Nagaland: मालवाहू ट्रकला नागालँडचेच पासिंग का? ईशान्येतील या राज्यातून का होते अवजड वाहनांची मोठी खरेदी? 99 टक्के लोकांना नाही माहिती
Nagaland Heavy Loading Trucks: भारतातील महामार्गावर धावणाऱ्या मालवाहू ट्रकवर NL का लिहिलेले असते, याचं कधी तुम्ही निरीक्षण केले आहे का? नागालँडमधूनच का होते अवजड वाहनांची मोठी खरेदी?

Nagaland Heavy Loading Trucks Passing: देशातील महामार्गावर मोठ्या संख्येने अवजड आणि मालवाहू ट्रक धावतात. निरीक्षण केले तर त्यावर प्रामुख्याने NL म्हणजे नागालँड पासिंग नंबर प्लेट्स दिसतात. काहींच्या मते हा मोठा स्कॅम आहे. तर काहींच्या दाव्यानुसार ईशान्यमधील राज्याला यामुळे मोठा महसूल तर मिळतोच पण उद्योजकांचा ही मोठा फायदा होतो. हरियाणा पासिंगची सुद्धा जड वाहनं दिसून येतात. काय आहे नागालँडच्या पासिंग क्रमांकाच्या अवजड वाहनांमागील प्रमुख कारणं?
महामार्गावर NL नंबर प्लेटची वाहनं का?
तुम्ही कोणत्याही प्रमुख राष्ट्रीय महामार्गावर गेला तर उत्तर-दक्षिण, पश्चिम-पूर्व आणि असेच उलट धावणारी मालवाहतूक करणारे अवजड ट्रक तुम्हाला एका ओळीत जाताना दिसतील. हे ट्रक शेकडो मैलचा टप्पा गाठतात. पण या ट्रकचे एक वैशिष्ट्य असे की त्यावर नागालँड (NL-01, NL-02) प्रादेशिक परिवहन विभागाचा क्रमांक असलेली नंबर प्लेट असते. मोठे ट्रक, कंटेनर, ट्रेलरवर नागालँडचे पासिंग असते. पण हे ट्रक कधीच नागालँडला गेलेले नसतात.
कमी रोड टॅक्स
महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडू यासह इतर राज्यांच्या तुलनेत नागालँडमध्ये व्यावसायिक वाहनांवरील रोड टॅक्स आणि नोंदणी शुल्क अत्यंत कमी असते. मोठ्या राज्यात एका अवजड ट्रकच्या वार्षिक शुल्क नोंदणीसाठी लाखोंचा खर्च येतो. तर नागालँडमध्ये हाच कर अवघ्या काही हजार रुपयांत होतो. वार्षिक एक ते चार हजार रुपयांत काम होते. अवजड वाहनं खरेदी करणाऱ्या कंपन्या त्यामुळे नागालँडला पसंती देतात.
लाखो रुपयांची मोठी बचत
मोठ्या 16 ते 18 चाकी ट्रकची किंमत 40 ते 60 लाख रुपये इतकी असते. अशा ट्रकवर इतर राज्यांमध्ये 8 ते 12 टक्क्यांपर्यंत करा लागतो. मालकाला सुरुवातीलाच 4 ते 6 लाख रुपये मोजावे लागतात. नागालँडमध्ये नोंदणी केल्याने ट्रान्सपोर्ट कंपन्यांना प्रति ट्रक थेट 3 ते 5 लाखांची बचत होते. जर एखाद्या कंपनीकडे 50, 100, 200 असे ट्रक असतील तर ही बचत कोट्यवधींच्या घरात पोहचते.
RTO मधील सोपी नोंदणी प्रक्रिया
नागालँडमधील प्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये (RTO) वाहन नोंदणीची प्रक्रिया इतर राज्यांच्या तुलनेत खूपच लवचिक आहे. विशेष म्हणजे मध्यस्थांचे जाळे इतके सक्रिय आहे की, ट्रक मालकाला, कंपनीला नागालँडला ट्रक न नेताच घरबसल्या आरसी बुक (RC Book) आणि नंबर मिळतो.
अवजड वाहतुकीविषयीचे शिथिल नियम
अनेक राज्यात मल्टी एक्सल म्हणजे अतिअवजड वाहनांच्या वजन क्षमतेवर कडक निर्बंध असतात. त्यासाठी विशेष परवानग्या आणि अतिरिक्त शुल्काचा भार पडतो. नागालँडच्या नियमानुसार, अधिक वजन वाहन नेण्याची परवानगी मिळणे तुलनेने अधिक सोपे असते.
