म्यानमारमध्ये परिस्थिती बिघडली, पोलिसांच्या गोळीबारात 2 आंदोलकांचा मृत्यू

म्यानमारमधील दुसऱ्या मोठ्या शहर असलेल्या मांडले इथं पोलिसांनी गोळ्या चालवल्या. या गोळीबारात दोन आंदोलकांचा मृत्यू झालाय.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 22:39 PM, 20 Feb 2021
म्यानमारमध्ये परिस्थिती बिघडली, पोलिसांच्या गोळीबारात 2 आंदोलकांचा मृत्यू

नवी दिल्ली : म्यानमारमध्ये शनिवारी परिस्थिती बिघडल्याचं चित्र पाहायला मिळालं. म्यानमार लष्कराने सत्ता ताब्यात घेतल्यानंतर सुरु झालेल्या विरोध प्रदर्शनाला आज हिंसेचं स्वरुप मिळालं. म्यानमार पोलिसांनी आंदोलकांवर रबराच्या गोळ्या चालवल्या, अश्रूधुराच्या नळकांड्या आणि पाण्याचा मारा केला. पोलिसांच्या या कारवाईत अनेक आंदोलक जखमी झाले. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, म्यानमारमधील दुसऱ्या मोठ्या शहर असलेल्या मांडले इथं पोलिसांनी गोळ्या चालवल्या. या गोळीबारात दोन आंदोलकांचा मृत्यू झालाय.(Myanmar police shoot dead two protesters)

फ्रंटियर म्यानमारच्या रिपोर्टनुसार, एका आंदोलकाच्या डोक्यात गोळी लागली आणि त्याचा जागेवरच मृत्यू झाला. तर एका आंदोलकाच्या छातीत गोळी लागली. त्याला रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जात असताना रस्त्यावरच त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी गोळीबार केल्याची घटना यदानाबोद बंदराजवळ घडल्याची माहिती मिळतेय. या ठिकाणी दिवसाही पोलिसांनी रबराच्या गोळ्या चालवल्या, अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि पाण्याचा माराही केला.

आंदोलन दाबण्यासाठी 500 पोलीस तैनात

पोलिसांनी चालवलेल्या रबराच्या गोळ्यांमुळे पाच आंदोलक जखमी झाल्याची माहिती आहे. त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. यदानाबोन बंदरावरील कर्मचारीही लष्कराच्या उठावाचा विरोध करत आहेत. त्यांचा हा विरोध दाबण्यासाठी 500 पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

म्यानमारमध्ये नेमकं काय घडलं?

म्यानमारमध्ये 8 नोव्हेंबर 2020 रोजी निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत आँग सान सू ची यांच्या नेतृत्वाखालील नॅशनल लील फॉर डेमॉक्रसी अर्थात NLD या पक्षाला अभूतपूर्व यश मिळालं. सू ची यांच्या NLD या पक्षाला 476 पैकी तब्बल 396 जागा मिळाल्या. तर लष्कराने पाठिंबा दिलेल्या युनियन सॉलिडॅरिटी अँड डेव्हलपमेंट या पक्षाला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. निवडणूक निकालानंतर मतदार याद्यांमध्ये मोठी अफरातफर झाल्यानं असा निकाल लागल्याचा दावा म्यानमारच्या लष्करानं केला होता. मात्र, याबाबत कुठलेही पुरावे नसल्याचं सांगत म्यानमारच्या निवडणूक आयोगाने हा दावा फेटाळून लावला होता. अशा परिस्थितीत आँग सान सू ची यांच्या नेतृत्वाखालील नव्या सरकारचं संसदीय सत्र 1 फेब्रुवारीपासून सुरु होणार होतं. लष्कराने पुन्हा एकदा उठाव करुन संसदीय सत्र सुरु होण्यापूर्वीच देशाची सर्व सूत्र आपल्या हाती घेतली आहेत.

लष्कराचा ताबा वर्षभरासाठी?

सू ची यांचा NLD पक्ष विजयी झाला खरा पण नोव्हेंबरमध्ये झालेल्या निवडणुकीत मोठा गैरप्रकार झाल्याचा दावा तिथल्या लष्करानं केला आहे. त्याबाबत सरकारनं कोणतंही पाऊल उचललं नाही म्हणून उठाव गरजेचा होता असं लष्कराचं म्हणणं आहे. दरम्यान, लष्करानं केल्लाय घोषणेनुसार लष्करप्रमुख जनरल मिन आँग लिन यांच्याकडे एका वर्षासाठी देशाचा कारभार असणार आहे.

संबंधित बातम्या :

Special Story | म्यानमारमध्ये लोकशाहीला सुरुंग! लष्कराचा उठाव, भारतावर काय परिणाम?

26 वर्षांची हुकूमशाही ते एका महिलेनं आणलेली लोकशाही, पुन्हा सैन्यअधिपत्याखाली गेलेल्या म्यानमारची सगळी कहाणी!

Myanmar police shoot dead two protesters