India vs China : ..तर मैत्री राहिल बाजूला, शक्सगामवरुन भारताची चीनला थेट वॉर्निंग, या सगळ्यामागे पाकिस्तानचं कारस्थान
India vs China : आपल्या हिताच्या रक्षणासाठी आवश्यक पावलं उचलण्याचा अधिकार आमच्याकडे आहे हे भारताने स्पष्ट केलं आहे. एकप्रकारे चीनसाठी हा इशारा असून मैत्री बाजूला राहिलं असं संकेत यातून मिळतायत. हे शक्सगाम खोरं प्रकरण काय आहे. थेट भारताने इतकी रोख-ठोक भूमिका का घेतली आहे.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी चीन-पाकिस्तान सीमा करारावर एक मोठं स्टेटमेंट केलं आहे. 1963 साली झालेल्या चीन-पाकिस्तान सीमा कराराला भारताने कधी मान्यता दिली नाही. 1963 चा हा करार बेकायद आणि अमान्य आहे, ही आमची नेहमीच भूमिका राहिली आहे, असं मीडियाशी बोलताना रणधीर जैस्वाल म्हणाले. आम्ही चीन-पाकिस्तान इकोनॉमिक कॉरिडोरला सुद्धा मान्यता देत नाही. कारण हा कॉरिडोर भारतीय क्षेत्रातून जातो. त्या क्षेत्रावर पाकिस्तानने जबरदस्तीने आणि बेकायदित्या कब्जा केला आहे अशा शब्दात रणधीर जैस्वाल यांनी भारताची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, जम्मू-काश्मीर आणि लडाख संपूर्ण केंद्रशासित प्रदेश भारताचा अभिन्न आणि अविभाज्य भाग आहे. ही गोष्ट पाकिस्तानी आणि चिनी अधिकाऱ्यांना अनेकदा स्पष्टपणे सांगण्यात आली आहे. शक्सगाम खोऱ्यात जमिनी वास्तव बदलण्याच्या प्रयत्नांविरोधात भारताने चीनकडे आपला विरोध नोंदवला आहे. आपल्या हिताच्या रक्षणासाठी आवश्यक पावलं उचलण्याचा अधिकार आमच्याकडे आहे हे सुद्धा भारताने स्पष्ट केलं आहे. एकप्रकारे चीनसाठी हा इशारा असून मैत्री बाजूला राहिलं असं संकेत यातून मिळतायत.
चीन आणि पाकिस्तानने 4 जानेवारीला CPEC 2.0 ची घोषणा केली. यात दोन्ही देशांमध्ये विद्यमान आर्थिक आणि रणनितीक सहकार्याचा विस्तार होणार आहे. शक्सगाम खोऱ्यात CPEC रुटमुळे भारताच्या उत्तर सीमेवर चीन आणि पाकिस्तानची पकड अजून बळकट होईल. सियाचीन, लडाख आणि pok मध्ये सैन्य हालचाली वाढण्याची शक्यता आहे. शक्सगाममधून जाणाऱ्या CPEC मार्गाला भारत आपल्या संप्रभुतेच उल्लंघन मानतो.
1984 पासून हा भाग भारताच्या ताब्यात
भारतीय सैन्याने नई यारकंद-अघिल-शक्सगाम रस्त्यावर लक्ष दिलं आहे. कारण सियाचीन आणि साल्टोरो रिजच्या उत्तरेला जवळपास 30 ते 50 किलोमीटरच्या आसपास हा रस्ता आहे. भारतीय सॅटेलाइट इमेज एक्सपर्ट्सनुसार, G219 हायवेवरुन एक चिनी रस्ता निघतो तो खाली शक्सगामकडे जातोय. हा रस्ता इंदिरा कोलपासून जवळपास 50 किमी उत्तरेला संपतो. सियाचीन ग्लेशियरचा हा उत्तर बिंदू आहे. भारताने 1984 पासून हा भाग आपल्या ताब्यात ठेवला आहे. चीन आणि पाकिस्तानमधील CPEC प्रोजेक्टमुळे बलूचिस्तानात मोठ्या प्रमाणात अस्वस्थतता, अशांतता आहे.
