पाकिस्तानी नेता भारतात येण्यासाठी चेकाळला, असीम मुनीरचं टेन्शन वाढलं, लष्करात दुफळी?
पाकिस्तानातील एक मोठा नेता भारतात येण्यास उत्सुक आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानातून शांतता संदेश घेऊन येण्याची या नेत्याची इच्छा आहे. या नेत्याच्या अशा भूमिकेमुळे मुनीर यांची अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरनंतर हे दोन्ही देश जागतिक पातळीवर एकमेकांचा कठोर विरोध करताना पाहायला मिळतात. विशेष म्हणजे पाकिस्तानच्या राजकारणात विशेष स्थान असलेले लष्करप्रमुख असीम मुनीर हेदेखील भारताविरोधात गरळ ओकताना पाहायला मिळतात. असीम मुनीर जरी भारताविरोधात कठोर भूमिका घेताना दिसत असले तरी दुसरीकडे मात्र पाकिस्तानातील एक नेता भारतात येण्यास उतावीळ आहे. हा नेता शांती संदेश घेऊन येण्यासाठी प्रयत्न करताना दिसतोय.
मौलाना यांची राहिलेली आहे वादग्रस्त भूमिका
या नेत्याचे नाव मौलाना फजलुर रहमान असे आहे. ते जमीयत उलेमा ए इस्लाम (एफ) या पक्षाचे प्रमुख आहेत. या नेत्याला पाकिस्तानकडून शांती संदेश घेऊन नवी दिल्लीत यायचे आहे. त्यांच्या या भूमिकेचे आता वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. मौलाना फजलुर रहमान हे पाकिस्तानातील एक मोठे नेते आहेत. ते पश्तून समुदायातून येतात. पाकिस्तानच्या राकारणात त्यांनी भूमिका नेहमीच वादग्रस्त राहिलेली आहे. कधीकाळी त्यांचे तालिबानशी जवळचे संबंध होते. याआधी त्यांनी अमेरिकेवरही सडकून टीका केलेली आहे. पाकिस्तानचा कट्टर शत्रू असलेल्या भारतात मात्र ते शांततेचा संदेश घेऊन येऊ इच्छित आहेत.
भारताकडे पाठवला आहे शांतता संदेश
मौलाना फजलुर रहमान यांच्या खास जवळचे म्हणून ओळख असलेले सिनेटर कमरान मुरतजा यांनी एका मुलाखतीत तशी माहिती दिली आहे. मौलाना फजलुर रहमान यांनी आपला शांती संदेश भारतीय राजनयीकाकडे पोहोचवला आहे, असे त्यांनी सांगितले आहे.
असीम मुनीर यांना बसणार झटका?
मौलाना फजलुर रहमान यांच्या या निर्णयामुळे असीम मुनीरला एका प्रकारे झटका बसू शकतो, असे म्हटले जात आहे. असीम मुनीर हे पंजाबी कुटुंबातून येतात. त्यांचे पाकिस्तानी लष्करावर मोठे वर्चस्व आहे. मात्र मुनीर यांच्याबाबत पाकिस्तानी पश्तून लोकसंख्येत रोष आहे. खैबर पख्तुनख्वा आणि बलुचिस्तान येथील लोकांना आमच्यावर अन्याय होतोय, असे नेहमी वाटते. त्यामुळेच लष्करात पश्तून येथून येणारे लष्करी अधिकारी मौलाना फजलुर रहमान यांचे समर्थन करताना दिसतात. या समर्थनाच्या माध्यमातून लष्करप्रमुख मुनीर यांना आव्हान देण्याचा प्रयत्न इतर लष्करी अधिकारी करतात. असे असतानाच मौलाना फजलुर रहमान यांनी भारतात शांतता संदेश घेऊन येण्याची इच्छा व्यक्त केली आहे. परिणामी मुनीर यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
