अखेर मंगळावर सापडलं पाणी! आता पुढे काय? वाचा संपूर्ण माहिती
मंगळावरील भूकंपांचा अभ्यास करून पाण्याचे अस्तित्व शोधण्याची ही शास्त्रीय कामगिरी भविष्यातील संशोधनासाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे. हे फक्त मंगळावरील हवामानशास्त्रच नव्हे, तर तिथल्या भूतकाळातील जीवशास्त्र, भूगर्भशास्त्र आणि संभाव्य भविष्यावरही प्रकाश टाकते.

मंगळावरील जीवनाच्या शक्यतेबाबत संशोधक अनेक वर्षांपासून अभ्यास करत आहेत. या लाल ग्रहावर पाणी अस्तित्वात होतं का? किंवा आहे का? या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी अनेक मिशन्स पाठवण्यात आले आहेत. आता या संशोधनाला एक नवा टप्पा गाठता आला आहे. नासाच्या ‘इनसाईट’ (InSight) लँडरने मंगळावर आलेल्या भूकंपांचे निरीक्षण करून एक धक्कादायक माहिती समोर आणली आहे मंगळाच्या गर्भात मोठ्या प्रमाणात पाण्याचे अस्तित्व असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
‘इनसाईट’ मिशन हे 2018 मध्ये मंगळावर उतरले. या लँडरने मंगळाच्या पृष्ठभागाखाली होणाऱ्या भूकंपांचे (marsquakes) बारकाईने निरीक्षण केले. या भूकंपांमुळे निर्माण होणाऱ्या तरंगांचा अभ्यास करताना वैज्ञानिकांनी असे आढळून आणले की, मंगळाच्या खालच्या थरांमध्ये पाण्याशी संबंधित खनिजे आणि संभाव्य द्रव पाण्याचे संकेत आहेत. म्हणजेच, या ग्रहाच्या आतमध्ये आजही काही प्रमाणात पाणी असू शकते, जे पूर्वीच्या महासागरांचे अवशेष असू शकतात.
मंगळावर होता महासागर?
या नव्या संशोधनानुसार, सुमारे 4 अब्ज वर्षांपूर्वी मंगळावर पृष्ठभागावर मोठा महासागर होता, अशी शक्यता आहे. या महासागराचा पसारा उत्तर गोलार्धात असावा आणि तो पृथ्वीवरील अटलांटिक महासागराइतका मोठा असावा. नंतर हळूहळू वातावरणातील बदल, चुंबकीय क्षेत्राच्या क्षीणतेमुळे मंगळाचे पाणी अंतरिक्षात वाफ होऊन गेले असावे. परंतु त्यापैकी काही प्रमाणात पाणी जमिनीखाली टिकून राहिले असण्याची शक्यता आता वैज्ञानिकांनी व्यक्त केली आहे.
या संशोधनामुळे मंगळ आणि पृथ्वीमधील साम्य अधिक ठळक झाले आहे. पृथ्वीप्रमाणेच मंगळावरही पाण्याचे अस्तित्व, भूकंप, ज्वालामुखी यांचा इतिहास आहे. यामुळे मंगळावर पूर्वी जीवसृष्टी अस्तित्वात होती का, याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. जर मंगळावर पाणी होतं, तर सूक्ष्म जीवसृष्टीसाठी अनुकूल परिस्थिती होऊ शकते, असे शास्त्रज्ञ मानतात.
मानव वसाहतींसाठी नवा मार्ग?
भविष्यात मंगळावर मानव वसाहती उभारण्याचे स्वप्न अनेक देश पाहत आहेत. अशा परिस्थितीत तिथे पाण्याचे अस्तित्व हे अत्यंत महत्त्वाचे ठरते. जर मंगळाच्या आतल्या थरांमध्ये द्रव स्वरूपात पाणी सापडले, तर ते भविष्यातील मोहिमांसाठी अमूल्य ठरेल. त्यामुळे या संशोधनामुळे अंतराळ विज्ञानाला नवे दालन खुले झाले आहे.
