संकटाने घेरलात? हताश, निराश झालात? जगण्याची इच्छाही उरली नाही? मग एकदा या तरुणाची कहाणी वाचाच; हजारो हत्तीचं मिळेल बळ…
IAS Pawan Kumar: आयुष्यात अनेक संकटं येतात, निराशा येते... पण त्यावर मात करायची की परिस्थितीला दोष द्यायचा? एकदा या तरुणाची कहाणी वाचाच; हजारो हत्तीचं मिळेल बळ...

IAS Pawan Kumar: काहीतरी करण्याची इच्छा मनात असेल तर, असंख्य अडथळे आल्यानंतर देखील लक्ष्य साध्य करता येत… असंच काही आईएएस पवन कुमार यांच्यासोबत झालं आहे. गरिबीत देखील त्यांनी माघार घेतली नाही. पावसाळ्यात छतावरून पाणी टपकणाऱ्या घरात शिक्षण घेणाऱ्या पवन कुमार यांनी कधीही हार मानली नाही. पवन यांनी कुटुंबाच्या संघर्षाची किंमतही चुकवली आणि आपल्या कठोर परिश्रमाने 2024 च्या यूपीएससी स्पर्धा परीक्षामध्ये 239 वा क्रमांक मिळवून कुटुंबाला सन्मान मिळवून दिला.
उंचगाव ब्लॉकमधील रघुनाथपूर गावातील रहिवासी पवन यांनी कहाणी संघर्षाचं उदाहरण आहे. त्यांच्या वडिलांनी मुलाच्या मेहनतीचं कौतुक केलं आणि म्हणाले, ‘कुटुंबाकडे फार मोठी जमीन नाही आणि पक्क घर देखील नाही.. गळणारं छप्पर असलेली विटांची खोली हेच त्यांचं घर आहे. पावसाळ्याच्या दिवसात भिंती आणि छतावरून पाणी टपकत असतानाही, पवन स्वतःची पुस्तकं घेऊन बसायचा. त्यांचे वडील म्हणतात, “तो नेहमी म्हणायचा, ‘बाबा, मला थोडा वेळ द्या, मी सगळं बदलून टाकेन.”
पवन कुमार यांच्या अभ्यासासाठी कुटुंबाने 4 टक्क्यांनी कर्ज घेतलं होतं आणि एक सेकेंड हँड मोबाईल फोन खरेदी केला होता… शेतमजूर म्हणून काम करून वडिलांनी मुलाच्या स्वप्नाला पाठिंबा दिला. या अढळ विश्वास आणि पाठिंब्यामुळेच त्यांच्या मुलाने देशातील सर्वात कठीण परीक्षेत यश मिळवलं.
वडिलांनी सांगितल्यानुसार, जेव्हा निकाल लागणार होता, त्या दिवशी देखील शेतात काम करण्यासाठी गेले होते. कारण शिक्षणासाठी घेतलेलं कर्ज फेडायचं होतं. पवन यांची आई सुमन देवी यांनी शिक्षणासाठी स्वतःचे दागिने विकले… तर तीन बहिणी देखील शेतात काम करत होत्या. गोल्डी, सृष्टी आणि सोनिका.. अशी पवन यांच्या बहिणींची नावे आहे… त्या देखील शिक्षण घेत आहेत…
संघर्षाच्या काळात त्याची आर्थिक परिस्थिती इतकी कमकुवत होती की घरातील गॅस सिलेंडरसाठी देखील त्यांच्याकडे पैसे नव्हते… त्यांची आई चुलीवर भाकरी शिजवत असे. त्यांच्या घरातील हापसा खराब झाल्यामुळे ते सरकारी शाळेतील नळावरून पाणी आणत असे. तरीही, कठोर परिश्रमाने पवन यांनी यश मिळवलं.
यश मिळवल्यानंतर पवन म्हणाले, ‘चिकाटी, आत्मविश्वास आणि ध्येयाप्रती समर्पण असेल तर यश निश्चित आहे. अपयशाची भीती बाळगू नये; त्याऐवजी त्यातून शिकून पुढे जावं… मुलाखत म्हणजे आत्मविश्वासाची परिक्षा असते…’ सांगायचं झालं तर, पवन रोज 8 – 10 तास अभ्यास करायचे.
