भारत-पाक युद्धविराम ट्रम्प यांच्यामुळेच? परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे अमेरिकेत मोठे वक्तव्य
India-Pakistan Ceasefire : भारत आणि पाकिस्तानमधील तणाव संपून आता दोन महिने होतील. पण हा तणाव कोणामुळे संपला याचा श्रेयवाद अजून संपलेला नाही. त्यावर परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी मोठे वक्तव्य केले आहे.

भारत आणि पाकिस्तानमध्ये चार दिवस तणाव होता. या दोन्ही देशात युद्ध विराम केल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता. पण दोन्ही देशांनी ट्रम्प यांचा दावा खोडला होता. दोन्ही देशातील तणाव निवळून आता दोन महिने होत आले आहेत. पण भारत आणि पाकिस्तानमधील युद्धविराम कोणामुळे झाला याविषयीच्या चर्चा सुरूच आहे. आता अमेरिकेच्या दौर्यावर असताना परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी मोठा दावा केला आहे.
काय म्हणाले परराष्ट्रमंत्री?
परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी भारत-पाकिस्तानच्या युद्धविरामावर माध्यमांना माहिती दिली. अमेरिकेची राजधानी वाश्गिंटन डीसीमध्ये क्वाड देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या संमेलनानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. त्यावेळी झाले, त्याचे रेकॉर्ड एकदम स्पष्ट आहेत. युद्ध विराम दोन्ही देशांतील DGMO मधील चर्चेनंतर झाले हे अगदी स्पष्ट असल्याचे रोखठोक उत्तर एस. जयशंकर यांनी दिले.
त्यामुळे भारताने अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा युद्धविराम घडवून आणल्याचा दावा पुन्हा एकदा खोडून काढला आहे. भारताने वारंवार जागतिक मंचावर ही बाब स्पष्ट केली आहे. तरीही ट्रम्प हा युद्धविरामाचे क्रेडिट घेण्याचा मोह आवरत नसल्याचे समोर आले आहे. भारत आणि पाक या अणूशस्त्र बाळगणाऱ्या दोन देशातील युद्ध आपल्यामुळे थांबले, असा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता.
भारत आणि पाकिस्तानमधील डीजीएमओमध्ये चर्चा झाली त्यावेळी अमेरिकन प्रशासनाशी संपर्क साधण्यात आला होता का? त्यावेळी व्हाईट हाऊसने मध्यस्थी केली होती का, अशी विचारणा करण्यात आली होती. ऑपरेशन सिंदूर विषयी पाकिस्तानची अमेरिकेच्या संबंधाने काही भूमिका आहे का, असे प्रश्न परराष्ट्र मंत्र्यांना विचारण्यात आले होते. त्यावर त्यांनी देशाची बाजू मांडली.
ट्रम्प यांनी केले होते ट्वीट
एप्रिल महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला होता. 22 एप्रिल रोजीच्या हल्ल्यात 26 निरपराध पर्यटक ठार झाले होते. त्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर अतंर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्तमधील दहशतवादी ठिकाणांवर हल्ला केला होता. तीन दिवस दोन्ही देशात ड्रोन आणि क्षेपणास्त्र डागण्यात आली. भारताने 9-10 रोजी पाकिस्तानमधील एअरबेसवर हल्ला चढवला होता. त्यानंतर दोन्ही देशात युद्ध विरामावर सहमती झाली.
दोन्ही देशात युद्ध विरामाची अधिकृत माहिती डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करून दिली होती. त्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या होत्या. विशेष म्हणजे त्यानंतर दोन्ही देशांनी युद्धविरामाबाबत भूमिका जाहीर केली होती. त्यानंतरही त्यांनी माध्यमांसमोर आपल्यामुळेच हे सर्व घडून आल्याचा दावा केला होता.
