सीरियात सुरक्षा दलांवर हल्ले, 180 हून अधिक ठार, हल्ल्यामागचं कारण काय? जाणून घ्या

सीरियाचे सरकारी सैन्य आणि असद समर्थक अलावी समुदाय यांच्यात हिंसाचार वाढला आहे. बंडखोरी रोखण्यासाठी सुरक्षा दलांनी कारवाई केली आहे. दोन दिवसांत 180 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. अलावींच्या भागात हल्ले करण्यात आले आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाने या हिंसाचारावर चिंता व्यक्त केली आहे.

सीरियात सुरक्षा दलांवर हल्ले, 180 हून अधिक ठार, हल्ल्यामागचं कारण काय? जाणून घ्या
| Edited By: | Updated on: Mar 08, 2025 | 1:59 PM

सीरियात माजी राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद समर्थक आणि विद्यमान हंगामी अध्यक्ष अहमद अल-शारा (अबू मोहम्मद अल-जुलानी) सरकारचे HTS सैन्य यांच्यातील संघर्ष तीव्र झाला आहे. असद यांच्या अलावी समाजाचे लढाऊ आणि सरकारी फौजांमध्ये दोन दिवसांपासून सुरू असलेल्या चकमकीत 180 हून अधिक जण ठार झाले आहेत.

असद यांच्या निष्ठावंतांनी सुरक्षा दलांवर हल्ला केला. यामुळे हिंसाचार उसळला, असे सरकारचे म्हणणे आहे. तर दुसरीकडे सुरक्षा दलांवर रहिवासी भागात बॉम्बस्फोट केल्याचा आरोप आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये बशर अल असद यांना सत्तेवरून हटवल्यानंतर झालेल्या उठावानंतर सीरियातील हा सर्वात भीषण हिंसक संघर्ष आहे.

सौदी अरेबिया, तुर्कस्तान, रशिया, इराण आणि संयुक्त राष्ट्रांनी सीरियातील हिंसाचारावर चिंता व्यक्त केली आहे.

CNN ने दिलेल्या वृत्तानुसार, सीरियाच्या सुरक्षा दलांना पश्चिम सीरियाच्या किनारी भागात अलावी समुदायाच्या लढवय्यांवर नियंत्रण ठेवणे कठीण जात आहे. सीरियन ऑब्जर्वेटरी फॉर ह्युमन राइट्सने (SOHR) या हिंसाचारात 180 जणांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. हिंसाचारग्रस्त भाग हा अल्वी समाजाचा बालेकिल्ला मानला जातो. माजी राष्ट्राध्यक्ष असदही याच समाजातून येतात.

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये अल-जुलानी यांच्या नेतृत्वाखालील HTS ने असद यांना सत्तेतून हटवले होते. ते सध्या रशियात आश्रय घेत आहे.

दोन्ही बाजूंनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप

सीरियाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, गुरुवारी असद यांच्या समर्थकांनी सुरक्षा दलांवर नियोजित हल्ला केल्यानंतर हिंसाचार सुरू झाला. असद समर्थक मिलिशियाच्या गटांनी जबलेह परिसर आणि आजूबाजूच्या ग्रामीण भागातील सुरक्षा गस्ती आणि चौक्यांना लक्ष्य केले. यानंतर सुरक्षा दलांनी प्रत्युत्तरादाखल अलावी समाजाच्या गावांवर बॉम्बहल्ला केला आहे.

अलवी धर्मगुरूंच्या अलावी इस्लामिक कौन्सिल या गटाने सरकारवर हिंसाचाराचा आरोप करत सिरियन जनतेला भयभीत केले जात असल्याचे म्हटले आहे. अलावी प्रदेशाला संयुक्त राष्ट्रसंघाच्या संरक्षणाखाली ठेवण्याची मागणी परिषदेने केली आहे. सौदी अरेबियाने सीरियात सुरक्षा दलांना लक्ष्य केल्याचा निषेध केला आहे. सीरियाच्या नव्या सरकारचा जवळचा सहकारी असलेल्या तुर्कस्तानने या हिंसाचारावर चिंता व्यक्त केली आहे.

सीरियातील हिंसाचारामुळे दमास्कसवरील आपले नियंत्रण बळकट करण्याच्या अंतरिम सरकारच्या प्रयत्नांना धक्का बसला आहे. सरकार सातत्याने आपले नियंत्रण वाढविण्याचा प्रयत्न करत आहे, पण लताकियामध्ये त्याला अडचणी येत आहेत. लताकिया प्रांत हा असद यांचा बालेकिल्ला असून येथे अलावी लोकसंख्या मोठी आहे. सुरक्षा दल आणि असद समर्थकांमध्ये हिंसक चकमक झाली आहे.