शेतकऱ्यांवर नवे संकट, 8 हजार 856 क्विंटल तुरीला शून्य किंमत

शेतकऱ्यांवर नवे संकट, 8 हजार 856 क्विंटल तुरीला शून्य किंमत

वर्धा : तुर विकल्यानंतर तब्बल सात महिन्यांनी तुमची तुर परत घेऊन जा, अशी सूचना खरेदी-विक्री समितीने केली आहे. ही सूचना तुर विकताना केली नसून सात महिन्यानंतर शेतकऱ्यांना असे सांगण्यात आले आहे. महाराष्ट्रात अशा एकूण 668 शेतकऱ्यांना 8 हजार 856 क्विंटल तुर परत केली जात आहे. यासोबत विकत घेतलेला 2 हजार 852 क्विंटल हरबराही 157 शेतकऱ्यांना परत केला जात आहे. यामुळे शेतकऱ्यांसमोर एक नवे संकट निर्माण झालं आहे.

विकलेल्या तुरीचे पैसे मिळाले नाहीच. मात्र सात महिन्यानंतर थेट माल परत घेऊन जावा, असं सांगण्यात येत असल्याचे पत्र शेतकऱ्यांचा हातात दिले आहे. तेलही गेलं आणि तूपही गेलं अशीच परिस्थिती लोनसावळी येथील पंढरी अण्णाजी अवगुडे या शेतकऱ्यावर आली आहे. ज्या खरेदी विक्री संघाकडून चूक झाली अशांना काळ्या यादीत टाकण्याची शिफारस सध्या केली जात आहे.

मागील हंगामात हमीभावात होणारी शासकीय तुर खरेदी चांगलीच गाजली. ऑनलाईन प्रक्रियेत नाव नोंदणी करून तुर खरेदी झाली होती. पण जिल्ह्यात ऑनलाईन प्रक्रियेत असंख्य चुका पाहायला मिळाल्या आहेत. ज्या शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी झाली नाही अशा शेतकऱ्यांची तुर स्वीकारणार नाही अशा सूचना होत्या. तरीही मार्केटमध्ये हमीभावात तुर स्वीकारण्यात आली. त्याची पावतीही देण्यात आली आणि सौदा पट्टीही झाली. तुर विकल्यावर लोनसावळी येथील शेतकरी पंढरी अण्णाजी अवगुडे याने तुरीचे चुकारे मिळेल या आशेवर दिवस काढलेत. मोबदल्यासाठी चकराही मारल्या. पण अखेर डिसेंबर महिन्यात शेतकऱ्याच्या हाती तुर परत नेण्याचे सुचनापत्रच देण्यात आले.

पंढरी अवगुडे यांनी मे महिन्यात आपली तुर हमीभावात नाफेडला विकली आणि त्याची सौदापट्टीही मिळाली. तुरीच्या मिळणाऱ्या पैशावर खरीप आणि रब्बी हंगामात शेती करून उत्पन्न घेण्याचा पंढरी अवगुडे या शेतकऱ्याने बेत आखला होता. पण तुर विकूनही शेतकऱ्याला पैसे मिळालेच नाही. अखेर सात महिन्यांनी मिळालेले पत्र शेतकऱ्यांसाठी डोकेदुखीच ठरले आहे. या पत्रात आपण आपली सात क्विंटल तुर परत न्यावी, असे स्पष्ट नमूद केले आहे. हा केवळ पंढरी अवगुडे या शेतकऱ्याचाच प्रश्न नाही तर अख्या  महाराष्ट्रात 668 तुर उत्पादक शेतकरी या संकटात सापडले आहे. तर 157 हरभरा उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. आपल्या तुरीचे चुकारे मिळावे म्हणून शेतकऱ्यांनी राजकारण्यांचे उंबरठेही झिजवले आहे.

“शासन निर्णयानुसार तुर नोंदणी करूनच खरेदी केली जायला पाहिजे होती. ऑनलाईन नोंदणी न करता ज्या शेतकऱ्यांनी तुर आमच्याकडे आणली त्यांची तुर परत केली जात असल्याचे” जिल्हा मार्केटिंग अधिकारी आपदेव यांनी सांगितले आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI