा पाकिस्तानच्या अणवस्त्र कार्यक्रमाचा इतिहास आहे” असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल साप्ताहिक पत्रकार परिषदेत म्हणाले. पाकिस्तान गुप्तपणे अणवस्त्र चाचण्या करत आहे, असं अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतच विधान केलं होतं. त्यावर रणधीर जैस्वाल यांना पत्रकारांनी विचारलं असता, त्यांनी हे उत्तर दिलं.
पाकिस्तानचा हा जो रेकॉर्ड आहे, त्याकडे भारताने नेहमीच आंतरराष्ट्रीय समुदायाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलाय असं जैस्वाल यांनी सांगितलं. CBS News ला ट्रम्प यांनी रविवारी इंटरव्यू दिला. त्यात त्यांनी पाकिस्तानच्या अणवस्त्र चाचण्यांचा खुलासा केला. “रशिया, चीन टेस्ट करतायत. पण ते या बद्दल बोलत नाहीत. आपण एक ओपन सोसायटी आहोत, आपण या बद्दल बोलतो, कारण आपल्याकडे प्रेस स्वतंत्र आहे” असं ट्रम्प म्हणाले. “आम्ही टेस्ट करणार, कारण ते करत आहेत. उत्तर कोरियाची टेस्टिंग सुरु आहे. पाकिस्तान सुद्धा टेस्ट करतोय” असं ट्रम्प म्हणाले. रशियाच्या नव्या अणवस्त्रांच्या चाचणीनंतर पुन्हा 30 वर्षांनी अमेरिकेच्या अणवस्त्र परीक्षणाच्या निर्णयाबद्दल विचारण्यात आलं, त्यावेळी त्यांनी हे उत्तर दिलं.
पाकिस्तानचं यावर काय म्हणणं?
“रशियाने घोषणा केलीय की ते परीक्षण करणार. उत्तर कोरिया सतत टेस्ट करतोय. अन्य देशही मागे नाहीत. फक्त आपणच टेस्ट करत नाहीय. आपण अणवस्त्रांची चाचणी न करणारा देश बनून राहू नये” असं ट्रम्प म्हणाले. ट्रम्प यांचा दावा पाकिस्तानने मात्र फेटाळून लावला. ‘आम्ही अणवस्त्र चाचण्या करणारे पहिले नाहीत आणि आम्ही पुन्हा पहिली सुरुवात करणार नाही’ अशी प्रतिक्रिया पाकिस्तानने दिली. पाकिस्तानला अणवस्त्राची खूप खुमखुमी आहे. भारताबरोबर वाद झाल्यानंतर पाकिस्तानकडून नेहमीच अणवस्त्र वापरण्याची पोकळ धमकी दिली जाते.
