इराणच्या अण्वस्त्र केंद्रावर इस्त्रायलच्या बॉम्ब हल्ल्यानंतर भीषण स्फोट, परिसरात भूकंपाचे धक्के
Iran Israel War: कोम शहरापासून २० किलोमीटर अंतरावर स्फोटांचे मोठे आवाज आले. या स्फोटानंतर भूकंप आला. इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी इराणवर हल्ले सुरुच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

Iran Israel War: इस्त्रायलने इराणाच्या अण्वस्त्र केंद्रांवर जोरदार हल्ले केले आहेत. यामुळे इराणमधील फोर्डो अण्वस्त्र केंद्रावर जोरदार स्फोट झाले. त्याचे आवाज परिसरात अनेक किलोमीटरपर्यंत ऐकू आले. त्यानंतर या परिसरात भूकंपाचे धक्के जाणवत आहे. या ठिकाणी आलेल्या भूकंपाची तीव्रता २.५ रिश्टर स्केल होती. इस्त्रायलने केलेल्या हल्ल्यानंतर झालेल्या जोरदार स्फोटामुळे भूकंप आल्याचे म्हटले जात आहे. इराणनेही पलटवार करत इस्त्रायलवर १०० क्षेपणास्त्र डागली आहेत.
फोर्डो अणू उर्जा केंद्र लक्ष्यावर
इस्त्रायल आणि इराण यांच्यातील युद्ध सोमवारी चौथ्या दिवशीही सुरु होते. सोमवारी इस्त्रायलकडून इराणच्या फोर्डो अणू उर्जा केंद्रावर हल्ला करण्यात आला. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, फोर्डो अणुऊर्जा केंद्राभोवती अनेक स्फोटांचे आवाज ऐकू आले आणि जमिनीत भूकंपासारखे जोरदार कंपने जाणवली. सोमवारी इराणकडूनही इस्त्रायलवर क्षेपणास्त्र डागण्यात आले.
इराण इंटरनॅशनलकडून एक्सवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. त्यात म्हटले की, कोम शहरापासून २० किलोमीटर अंतरावर स्फोटांचे मोठे आवाज आले. या स्फोटानंतर भूकंप आला. त्या स्फोटात आणि भूकंपात किती नुकसान झाले, त्याची माहिती मिळाली नाही. परंतु फोर्डो अणू उर्जा केंद्राचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
Witness reports suggest several loud explosions near the Fordow nuclear site, with noticeable ground tremors.
This video appears to show the blasts around 20 kilometers from the city of Qom.pic.twitter.com/k6DTY1kh8j
— Iran International English (@IranIntl_En) June 15, 2025
नेतन्याहू यांचा हल्ले सुरुच ठेवण्याचा निर्धार
इराण आणि इस्त्रायल दरम्यान शुक्रवारपासून युद्ध सुरु आहे. इस्त्रायलने शुक्रवारी पहाटे इराणावर जोरदार हल्ले केले होते. त्यात इराणचे आर्मी चीफ, कमांडर आणि दोन अणू शास्त्रज्ञाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर इराणकडूनही या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यात आले. गेल्या चार दिवसांपासून दोन्ही देशांकडून एकमेकांवर हल्ले सुरु आहेत. इस्त्रायलमध्ये इराणच्या हल्लामुळे नुकसान झाले आहे. इराण आणि इस्त्रायल दोन्ही देश मागे हटण्याच्या तयारीत नाही. इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी इराणवर हल्ले सुरुच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. जोपर्यंत इराणची अणू उर्जा केंद्र पूर्ण नष्ट होणार नाही, तोपर्यंत हल्ले करण्यात येणार असल्याचे नेतन्याहू यांनी म्हटले आहे.
