जिथे आहे तिथेच थांबा; तुमच्या राहण्या-खाण्याची हमी आमची : अनिल देशमुख

आपल्या सर्वांची राहण्याची सोय आणि पुरेसे अन्न देण्याची हमी शासनाच्यावतीने आमची आहे, असं आश्वासन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलं आहे (Anil Deshmukh assure poor families amid lockdown).

जिथे आहे तिथेच थांबा; तुमच्या राहण्या-खाण्याची हमी आमची : अनिल देशमुख

मुंबई : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे शासनाला लॉकडाऊनचा कार्यकाळ वाढवावा लागला आहे. अशा कठीण परिस्थितीमध्ये कष्टकरी, स्थलांतरित मजुरांनी गावाकडे परतण्याचा प्रयत्न करू नये. त्यांनी आहे तेथेच राहावे. आपल्या सर्वांची राहण्याची सोय आणि पुरेसे अन्न देण्याची हमी शासनाच्यावतीने आमची आहे, असं आश्वासन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलं आहे (Anil Deshmukh assure poor families amid lockdown). तसेच या कठीण प्रसंगी आपण सहकार्य करावे, असं आवाहनही त्यांनी केलं.

गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले, “कोरोना संसर्गाच्या या कठीण काळात सरकारी यंत्रणा, पोलिस यंत्रणा आणि आरोग्य यंत्रणा तुमच्यासोबत आहे. याची खात्री बाळगा. सरकार आपल्या अन्न, निवाऱ्याची आणि आरोग्य सुविधा याची पुरेशी व्यवस्था करत आहे . केवळ आपले राज्य, आपला देश नव्हे तर संपूर्ण जगावर हे संकट आलेले आहे. अशा कठीण परिस्थितीत आपण गावी परतण्याचा प्रयत्न केल्यास कदाचित वाटेतच आपणास अडविले जाईल. गावात घेतले न गेल्यास आपणावर अधिक कठीण प्रसंग ओढवेल. दुर्दैवाने साथीला बळी पडण्याचा धोकाही वाढेल. म्हणून आपण आहात तिथेच राहा.”


दरम्यान, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कोरोनाच्या या काळात समाजमाध्यमे हाताळताना प्रत्येकाने विशेष दक्षता घेण्याचंही आवाहन केलं आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव संपूर्ण जगात असून आपल्या राज्यातही त्याचे परिणाम दिसून येत आहेत. समाजमाध्यमाद्वारे या संदर्भात चुकीची माहिती, दहशत व भीती पसरवणाऱ्या बातम्या समाजात पसरु नयेत, कळत-नकळत अथवा जाणीवपूर्वक पसरवलेल्या संदेशांद्वारे जातीय तेढ निर्माण होऊ नये यासाठी शासनाने समाजमाध्यमांकरता विशेष मार्गदर्शिका प्रकाशित केली आहे. त्याचे सर्वांनी पालन करावे, असंही अनिल देशमुख म्हणाले.

सोशल मीडियासाठी मार्गदर्शिका प्रकाशित

सध्याच्या कोरोना प्रादुर्भाव आणि संबंधित लॉकडाउनच्या काळात समाजमाध्यमांवर चुकीचे मेसेजेस फिरत आहेत. त्यात प्रामुख्याने व्हॉट्सअॅपवर अफवा पसरवणारे चुकीचे मेसेजेस, फोटोज, व्हिडिओज,पोस्ट्स पाठवून व कोरोना प्रादुर्भावाला धार्मिक रंग देऊन समाजात अशांतता पसरवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या पोस्ट्स सारासार विचार न करता फॉरवर्ड केल्या जात आहेत. महाराष्ट्र सायबरने व्हॉट्सअॅप या मेसेजिंग प्लॅटफॉर्मवरील सर्व ग्रुप सदस्य, ग्रुप अॅडमिन्स, ग्रुप निर्माते (creators/owners) यांच्यासाठी एक मार्गदर्शिका प्रसारित केली आहे. यानुसार व्हॉट्सअॅप वापरताना विशेष दक्षता घ्याव्यात,असंही देशमूख यांनी नमूद केलं.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI