
Vladimir Putin And Narendra Modi : गेल्या काही दिवसांपासून जगात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यातल्या अलास्का बैठकीची चर्चा चालू आहे. युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्ध थांबावे यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत युद्धबंदी करार झालाच तर अमेरिकेने भारतावर वाढवलेले आयातशुल्क कमी होईल, अशी अपेक्षा भारताकडून व्यक्त केली जात होती. मात्र अलास्का येथील बैठक कोणत्याही कराराविनाच संपली. फक्त या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. असे असतानाच आता मोठी माहिती समोर येत आहे. व्लादिमीर पुतिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार व्लादिमीर पुतिन यांनी नरेंद्र मोदी यांना थेट कॉल केला आहे. या दोन्ही बलाढ्य नेत्यांत फोनवरून चर्चा झाली आहे. खुद्द पुतिन यांनीच मोदींना कॉल केल्यामुळे या चर्चेला फार महत्त्व आले आहे. या चर्चेबाबत मोदी यांनीच एक्स या सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली आहे.
मोदी यांनी एक्सवर एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी पुतिन यांचा माझे मात्र असा उल्लेख केला आहे. तसेच आमची फोनवर चर्चा झाली आहे, असेही सांगितले. पुतिन आणि डोनाल्ड ट्रम्प यांची अलास्का येथे बैठक झाली. याच बैठकीबाबत पुतिन यांनी मला कॉल करून माहिती दिली. भारताने रशिया आणि युक्रेन यांच्यातील वादावर शांततेच्या मार्गाने तोडगा काढण्याचीच नेहमी भूमिका घेतलेली आहे. तसेच शांततेच्या मार्गाने करण्यात आलेल्या सर्व प्रयत्नांना भारताचा पांठिंबा आहे. येणाऱ्या काळातही आमच्या दोघांमध्ये सतत चर्चा आणि देवाणघेवाण चालू राहील अशी अपेक्षा करतो, असे मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुतिन यांचा मित्र म्हणून उल्लेख केला आहे. याआधी काही दिवसांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद करावी आणि यातून रशिया अडचणीत सापडावा यासाठी तब्बल 50 टक्क्यांपर्यंत टॅरिफ वाढवण्याचा निर्णय घेतला. यामुळे भारताचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. मात्र तरीदेखील भारत आणि रशिया यांच्यातील सौहार्द अद्याप टिकून आहे. तसेच अमेरिकेच्या दबावाला न जुमानता पुतिन यांनीदेखील आम्ही भारताचे चांगले मित्र आहोत, अशीच भूमिका घेतलेली आहे. असे असतानाच आता भारत आणि रशिया या दोन्ही देशांच्या सर्वोच्च नेत्यांची फोन कॉलद्वारे चर्चा झाली. त्यामुळे हा फोन कॉल म्हणजे ट्रम्प यांना धक्का तर नाही ना? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.