UNSC : सय्यद अकबरुद्दीन पाक पत्रकाराच्या जवळ गेले, शिमला करार सांगितला

जम्मू काश्मीरमधून कलम 370 काढणं हा भारताचा अंतर्गत विषय आहे आणि आंतरराष्ट्रीय समुदायाने त्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा काहीही संबंध नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

UNSC : सय्यद अकबरुद्दीन पाक पत्रकाराच्या जवळ गेले, शिमला करार सांगितला

न्यूयॉर्क : संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत काश्मीर प्रश्नावर बैठक झाली. या बैठकीनंतर संयुक्त राष्ट्रात भारताचे स्थायी प्रतिनिधी सय्यद अकबरुद्दीन (UN Syed Akbaruddin) यांनी माध्यमांशी संवाद साधला. आंतरराष्ट्रीय समुदायासमोर अकबरुद्दीन (UN Syed Akbaruddin) यांनी प्रभावीपणे भारताची बाजू मांडली. जम्मू काश्मीरमधून कलम 370 काढणं हा भारताचा अंतर्गत विषय आहे आणि आंतरराष्ट्रीय समुदायाने त्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा काहीही संबंध नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

संपूर्ण जगाचं लक्ष या पत्रकार परिषदेकडे असताना सय्यद अकबरुद्दीन यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. एका पाकिस्तानी पत्रकाराचीही त्यांनी बोलती बंद केली. त्यांनी प्रचंड आत्मविश्वासासह सर्वात अगोदर पाकिस्तानच्या तीन पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तरं दिली. तुमच्या मनात कोणतीही शंका रहायला नको, कारण मी तीन पाकिस्तानी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देतोय, असंही ते मिश्कील शैलीत म्हणाले.

भारत पाकिस्तानशी चर्चा कधी करणार आहे, असा प्रश्न पाकिस्तानच्या तिसऱ्या क्रमांकाच्या पत्रकाराने विचारला. यावेळी अकबरुद्दीन पोडियममधून बाहेर आले आणि म्हणाले, “चला, मला सर्वात अगोदर याची सुरुवात तुमच्यापासून करु द्या, हातात हात द्या.” अकबरुद्दीन यांनी पाकिस्तानच्या तीनही पत्रकारांशी हस्तांदोलन केलं. यावेळी उपस्थित पत्रकारांना हसू अनावर झालं होतं.

यानंतर अकबरुद्दीन पोडियममध्ये जाऊन म्हणाले, “आम्ही मैत्रीचा हात पुढे करुन दाखवून दिलंय, की आम्ही (भारत) शिमला कराराशी कटिबद्ध आहेत. आता पाकिस्तानकडून उत्तर येण्याची अपेक्षा आहे.”

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI