Sheikh Hasina : आजोबांची मूर्ती फोडली, आई देशातून पळाली, शेख हसीना यांच्या मुलाची पहिली प्रतिक्रिया, थेट पाकिस्तानचं नाव घेत म्हणाले…
भीषण हिंसाचार आणि जाळपोळीनंतर बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा दिला असून त्या भारतात आल्या आहेत. बांगलादेशामध्ये हिंसेचा आगडोंब उसळला आहे. याच दरम्यान, शेख हसीना यांचा मुलगा सजीब वाजेद यांनी एका वृतवाहिनीला मुलाखत देत महत्वाची वक्तव्यं केली आहेत. बांगलादेश हा पुढचा पाकिस्तान ठरू शकतो, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे.

बांगलादेशमध्ये सध्या हिंसेचा आगडोंब उसळला आहे. गेल्या काही दिवसांपासून अशांत असलेल्या बांगलादेशमध्ये मोठी उलथापालथ झाली आहे. बांगलादेशमध्ये मोठं सत्तांतर झालं असून सरकार कोसळलं आहे. देशातील सत्ता आर्मीने ताब्यात घेतली असून बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा देऊन त्या भारताच्या आश्रयासाठी आल्या आहेत. शेजारच्या देशातील भीषण हिंसाचार आणि जाळपोळ होत असताना भारतीय सुरक्षा यंत्रणांनी शेख हसीना यांना भारतात येण्याची सोय केली आहे. सध्या त्या हिंडन एअरबेसच्या सेफ हाऊसमध्ये आहेत. याचदरम्यान बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांचा मुलगा सजीब वाजेद यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला. त्यावेळी त्यांवी बांगलादेशच्या भविष्याबद्दल चिंता व्यक्त केली.
साजिब वाजेद यांनी त्यांची आई शेख हसीना यांचा बचाव केला. ते म्हणाले, ‘माझ्या आईने बांगलादेशात सर्वोत्तम सरकार चालवले. त्यांनी काहीही चुकीचे केले नाही. तसेच त्यांनी दहशतवादाशी ताकदीने आणि असीम धैर्याने मुकाबला केला. पण आता ती 77 वर्षांची झाली आहे. बांगलादेशसाठी तिला जे काही करायचे होते ते तिने केले आहे. आता ती आपल्या नातवंडांसोबत जगातील विविध देशांमध्ये वेळ घालवेल. मात्र बांगलादेशची सध्याची परिस्थिती पाहिल्यानंतर ती खूप निराश आणि हताश झाली आहे ‘ असे वाजेद यांनी नमूद केलं.
शेख हसीना लंडनमध्ये घेणार आश्रय ?
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान असलेल्या शेख हसीना या ब्रिटनमध्ये आश्रय घेणार का याबद्दल सजीब वाजेद यांना सवाल विचारण्यात आला. मात्र त्यावर त्यांनी स्पष्ट उत्तर दिलं. ‘ लंडनमधून जे रिपोर्ट्स येत आहेत, ते चुकीचे आहे. त्यांनी (शेख हसीना) आत्तापर्यंत कोणाकडेही आश्रय मागितलेला नाही. आम्ही भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जवळचे मित्र आहोत.’ बांगलादेशातील अल्पसंख्यांकांबद्दल साजिब वाजेद बोलले. आता तिथे अल्पसंख्याकांच्या मंदिरांवर हल्ले होत आहे, असे त्यांनी सांगितले.
‘जमात-ए-इस्लामीची मुख्य भूमिका
सजीब वाजेद पुढे म्हणाले, ‘बांगलादेशातील निदर्शने थांबवण्यासाठी बळाचा वापर आवश्यक होता. पण माझ्या आईने ठरवले होते की ती विद्यार्थ्यांविरुद्ध सुरक्षा दलाचा वापर करणार नाही. त्यामुळे तिने विद्यार्थ्यांवर बळाचा वापर करण्याऐवजी राजीनामा देणेच योग्य मानले. या संपूर्ण घटनेत जमात-ए-इस्लामीची मुख्य भूमिका आहे. ते लोक अतिरेकी आहेत. बांगलादेशातील सामान्य माणूस यात अजिबात गुंतलेला नाही, असेही त्यांनी नमूद केलं.
पक्षाच्या कार्यकर्त्यांना टार्गेट केलं जात आहे
बांगलादेशात होणाऱ्या सततच्या हिंसाचारावर बोलताना साजिब वाजेद म्हणाले, ‘दहशतवादी आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना लक्ष्य करत आहेत. 1975 मध्येही आमच्या पक्षाच्या नेत्यांची हत्या झाली. अशीच परिस्थिती पुन्हा येऊ नये अशी आमची इच्छा आहे. आम्ही आमच्या नेत्यांचे नक्कीच रक्षण करू. पण बांगलादेशचे भविष्य ही आता आपली जबाबदारी नाही, असे ते म्हणाले.
बांगलादेशचं भविष्य काय ?
सतत होणारा हिंसाचार, उसळणार आगडोंब या सर्व पार्श्वभूमीवर आता बांगलादेशचं भविष्य काय ? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. याच मुद्यावर सजीब वाजेद यांनी भाष्य केलं. ‘ आम्ही शेख हसीना यांना बांगलादेश सोडण्यास कसंबसं राजी केलं. बांगलादेश आता पुढचा पाकिस्तान बनेल, हे त्याचं (देशाचं) भाग्य आहे. आम्ही लष्करावर अजिबात टीका करणार नाही’ असं वाजिद म्हणाले.
