पाकिस्तानचा इराणला पाठिंबा, अमेरिकेला दिला मोठा धक्का
अमेरिकेनं इराणवर एअर स्ट्राईक केला, त्यानंतर आता पाकिस्तानकडून या एअर स्ट्राईकचा निषेध करण्यात आला आहे. अमेरिकेनं आतंरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन केल्याचं पाकनं म्हटलं आहे.

इस्रायल आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू आहे, या युद्धामुळे मध्यपूर्वेतील तणाव चांगलाच वाढला आहे, आता या युद्धात अमेरिकेची देखील एन्ट्री झाली आहे. अमेरिकेनं इराणच्या तीन प्रमुख न्यूक्लियर तळांवर हल्ला केला आहे. मोठी बातमी म्हणजे पाकिस्तानकडून अमेरिकेनं इराणवर केलेल्या या हल्ल्याचा निषेध करण्यात आला आहे. या संदर्भात पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानं आपल्या अधिकृत सोशल मिडीया पेजवर पोस्ट केली आहे. अमेरिकेनं इराणवर एअर स्ट्राईक केला, या एअर स्ट्राईकमुळे अमेरिकेकडून आतंरराष्ट्रीय कायद्याच्या सर्व नियमांचं उल्लंघन झालं आहे, इराणला देखील आपल्या सुरक्षेचा पूर्ण अधिकार आहे, असं पाकिस्तानने म्हटलं आहे.
पाकिस्तानने नेमकं काय म्हटलं?
इराण आणि इस्रायलमध्ये युद्ध सुरू आहे, त्यामुळे मध्यपूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे. आम्हाला मध्यपूर्वेची चिंता वाटते. अमेरिकेनं इराणवर केलेल्या हल्ल्यामुळे तर परिस्थिती आणखी चिंताजनक झाली आहे, आम्ही अशा हल्ल्यांचा निषेध करतो. इराणला देखील आपलं संरक्षण करण्याचा पूर्ण अधिकार आहे. अशा हल्ल्यांमुळे आंतरराष्ट्रीय कायद्यांचं उल्लंघन होत आहे, असं पाकिस्तानने म्हटलं आहे. इराण आणि पाकिस्तान हे दोन्ही शेजारी देश आहे, इराण आणि पाकिस्तानमध्ये 900 किलोमीटरची सीमा आहे. इराण आणि इस्रायने हा प्रश्न चर्चेच्या माध्यमातून सोडवावा असं आवाहनही पाकिस्तानने केलं आहे.
विशेष म्हणजे एक दिवसांपूर्वीच पाकिस्तानने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी शांततेसाठी देण्यात येणाऱ्या नोबेल पुरस्काराची मागणी केली होती. पाकिस्तान सरकारकडून 2026 साठीच्या नोबेल पुरस्कारासाठी डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाचा औपचारिकरित्या प्रस्ताव ठेवण्यात आला होता. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या संघर्षावर ज्या पद्धतीने कुटनीतीच्या माध्यमातून तोडगा काढला, त्यासाठी त्यांना शांततेसाठी देण्यात येणारा नोबेल पुरस्कार मिळायला पाहिजे. ट्रम्प यांच्या मध्यस्थीमुळेच भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम झालं आणि एक मोठं युद्ध टळलं असा दावाही यावेळी पाकिस्तानकडून करण्यात आला आहे. दरम्यान दुसरीकडे अमेरिकेनं केलेल्या या हल्ल्यानंतर आता इराणदेखील अधिक आक्रमक झाला असून, इस्रायलवर हल्ला करण्यात आला आहे.