बिग बी अमिताभ बच्चन तब्बल 25 वर्षांनी मराठी सिनेमात झळकणार!

बिग बी अमिताभ बच्चन तब्बल 25 वर्षांनी मराठी सिनेमात झळकणार!

मुंबई: बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी हिंदी सिनेसृष्टीतच नाही, तर विविध भाषांमध्ये त्यांच्या अभिनयाची छाप उमटवली आहे. आता त्यांच्या मराठी चाहत्यांसाठी खुशखबर आहे. बिग बी हे तब्बल 25 वर्षांनी मराठी सिनेमात दिसणार आहेत. दिग्दर्शक मिलिंद लेले यांच्या ‘ए बी आणि सी डी’ या सिनेमात ते भूमिका साकारणार आहेत.

या सिनेमात बिग बी महत्वाच्या भूमिकेत दिसतील. या सिनेमाचं चित्रीकरण येत्या 20 मे पासून सुरु होत आहे. बिग बी या सिनेमाच्या शूटिंगसाठी सलग 5 दिवस देणार आहेत. म्हणजेच ते सेटवर सलग 5 दिवस दिसतील.

या सिनेमात त्यांच्यासोबत अग्निपथ आणि अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम केलेले त्यांचे जवळचे मित्र ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखलेदेखील प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. अमिताभ बच्चन हे विक्रम गोखलेंच्या मित्राची भूमिका साकारणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे ‘ए बी आणि सी डी’ हा सिनेमा दोन मित्रांच्या आयुष्यावर आधारित ही कथा असेल असा अंदाज आहे.

अमिताभ बच्चन यांनी याआधी 1994 मध्ये ‘अक्का’ नावाच्या मराठी चित्रपटात छोटीशी भूमिका साकारली होती. ‘बिग बी’ यांचे मेक अप आर्टिस्ट दीपक सावंत यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. आता मराठमोळा दिग्दर्शक मिलिंद लेले बिग बींच्या अभिनयातून प्रेक्षकांना काय नवीन देतात, याचीच सध्या मराठी सिनेसृष्टीत चर्चा सुरु आहे.

Published On - 6:00 pm, Fri, 10 May 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI