Iran Israel War: आता बस्स…, खामेनींचा थेट डोनाल्ड ट्रम्प यांना इशारा, अमेरिकेचं टेन्शन वाढलं
इराण आणि इस्रायलमध्ये युद्ध सुरू आहे. अमेरिकेने या युद्धात उतरण्याची धमकी दिली होती. मात्र आता इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी अमेरिका आणि इस्रायल दोन्ही देशांना गंभीर इशारा दिला आहे.

इराण आणि इस्रायलमध्ये युद्ध सुरू आहे. दोन्ही देशांकडून आत्मघाती हल्ले होत आहे. आता अमेरिकेनेही या युद्धात उतरण्याची धमकी दिली आहे. मात्र या धमकीला न जुमानता 86 वर्षीय इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी अमेरिका आणि इस्रायल दोन्ही देशांना गंभीर इशारा दिला आहे.
खामेनींचा अमेरिकेला इशारा
इराणी सरकारी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, खामेनी यांनी म्हटले की, “इराण कोणत्याही लादलेल्या युद्धापुढे झुकणार नाही आणि लादलेला कोणताही शांतता करार स्वीकारणार नाही. तसेच अमेरिकेने कोणताही लष्करी हस्तक्षेप केला तर त्याचे परिणाम खूप वाईट होतील, जे कधीही भरून काढता येणार नाहीत.” खामेनी यांच्या या इशाऱ्यामुळे अमेरिकेची चिंता वाढण्याची शक्यता आहे.
इस्रायललाही इशारा दिला
अयातुल्ला अली खामेनी इस्रायललाही इशारा दिला आहे. खामेनी म्हणाले की, ‘इस्रायलने इराणी हवाई हद्दीत घुसून मोठी चूक केली आहे. ही इराणची रेड लाइन आहे आणि जो कोणी ती ओलांडेल त्याला माफ केले जाणार नाही. या चुकीची मोठी किंमत इस्रायलला मोजावी लागेल.’ त्यामुळे आता आगामी काळात इराणकडून इस्रायलवर आणखी मोठा हल्ला होण्याची शक्यता आहे.
जनतेचे रक्त व्यर्थ जाणार नाही – खामेनी
खामेनी यांनी म्हटले की, ‘इस्रायली हल्ल्यांनंतर लोकांचा संयम आणि धाडस आमच्या राष्ट्रीय ताकदीचे प्रतीक आहे.’ पुढे बोलताना खामेनी यांनी देशवासीयांना एकजूट राहण्याचे आवाहन केले आणि शहीदांचे रक्त व्यर्थ जाणार नाही असंही विधान केले आहे.
डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले होते?
डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल प्लॅटफॉर्मवर लिहिले होते की, ‘इराणचा सर्वोच्च नेता कुठे लपला आहे हे आम्हाला माहिती आहे. ते आमच्यासाठी एक सोपे टार्गेट आहे, पण तिथे ते सुरक्षित आहे. आम्ही त्यांनी तिथून बाहेर काढणार नाही. आम्ही त्यांना आत्ताच मारणार नाही. पण आम्हाला नागरिकांवर किंवा अमेरिकन सैनिकांवर क्षेपणास्त्रे डागायची नाहीत. आमचा संयम संपत चालला आहे.’
डोनाल्ड ट्रम्प यांचा प्लॉन काय?
अमेरिकन सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रम्प आणि त्यांचे सल्लागार सध्या इस्रायलसह इराणी अणु तळांवर हल्ला करण्याच्या विचारात आहेत. मात्र अद्याप यावर कोणताही अधिकृत निर्णय झालेला नाही. तसेच संयुक्त राष्ट्रांमधील इराणचे राजदूत अली बहरेनी म्हटले की, ‘अमेरिकेने थेट हल्ल्यात भाग घेतला तर इराण प्रत्युत्तर देईल.’
