झेलेन्स्कींच्या हत्येचा कट उधळला, थोडक्यात वाचला जीव, नेमकं काय घडलं?
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्या हत्येचा कट उधळण्यात आला आहे. झेलेन्स्की यांचा जीव थोडक्यात वाचला आहे. याबाबत माहिती जाणून घेऊयात.

गेल्या 3 वर्षांपासून रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध सुरू आहे. दोन्ही देशांकडून एकमेकांवर हल्ले सुरु आहेत. या हल्ल्यात युक्रेनचे मोठे नुकसान झाले आहे. अशातच आता युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्या हत्येचा कट उधळण्यात आला आहे. रशियाची गुप्तचर संस्था एफएसबीने एका स्लीपर एजंटला सक्रिय केले होते. मात्र त्याला वेळीच अटक केल्याने झेलेन्स्की यांचा जीव थोडक्यात वाचला आहे.
युक्रेनची गुप्तचर संस्था एसबीयूचे प्रमुख वासिल माल्युक यांनी दिलेल्या माहितीनुसार. या एजंटला रशियाने दशकांपूर्वी आपल्या ताफ्यात सामील केले होते. हा एजंट पोलंडमधील रझेझोव विमानतळावर झेलेन्स्की यांना गोळ्या घालणार होता. या ठिकाणी ब्रिटिश सैनिक देखील तैनात आहेत.मात्र पोलंडच्या होमलँड सिक्युरिटी एजन्सीच्या मदतीने युक्रेनने हा कट उधळून लावला. यामुळे झेलेन्स्की यांचा जीव वाचला आहे.
युक्रेनची गुप्तचर संस्था एसबीयूने दिलेल्या माहितीनुसार, हा एजंट निवृत्त लष्करी अधिकारी आहे, जो युएसएसआरच्या काळात सेवा देत होता. मात्र रशियाने त्याला आपल्या बाजूने वळवले होते. तो झेलेन्स्की यांच्यावर हल्ला करणार होता, मात्र त्यापूर्वीच त्याला पकडण्यात आले आहे. दरम्यान, युद्ध सुरू झाल्यापासून युक्रेनमध्ये 500 हून अधिक रशियन हेरांना पकडले असल्याची माहिती समोर आली आहे.
झेलेन्स्की काय म्हणाले?
हत्येच्या कटावर बोलताना वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी सांगितले की, ‘मला आधी भीती वाटत होती, पण आता अशा कटांची सवय झाली आहे.’ याआधी 24 फेब्रुवारी 2022 रोजी रशियाने युक्रेनवर पूर्ण हल्ला केला, त्या दिवशी रशियाचे खास कमांडो पॅराशूटने कीवमध्ये उतरले होते आणि त्यांनी झेलेन्स्की यांच्या हत्येचा प्रयत्न केला होता.
झेलेन्स्की यांनी स्वतः द गार्डियनला सांगितले होते की, ‘एकदा राष्ट्रपती कार्यालयात हल्ला झाला होता, ज्यामध्ये काही लोकांचा मृत्यूही झाला होता.’ समोर आलेल्या माहितीनुसार, रशियाने कीवसह युक्रेनच्या अनेक भागात ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागली आहेत. यात अनेकांचा मृत्यू झाला आहे.
