रेशन दुकानातील धान्य वाटपावर पालकमंत्र्यांनी व्यक्तीश: लक्ष घालावं, अजित पवारांच्या सूचना

राज्यातील रेशनिंगवरील अन्न-धान्याचा कोटा 3.87 लाख मेट्रीक टनांवरुन 7.74 लाख मेट्रीक टनांवर नेण्यात आला आहे, अशी माहिती अजित पवारांनी दिली (Ajit Pawar on Ration Shop Grocery Distribution)

रेशन दुकानातील धान्य वाटपावर पालकमंत्र्यांनी व्यक्तीश: लक्ष घालावं, अजित पवारांच्या सूचना
अनिश बेंद्रे

|

Apr 17, 2020 | 9:34 AM

पुणे : ‘कोरोना’ संकटकाळात गोरगरीब जनतेला रेशन दुकानातून दिल्या जाणाऱ्या धान्य वाटपाचं प्रमाण वाढवण्यात आलं आहे. या वाटपात गैरप्रकार होऊ नये, धान्य वाटप सुरळीत आणि विनातक्रार व्हावं, वाटपाबाबत कुठलीही तक्रार आल्यास तिचं तात्काळ निराकरण करावं आणि शासनाची विनाकारण होणारी बदनामी टाळावी, यासाठी सर्व पालकमंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्यात व्यक्तीश: लक्ष घालून जबाबदारी घ्यावी, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांना पत्र लिहून केलं आहे. (Ajit Pawar on Ration Shop Grocery Distribution)

रेशन दुकानांमधून पुरेसं अन्नधान्य उपलब्ध केलं जात असतानाही तक्रारी वाढत असल्याकडे अजित पवार यांनी सर्व पालकमंत्र्यांना पत्र लिहून लक्ष वेधलं आहे. शासनाने रेशनिंगसाठी उपलब्ध केलेल्या धान्य साठ्याची माहितीही त्यांनी पत्रात दिली आहे.

राज्यातील रेशनिंगवरील अन्न-धान्याचा कोटा 3.87 लाख मेट्रीक टनांवरुन 7.74 लाख मेट्रीक टनांवर नेण्यात आला आहे. केसरी कार्डधारकांना 1.52 लाख मेट्रीक टनांचं अतिरिक्त धान्य उपलब्ध करुन देण्यात आलं आहे. गरीब नागरिकांना पुरेसं धान्य मिळावं, धान्याचं सुरळीत वाटप व्हावं, कुणीही उपाशी राहू नये, कुणाचीही तक्रार राहू नये, याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचं अजित पवार म्हणाले.

हेही वाचा : दोन जिल्ह्यांचे पालकमंत्री तात्पुरते बदलले, कॉंग्रेसच्या ‘या’ मंत्र्यांना जबाबदारी

राज्यातील कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणा सर्व स्तरावर उत्तम काम करत असल्याचं सांगून उपमुख्यमंत्र्यांनी यंत्रणेचं कौतुक केलं आहे. राज्याच्या अन्न आणि नागरी पुरवठा विभागामार्फत 7 कोटी नागरिकांना तीन महिन्यांसाठी 2 रुपये प्रतिकिलो दराने गहू आणि 3 रुपये प्रतिकिलो दराने तांदूळ रेशन दुकानांवरुन देण्यात येत आहे. केंद्र सरकारकडून जाहीर झालेल्या 5 किलो मोफत तांदळाचं वाटपही सुरु आहे, असं अजित पवारांनी लिहिलं आहे. (Ajit Pawar on Ration Shop Grocery Distribution)

ज्यांच्याकडे केशरी कार्ड आहे त्यांच्यासाठी 8 रुपये प्रतिकिलो दराने गहू आणि 12 रुपये प्रतिकिलो दराने तांदूळ वाटपाचा निर्णय घेतला आहे. राज्यात सर्वत्र धान्यवाटप सुरु असून काही जिल्ह्यांमधून येणाऱ्या तक्रारींमुळे शिधावाटप यंत्रणेची, शासनाची नाहक बदनामी होत आहे. ही बदनामी टाळली पाहिजे. त्यासाठी आपापल्या जिल्ह्यातील शिधावाटप यंत्रणेत गैरप्रकार होणार नाहीत याची काळजी घ्यावी. गरीबांना त्यांच्या हक्काचं अन्नधान्यं सुरळीत व विनातक्रार मिळेल हे सुनिश्चित करावं. संबंधित पालकमंत्र्यांनी यात व्यक्तीश: लक्ष घालावे, अशी आवाहनवजा विनंती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व पालकमंत्र्यांना केली आहे.

शिधावाटप यंत्रणेसंदर्भातील सूचना व तक्रारींसाठी राज्य शासनाने राज्यस्तरावर 1800224950 आणि 1967 हे टोल-फ्री दूरध्वनी क्रमांक दिले आहेत. त्यावर संपर्क साधून सूचना द्याव्यात, तक्रारी दूर कराव्यात, असंही त्यांनी पत्रात म्हटलं आहे.

(Ajit Pawar on Ration Shop Grocery Distribution)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें