पत्ता कोणताही, पिनकोड का असतो आवश्यक? भारतात कधी झाली सुरुवात, घ्या जाणून !
भारतात आपण पत्र किंवा पार्सल कुठेही पाठवत असलो, तरी पत्त्याच्या शेवटी पिनकोड न चुकता लिहितो. पण कधी विचार केला आहे का, ही संख्या कुठून आली आणि तिचं इतकं महत्त्व का आहे? जाणून घ्या

आजच्या डिजिटल युगात पत्रं पाठवणं थोडं मागे पडलं असलं, तरी पत्त्यावर लिहिलेला ‘पिनकोड’ हा अजूनही आपल्या दैनंदिन व्यवहाराचा एक अविभाज्य भाग आहे. ऑनलाइन खरेदीपासून ते बँकिंग, सरकारी योजनांपासून ते आपत्कालीन सेवांपर्यंत सर्व ठिकाणी ‘पिनकोड’चा वापर अनिवार्य आहे. पण हा 6 अंकी संख्यात्मक कोड म्हणजे काय? तो का आणि कधी अस्तित्वात आला? यामागची कहाणी तितकीच रंजक आणि माहितीपूर्ण आहे.
पिनकोड म्हणजे काय?
‘पिनकोड’ म्हणजे Postal Index Number. भारतीय डाक विभागाने 1972 साली देशातील भौगोलिक विभागांचे अचूक वर्गीकरण करण्यासाठी ही प्रणाली सुरू केली. पत्त्याला एक विशिष्ट कोड देऊन पत्रं, पार्सल्स आणि अन्य डाक सेवेला अधिक कार्यक्षम, वेगवान आणि शिस्तबद्ध बनवणे हा यामागचा मुख्य उद्देश होता.
पिनकोडची रचना कशी असते?
भारतातील प्रत्येक पिनकोड हा 6 अंकांचा असतो आणि या प्रत्येक अंकाचा विशिष्ट भौगोलिक अर्थ असतो.
पहिला अंक – देशातील एकूण 9 झोनपैकी कोणत्या झोनचा तो भाग आहे हे दर्शवतो.
उदाहरणार्थ: 1 – उत्तर झोन (दिल्ली, हरियाणा, पंजाब)
दुसरा अंक – त्या झोनमधील उप-झोन दर्शवतो.
तिसरा अंक – संबंधित जिल्हा दर्शवतो.
शेवटचे तीन अंक – एखाद्या विशिष्ट पोस्ट ऑफिससाठी असतात.
कसे विभागले आहेत अंक ?
विभागनिहाय पिनकोडचे पहिले अंक:
1 : उत्तर झोन (दिल्ली, हरियाणा, पंजाब, हिमाचल प्रदेश, जम्मू-कश्मीर)
2 : उत्तर झोन (उत्तराखंड, उत्तर प्रदेश)
3 : पश्चिम झोन (राजस्थान, गुजरात)
4 : पश्चिम झोन (महाराष्ट्र, गोवा, मध्य प्रदेश)
5 दक्षिण झोन (आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक)
6 : दक्षिण झोन (केरळ, तामिळनाडू)
7 : पूर्व झोन (पश्चिम बंगाल, ओडिशा, आसाम)
8 : पूर्व झोन (बिहार, झारखंड)
9 : सैन्य डाक सेवा (APO आणि FPO)
पिनकोडची सुरुवात कधी झाली?
15 ऑगस्ट 1972 रोजी पिनकोड प्रणालीची सुरुवात झाली. याचे श्रेय जाते श्रीराम भिकाजी वलंकर यांना, जे त्या काळात भारतीय डाक विभागात अतिरिक्त सचिव होते. भारतासारख्या विशाल देशात, जिथे हजारो गावं, शहरं आणि पोस्ट ऑफिसेस आहेत, तिथे अचूकतेने डाक पोहोचवण्याची गरज लक्षात घेऊन त्यांनी ही प्रणाली आणली.
पिनकोड का आहे इतका महत्त्वाचा?
1. योग्य पिनकोड दिल्यास पत्रं किंवा कोणतेही पार्सल योग्य पत्त्यावर वेळेत पोहोचतात.
2. बँक खाती, आधार, रेशन यांसाठी पिनकोड आवश्यक आहे.
3. एम्बुलन्स, पोलिस आणि तत्काळ सेवा योग्य ठिकाणी पोहोचतात.
4. ऑनलाइन खरेदी करताना अचूक डिलिव्हरीसाठी पिनकोड आवश्यक असतो.
5. देशातील भौगोलिक विभागांचे वर्गीकरण पिनकोडच्या आधारे सोपे होते, जे प्रशासनासाठी उपयुक्त ठरते.
