हिंदू मंदिरासाठी दोन देशात संघर्ष; युद्ध बंदीचे क्रेडिटसाठी डोनाल्ड ट्रम्प यांची कोण घाई, काय दिली धमकी
Thailand Cambodia Border Conflict : थायलंड-कंबोडिया नियंत्रण रेषेवर गेल्या तीन दिवसांपासून जोरदार धुमश्चक्री सुरू आहे. त्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उडी घेतली आहे. त्यांनी दोन्ही देशांना धमकी दिली आहे. भारत-पाक संघर्षाप्रमाणेच त्यांना या युद्धाचे क्रेडिट लाटायचे असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

थायलंड-कंबोडिया नियंत्रण रेषेवर गेल्या तीन दिवसांपासून जोरदार संघर्ष सुरू आहे. या धुमश्चक्रीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उडी घेतली आहे. त्यांनी दोन्ही देशांना धमकी दिली आहे. दोन्ही देशांच्या नेत्यांनी लवकर युद्ध बंदीची घोषणा करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. भारत-पाक संघर्षाप्रमाणेच त्यांना या युद्धाचे क्रेडिट लाटायचे असल्याचा आरोप करण्यात येत आहे. दोन्ही देशांच्या या संघर्षात आतापर्यंत 30 हून अधिक नागरिकांचा जीव गेला आहे. तर 1.3 लाख लोक बेघर झाले आहेत.
अमेरिकेचे राष्ट्रपती ट्रम्पची धमकी
राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प हे सध्या स्कॉटलँड दौऱ्यावर आहेत. ट्रम्प यांनी Truth Social वर माहिती दिली आहे की, थायलंडचे कार्यकारी पंतप्रधान फुमथम वेचायचाई आणि कंबोडियाचे पंतप्रधान हुन मानेट यांच्याशी स्वतंत्र चर्चा केली. जर युद्ध सुरूच राहिले तर अमेरिका त्यांच्यासोबत व्यापार करार करणार नाही, अशी धमकी ट्रम्प यांनी दोन्ही देशांना दिला आहे.
दोन्ही देशांना शांतता हवी आहे आणि दोघेही शांततेसाठी तयार आहेत. दोन्ही देशाचे नेते लवकरच भेट घेतील आणि युद्ध बंदीसाठी काम करतील, घोषणा करतील, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले. विशेष म्हणजे, दोन्ही देशाच्या दुतावासाने अथवा व्हाईट हाऊसने याविषयीची कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही. त्यामुळे ट्रम्प यांना युद्ध बंदीचे क्रेडिट घेण्याची घाई झाल्याचा आरोप ट्रम्प यांचे विरोधक करत आहेत.
मलेशियाच्या पंतप्रधान युद्ध बंदीसाठी पुढे
ASEAN अध्यक्ष आणि मलेशिया या देशाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांनी दोन्ही देशातील संघर्ष थांबवण्यासाठी मोठे पाऊल टाकले आहे. त्यांनी दोन्ही देशांपुढे युद्ध बंदीचा प्रस्ताव ठेवला आहे. कंबोडियाने लागलीच या प्रस्तावावर प्रतिक्रिया दिली आणि युद्ध बंदीसाठी सहमत असल्याचे सांगितले. तर दुसरीकडे थायलंडने या प्रस्तावावर अंशतः तयार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे लवकरच हे युद्ध थांबण्याची शक्यता आहे.
दोन्ही देशात वाद कशावरुन?
प्रीह विहियर (प्रिय विहार) आणि ता मुएन थॉम मंदिरांच्या जमिनीवरील ताब्यावरून दोन्ही देशात पुर्वीपासूनच कायदेशीर आणि राजकीय वाद सुरू आहे. 1907 मध्ये कंबोडिया फ्रान्सच्या ताब्यात होता. तेव्हा दोन्ही देशात 817 किमीची सीमा, नियंत्रण रेषा आखण्यात आली होती. तेव्हापासून या दोन शिव मंदिरावरून दोन्ही देशात वाद सुरू आहे. हे मंदिर 1000 वर्षांपूर्वीची आहेत. कंबोडियाने UNESCO च्या वर्ल्ड हेरिटेजमध्ये हे मंदिर समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न केला होता. त्यानंतर संघर्ष वाढला.
