इराण-इस्राईल युद्ध पुन्हा पेटणार! गाझा मिशनवरून डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर खामेनेईंची पहिली प्रतिक्रिया
गाझावरील हल्ल्यानंतर इस्राईलवर चोहूबाजूने टीका होत आहे. दुसरीकडे, डोनाल्ड ट्रम्प या वादात आपली पोळी भाजण्यात गुंग आहेत. त्यामुळे हे प्रकरण चिघळण्याची शक्यता आहे. ट्रम्प यांनी हमासला धमकी दिल्यानंतर इराणने आक्रमक भूमिका घेतली आहे.

इस्राईलने गाझावर जोरदार हल्ला चढवला आहे. इस्राईलने गाझावर ऑक्टोबर 2023 पासून हल्ले सुरुच आहेत. पण आता नेतान्याहू यांनी गाझा शहर कायमचे ताब्यात घेण्याचे आवाहन केले आहे. तिथल्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी इस्रायलकडे असेलस असंही त्यांनी विधान केलं. त्यामुळे 7 सप्टेंबरपासून इस्राईलने जोरदार हल्ला चढवला आहे. त्यामुळे इस्राईलवर जगभरातून टीका होत आहे. मात्र टीकाकारांना केराची टोपली दाखवत इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी आक्रमक बाणा कायम ठेवला आहे. नेतन्याहू यांनी स्पष्ट केलं की, या टीकांचा आमच्यावर काही एक फरक पडणार नाही आणि आम्ही विजय निवडू. दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर त्यांनी केलेलं विधान महत्त्वाचं ठरत आहे. गाझामध्ये मोठ्या प्रमाणात जीवित आणि मालमत्तेचं नुकसान झाल्यानंतर ट्रम्प यांनी हे विधान केलं होतं. इस्रायलच्या युद्धात आतापर्यंत 64 हजारांहून अधिक पॅलेस्टिनींनी आपले प्राण गमावले आहेत. डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते की, इस्राईल गाझातील युद्ध जिंकत असेल, पण जनसंपर्कात हरत आहे. एक प्रकारे या युद्धात अमेरिकेने इस्राईलला अप्रत्यक्षपणे पाठिंबाच दिल्याचं बोललं जात आहे.
अमेरिकेच्या भूमिकेनंतर इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाअली खामोनी यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. खामेनी यांनी ‘इस्रायली हल्ल्याला विरोध करणाऱ्या सर्व गैर-मुस्लिम आणि मुस्लिम देशांना’ इस्रायलच्या विनाशकारी गुन्ह्यांना तोंड देण्यासाठी त्यांच्याशी त्यांचे व्यावसायिक आणि राजकीय संबंध संपवण्याचे आवाहन केले. खामोनी यांनी सोशल मीडियावर ही प्रतिक्रिया दिली आहे. ‘इस्रायल कोणतीही लाज न बाळगता मोठे गुन्हे आणि धक्कादायक विनाश करत आहे. जरी हे गुन्हे अमेरिकेसारख्या शक्तिशाली देशाच्या पाठिंब्याने केले जात असले तरी, त्याचा प्रतिकार करण्याचा मार्ग बंद झालेला नाही.’, असंही त्यांनी पुढच्या पोस्टमध्ये म्हंटलं आहे.
Islamic and non-Islamic countries that oppose Zionist regime’s crimes, especially Islamic countries, must completely sever their commercial ties and even cut off political relations as well.
— Khamenei.ir (@khamenei_ir) September 7, 2025
इराणच्या सर्वोच्च नेत्याच्या या प्रतिक्रियेनंतर हा वाद आणखी विकोपाला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. इस्रायली सैन्याचा दाव्यानुसार मागच्या आठवड्यातील कारवाईत गाझा शहराच्या बाहेरील भाग ताब्यात घेतला आहे.शहराचा फक्त दाट लोकवस्तीचा मध्य भाग त्यांच्या नियंत्रणाखाली राहिला आहे, असंही सांगितलं आहे. त्यामुळे इराण आणि इस्राईल पुन्हा एकदा आमनेसामने येण्याची शक्यता आहे. इस्राईलने गाझा मिशनमधून माघार घेतली नाही तर इराण या युद्धात उतरण्याची शक्यता आहे. त्यामुळे इस्राईल आणि इराण यांच्या पुन्हा एकदा संघर्ष होण्याची शक्यता आहे.
