Isreal-Iran War : ट्रम्प यांचा मोहभंग! शांतीदूत म्हणून मिरवण्याचे स्वप्न भंगले; मित्र इस्त्रायलचा मोठा झटका
Israel Iran War : इस्त्रायलने इराणच्या लष्करी आणि अणूप्रकल्पावर हल्ला केला. या हल्ल्यांना इस्त्रायलने रायझिंग लॉयन असे नाव दिले. यामुळे मध्य-पूर्वेत वातावरण पुन्हा अशांत झाले. तर दुसरीकडे ट्रम्प यांचा पण मोहभंग झाला.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या दुसर्या कार्यकाळाच्या सुरुवातीलाच जागतिक मंचावर मोठी भूमिका निभावली. आपण ‘शांतीदूत’ असल्याचा त्यांचा आविर्भाव अनेक जागतिक मंचावर दिसून आला. भारत-पाक तणाव असो वा युक्रेन-रशिया युद्ध असो ट्रम्प यांनी मध्यस्थीची भूमिका काही सोडलेली नाही. पण या शांतीदूताला त्यांचा घनिष्ठ मित्र इस्त्रायलने पहिला झटका दिला. तर त्यापूर्वी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतीन यांनी सुद्धा त्यांचा मोहभंग केला होता. युक्रेन युद्धला विराम देण्याचे ट्रम्प यांचे कुटनीती प्रयोग रशियाच्या ताज्या हल्ल्यामुळे काही फळाला आले नाही. शांतता प्रस्थापित करण्याचा ट्रम्प यांचा प्रयोग दोन्ही देशांनी धुडकावल्याने ट्रम्प सध्या खट्टू झाले आहेत.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सार्वजनिक मंचावरून इस्त्रायलला इराणवर हल्ला न करण्याची तंबी दिली होती. जगात शांतता आणण्याचे आपले प्रयत्न असल्याचे ट्रम्प त्यावेळी म्हणाले होते. पण अमेरिकेने आवाहन केल्याच्या काही तासानंतर इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी इराणच्या अणू प्रकल्पांवर हल्ल्याची घोषणा केली. त्यामुळे ट्रम्प यांच्या प्रयत्नांना पहिला झटका बसला. शांतीदूत म्हणून मिरवण्याच्या त्यांच्या स्वप्नाला त्यांचा जवळचा मित्र नेतन्याहू यांनीच सुरूंग लावला. त्यापूर्वी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी पण त्यांच्या युद्ध विरामाच्या आवाहनाला वाटण्याच्या अक्षदा लावल्या. दुसरीकडे गाझा पट्टीत इस्त्रायलचे ऑपरेशन आणि हल्ले काही थांबलेले नाहीत. त्यामुळे इस्त्रायलला आता कसं थांबवावे या चिंतेत अमेरिका आहे. तर दुसरीकडे चीनने मध्य-पूर्वेत हस्तक्षेप करण्यास सुरूवात केली आहे. चीनने इस्त्रायल-इराणमध्ये मध्यस्थीचा प्रस्ताव धाडला आहे.
ओमानमध्ये चर्चा, पण त्यापूर्वीच हल्ला
ट्रम्पचे मित्र आणि विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ युक्रेन-रशिया, इस्त्रायल-गाजा आणि इस्त्रायल-इराण या तीन संकटांत त्यांची बाजू हिरारीने मांडली. त्यांनी मध्यस्थता केली. रविवारी ओमानमध्ये इराणी अधिकाऱ्यांना ते भेटणार होते. इस्त्रायलने केलेला हल्ला एकदम धक्का देणारे होता. अमेरिकीची कुटनीती कमजोर झाल्याचेच जणू हे प्रतिक आहे. अर्थात अजूनही अमेरिकेने इस्त्रायलला एकदम मोकळं सोडलेले नाही. अमेरिका पुन्हा युद्ध भडकू नये यासाठी प्रयत्न करत असल्याचा दावा करण्यात येत आहे. पण अमेरिकेची इराणविरोधातील भूमिका पण समोर आली आहे. इस्त्रायलने केलेल्या हल्ल्याशी आपला संबंध नसल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पण असेच ट्वीट केले आहे.
