ऑनलाइन फसवणूक झाल्यावर किती लवकर तक्रार करावी? जाणून घ्या संपुर्ण माहिती
ऑनलाइन फसवणुकीत वेळेवर केलेली तक्रारच तुमची रक्कम वाचवू शकते. फक्त तुम्हाला ‘गोल्डन अवर’कडे लक्ष देणं गरजेचं आहे. मग, काय आहे हा गोल्डन अवर आणि तो कसा काम करतो? जाणून घ्या सविस्तर.

आजच्या डिजिटल युगात ऑनलाइन फसवणुकीची प्रकरणं मोठ्या प्रमाणावर वाढली आहेत. OTP फसवणूक, बनावट जॉब ऑफर्स, लिंकद्वारे पैसे काढून घेणे अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये नागरिक आपली मेहनतीची कमाई गमावतात. मात्र, अनेकदा फसवणूक झाल्यानंतर लोक गोंधळून जातात आणि वेळेवर तक्रार करत नाहीत. पण पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, अशा फसवणुकीच्या घटनांमध्ये ‘गोल्डन अवर’ महत्त्वाचा असतो.
काय असतो गोल्डन अवर?
गोल्डन अवर म्हणजे फसवणूक घडल्यानंतरची पहिली 30 ते 60 मिनिटे. या वेळेत जर तक्रार केली गेली, तर फसवलेले पैसे वाचवण्याची शक्यता वाढते. पोलिस अधिकारी सांगतात की, फसवणूक झाल्याचे लक्षात येताच नागरिकांनी 1930 या हेल्पलाईन क्रमांकावर त्वरित कॉल करावा, तसेच जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये तक्रार द्यावी.
तक्रार करण्यास किती वेळ आहे?
समजा एखाद्याच्या खात्यातून दुपारी 3 वाजता पैसे गेले, तर 3 वाजून 5 मिनिटांच्या आत 1930 वर फोन करून तक्रार द्यावी. त्यामुळे 3:20 पर्यंत बँक खातं फ्रीझ करता येऊ शकतं आणि पैसे ट्रान्सफर होण्यापासून थांबवता येतात. यासाठी 5 मिनिटांचा विलंबही महागात पडू शकतो.
ऑनलाइन फ्रॉडची ‘लेयर सिस्टीम’
साइबर गुन्हेगार पैसे एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पाठवत असतात. उदाहरणार्थ, दिल्लीमध्ये फसवलेले पैसे काही मिनिटांतच पुणे, मुंबईमार्गे केरळमध्ये पोहोचतात. अशा अनेक खात्यांमध्ये पैसे वळते केल्याने पोलिसांना ते परत मिळवणे अधिक कठीण जाते.
तक्रार देण्यास उशीर केला तर?
जर नागरिकांनी एक दिवस किंवा काही तासांनी तक्रार केली, तर पोलिसांना संबंधित खातं फ्रीझ करण्याची संधी मिळत नाही. त्यामुळे फसवलेले पैसे परत मिळवणं अशक्य ठरू शकतं. त्यामुळेच वेळेवर तक्रार करणं महत्त्वाचं आहे.
पुढे काय करावं?
1. ज्या क्षणी आपल्याला फसवणुकीचा संशय येतो, तात्काळ 1930 या नंबरवर फोन करा.
2. जवळच्या पोलिस ठाण्यात तक्रार द्या.
3. फसवणूक न घडण्यासाठी मोबाइल, OTP, बँक माहिती काळजीपूर्वक सांभाळा.
4. अनोळखी लिंक किंवा ऑफरवर विश्वास ठेऊ नका.
त्यामुळे, फसवणूक झाली तर लपवून ठेवू नका. वेळ न घालवता ‘गोल्डन अवर’मध्येच योग्य ती कारवाई करा. कारण, काही मिनिटांचा विलंब तुमच्या संपूर्ण रकमेवर पाणी फेरू शकतो.
