UN Meeting: इस्रायल संतापला! पाकिस्तानची काढली लायकी, मुनीरच्या देशावर हल्ला होणार?
पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या बैठकीत इस्रायलशी पंगा घेतला आहे. या बैठकीत दोन्ही देशांच्या प्रतिनिधींमध्ये जोरदार वादविवाद झाला. त्यामुळे पाकिस्तानची चिंता वाढली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून इस्रायलने अनेक मुस्लिम राष्ट्रांवर हल्ले केले आहेत. अशातच आता पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या बैठकीत इस्रायलशी पंगा घेतला आहे. या बैठकीत दोन्ही देशांच्या प्रतिनिधींमध्ये जोरदार वादविवाद झाला. इस्रायल आणि पाकिस्तान हे दोन्ही देश अमेरिकेच्या जवळचे आहेत, त्यामुळे अमेरिका दोन्ही देशांची समजूत काढू शकते. मात्र ज्याप्रमाणे इस्रायलने गेल्या काही दिवसांपासून आक्रमक रूप धारण केले आहे, त्यामुळे आगामी काळात पाकिस्तानची चिंता वाढू शकते.
संयुक्त राष्ट्रांमध्ये कतारमध्ये हमास नेत्यांवर इस्रायलने केलेल्या हल्ल्याची चर्चा सुरु झाली होती. या चर्चेत सहभागी होताना पाकिस्तानचे प्रतिनिधी असीम इफ्तिखार अहमद यांनी इस्रायलवर ‘बेकायदेशीर आणि आक्रमक कृती केल्याचा आरोप केला. तसेच पाकिस्तानने इस्रायलवर आंतरराष्ट्रीय कायदा मोडण्याचा, गाझामध्ये बर्बर हल्ले करण्याचा आणि सीरिया, लेबनॉन, इराण आणि येमेनमध्ये हल्ले करण्याचा आरोप केला, त्यामुळे प्रकरण तापले आहे.
इस्रायलचे पाकिस्तानला प्रत्युत्तर
पाकिस्तानच्या आरोपांवर बोलताना इस्रायलचे प्रतिनिधी डॅनन यांनी पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आहे. डॅनन यांनी म्हटले की, ‘माझा उद्देश तुम्हाला दुखावणे नाही तर वस्तुस्थिती सांगणे आहे. अल-कायदाचा प्रमुख ओसामा बिन लादेन पाकिस्तानच्या भूमीवर लपून बसला होता आणि तिथेच मारला गेला हे विसरू नका. एका दहशतवाद्याला आश्रय का देण्यात आला?’ असा सवाल त्यांनी पाकिस्तानला विचारला आहे.
पुढे बोलताना डॅनन यांनी, ‘पाकिस्तान आपला इतिहास बदलू शकत नाही. 9/11 हल्ला पाकिस्तानमध्ये घडला नाही, मात्र ओसामा बिन लादेन तिथे लपून बसला होता. जेव्हा अमेरिकेने त्याला मारले तेव्हा कोणीही विरोध केला नाही. मग दहशतवाद्यांवर कारवाई केल्यामुळे इस्रायलला दोष का दिला जातो? हा दुटप्पीपणा का केला जातो?’ असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
पाकिस्तानची अडचण वाढण्याची शक्यता
पाकिस्तानने इस्रायलवर आरोप करुन नवीन संकट ओढावून घेतले आहे. सध्या इस्रायलचे लक्ष कतार, इराण आणि लेबनॉनसारख्या देशांवर आहे. मात्र आता पाकिस्तानने इस्रायलला डिवचले आहे. त्यामुळे आता इस्रायल थेट पाकिस्तानला लक्ष्य करणार तर नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र सध्या अशा हल्ल्याची शक्यता कमी आहे.
