‘चिकन नेक’ जवळ बांग्लादेशाची मोठी तयारी, भारताला मोठे टेन्शन, चीन-पाकच्या इशाऱ्यावर….
भारताच्यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असलेल्या ‘चिकन नेक’ भागात बांग्लादेशाच्या हालचाली वाढल्या आहेत. त्यामुळे येथे भारताला धोका निर्माण झाला आहे.

बांग्लादेशातून मोठी बातमी समोर येत आहे. ही बातमी भारताचे डोकेदुखी वाढवणारी आहे. बातम्यानुसार बांग्लादेशातील लालमोनिरहाट एअरबेसच्या आत एक विशाल हँगरची निर्मिती बांग्लादेश करत आहे. भारताचे आता बांग्लादेशाशी पूर्वी सारखे सख्य राहिलेले नाही. बांग्लादेश पाकच्या मार्गावर आता चीनशी अधिक मैत्री संबंध प्रस्थापित करत असल्याने या पावलाकडे भारत सावधानतेने पहात आहे.
नॉर्थईस्ट न्यूजच्या बातमीनुसार लालमोनिरहाट एअरबेसच्या बांधकाम सुरु असलेले हँगर ( जेथे विमाने पार्क केली जातात ) जवळील भाग बांग्लादेशाच्या वायूसेनेने आपल्या ताब्यात घेतला आहे. या हँगरमध्ये लढाऊ विमानांना पार्क करण्यासाठी सुसज्ज केले जात आहे. १६ ऑक्टोबर रोजी बांग्लादेशच्या सैन्य दलाचे प्रमुख जनरल वकार उज जमा यांनी या एअरबेसचा दौरा केला आणि बांधकामाच्या कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला आहे. हा एअरबेस भारतासाठी अत्यंत महत्वाच्या असलेल्या ‘चिकन नेक’ म्हणजे सिलीगुडी कॉरीडॉरच्या एकदम नजिक आहे.
सीमेपासून केवळ २० किलोमीटर अंतरावर
हा नवीन हँगर बांग्लादेशाच्या एअरफोर्सच्या जुन्या J-7 लढाऊ विमानांच्या बदल्यात ताफ्यात सामील होणाऱ्या नव्या विमानांच्या पार्किंगसाठी कामाला येऊ शकतो. हा हँगर लालमोनिरहाट जिल्ह्याच्या महेंद्रनगर युनियनच्या अंतर्गत हरिभंगा गावात आहे. हे स्थान भारत-बांग्लादेशाच्या सीमेपासून केवळ २० किलोमीटर अंतरावर आहे, जे पश्चिम बंगालच्या कूच बिहार जिल्ह्याला लागून आहे. लालमोनिरहाट बांग्लादेशाच्या रंगपूर डिव्हीजनचा एक भाग आहे.
१९७१ च्या युद्धात पाकिस्तानने केला वापर
हा एअरबेस एकूण ११६६ एकर क्षेत्रात पसरलेला आहे. याचा रनवे ४ किलोमीटर लांबीचा आहे. ब्रिटीशकाळात १९३१ मध्ये स्थापित या बेसचा उपयोग १९७१ च्या युद्धात पाकिस्तानी सैन्याने केला होता. त्यानंतर हा बराच काळ हा एअरबेस विनावापर सुनसान पडला होता. या एअरबेसच्या जीर्णोद्धारामागे चीनची भूमिका असू शकते. येथे पाकिस्तान आणि चीनकडून मिळालेले जेट फायटर बांग्लादेश तैनात करु शकतो ही भारताची चिंता आहे. त्यामुळे येथे पाकिस्तानी आणि चीनच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती वाढणार आहे. त्यामुळे भारत विरोधी कारवायांचे हे केंद्र बनू शकते याची भारताला चिंता लागली आहे.
१० ते १२ जेट फायटर पार्क करता येतील
या हँगरमध्ये किमान १० ते १२ जेट फायटर पार्क करता येतील इतकी ही जागा आहे. जनरल जमा यांनी भेट दिल्यानंतर येथे छताचे काम वेगाने सुरु झाले आहे. गेल्या सहा महिन्यांपासून याचे काम सुरु होते. त्याला आता वेग आला असून चारी बाजूंनी भिंत उभारण्याचे कामही सुरु आहे. याच प्रकारे ठाकूरगाव एअरबेसच्या सुरक्षेसाठी भिंत बांधली गेली आहे. ठाकूरगाव एअरबेस ५५० एकरमध्ये पसरला आहे. येथे एक किमीचा रनवे आहे. लालमोनिरहाट पासून ठाकूरगाव एअरबेस १३५ किमीवर आहे. लालमोनिरहाट एअरबेसच्या पुनर्विकासात चीनचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात असला तरी याचा पुरावा मिळालेला नाही.
