BHARAT BANDH | शेतकऱ्यांचा राज्यभर एल्गार; बाजार ओस, शेतकरी रस्त्यावर, केंद्र सरकारविरोधात चौकाचौकात निदर्शने

केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या बंदला राज्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. (Bharat bandh reaction across in maharashtra)

BHARAT BANDH | शेतकऱ्यांचा राज्यभर एल्गार; बाजार ओस, शेतकरी रस्त्यावर, केंद्र सरकारविरोधात चौकाचौकात निदर्शने

मुंबई: केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला राज्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. बळीराजाने मोटार आणि ट्रॅक्टर रॅली काढून सरकारचा निषेध नोंदवताना काही ठिकाणी केंद्र सरकारच्या पुतळ्याचे दहन केले आहे. आज राज्यातील सर्वच कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शुकशुकाट होता. काही ठिकाणी व्यापाऱ्यांनीही बंदमध्ये भाग घेतल्याने मार्केट बंद होते. राजकीय पक्षांनीही या बंदमध्ये भाग घेऊन अनेक ठिकाणी निदर्शने केली. राज्यात अपवाद वगळता सर्वच ठिकाणी वाहतूक व्यवस्था सुरळीत सुरू होती. आजच्या बंदला राज्यात कुठेही गालबोट लागले नाही. शेतकऱ्यांनी शांततेत बंद पाळून सरकारच्या आडमुठ्या धोरणांचा निषेध नोंदवला. (Bharat bandh reaction across in maharashtra)

सांगली बंद, मोटारसायकल रॅली अडवली

सांगलीत स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि सर्व पक्षीय संघटनांनी आज सांगली बंदची हाक दिली होती. यावेळी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी मोटारसायकल रॅली काढली होती. पोलिसांनी ही रॅली अडवण्याचा प्रयत्न केला असता पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली. त्यामुळे आंदोलकांनी रास्ता रोको करत आपला निषेध नोंदवला.

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबातील महिलांचे ठिय्या

यवतमाळ जिल्ह्यामध्ये सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या बोथबोडन या गावांमध्ये झाल्या आहेत. राज्य व केंद्र शासनाने अनेक योजना शेतकऱ्यांसाठी लागू केल्या. मात्र, त्याचा कुठलाच फायदा या शेतकऱ्यांना झाला नाही. त्यामुळे या गावात आतापर्यंत 29 शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली. तर नुकतेच केंद्र शासनाने पारित केले कृषी कायदे शेतकरी विरोधी असल्याने पुन्हा देशोधडीला लागणार आहे. या कायद्याच्या विरोधात दिल्ली येथे मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू आहे. यात आपलाही खारीचा वाटा असावा यासाठी येथील आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिलांनी ठिय्या आंदोलन करून दिल्लीच्या आंदोलनाला समर्थन दिले आहे.

कृषी कायद्याच्या विरोधात पंजाब, हरियाणा, राजस्थान, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रातील शेतकरी या ठिकाणी जाऊन आंदोलन करीत आहेत. मात्र, ग्रामीण भागात असलेल्या या शेतकरी कुटुंबातील महिला दिल्लीमधील आंदोलनात सहभागी होऊ शकत नाही. त्यामुळे त्यांनी गावातूनच आंदोलन करून या कृषी कायद्याची होळी केली. तसेच जोपर्यंत हा कायदा रद्द होणार नाही तोपर्यंत या आंदोलनाला समर्थन राहणार असल्याचा निर्धार या आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिलांनी केला आहे.

नंदूरबारमध्ये ठिय्या

नंदुरबारमध्ये सत्यशोधक कष्टकरी शेतकरी सभेने शहरातील नेहरू चौकात ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनात आदिवासी शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले असून केंद्र शासनाने लागू केलेले कृषी कायदे त्वरित रद्द करावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली. नंदुरबार वगळता या सर्व कडे कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. नंदुरबार शहरात बंदला संमिश्र प्रतिसाद आहे. संघटनांच्यावतीने आज दिवसभर जिल्हाभरात निदर्शने करण्यात येणार आहेत. एकूणच ग्रामीण भागातील शेतकरी कृषी कायद्यांच्या विरोधात आक्रमक झाल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे.

कृषी उत्पन्ना बाजार समित्यात शुकशुकाट

बंदच्या पार्श्वभू्मीवर कृषी उत्पन्न बाजारामध्ये कृषी माल पाठवू नये, असे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनानुसार बाजारामध्ये गाडया पाठवण्यात आल्या नाहीत. फक्त लांबच्या गावातून आलेल्या गाडया बाजारपठेत आल्या. आज एपीएमसी मार्केटमध्ये एकूण 231 वाहनांची आवक बाजारात झाली होती. भाजीपाला बाजारात 13, कांदा बटाटा मार्केट 39, फळ बाजार मध्ये 43, मसाला मार्केट मध्ये 26, धान्य मार्केट मध्ये 110 गाडयाची आवक झाली. मात्र भाजीपाला व्यतिरिक्त कोणताच माल विक्री करण्यात आला नाही.

जेजुरीत कडकडीत बंद

खंडेरायाची नगरी असलेल्या जेजुरीत किसान क्रांती मोर्चाने कृषी कायद्याविरोधात उग्र आंदोलन केले. यावेळी मोदी सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. नवीन कृषी कायदा शेतकरी विरोधी असून केंद्र सरकारने त्वरित कायदा रद्द करावा अशी मागणी यावेळी आंदोलकांकडून करण्यात आली. आज सर्व व्यापारी युनियन, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आदी पक्षसंघटनांनी आजच्या बंदला पाठिंबा दिल्यामुळे जेजुरीतील सर्व बाजारपेठांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला.

बारामतीत दुकाने बंद, वाहने सुरू

बारामतीत आजच्या बंदला संमिश्र प्रतिसाद पाहायाला मिळाला. बंदमुळे बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीत शुकशुकाट होता. सोबतच सासवड, इंदापूर आणि दौड कृषी उत्पन्न बाजार समिती देखील बंद होत्या. भिगवनचे मच्छी मार्केट देखील बंद ठेवण्यात आले आहे. बारामतीत शहरातील दुकाने बंद ठेवण्यात आली असली तरी रस्ते वाहतूकीवर मात्र बंदचा कोणताही परिणाम झालेला नाही.

नागपुरात शीख समुदाय रस्त्यावर

शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ट्रान्सपोर्ट किसान एकता आणि नागपूर गुरुद्वारा कमिटीने आज नागपुरात जोरदार आंदोलन सुरू केले आहे. शीख समुदायातील नागरिकांनी या आंदोलनात मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले आहेत. ऑटोमोटिव्ह चौकात आंदोलन सुरू झालं असून या ठिकाणी पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला आहे. नागपूरच्या सीताबर्डी मार्केट काही दुकानदारांनी दुकाने बंद ठेवून शेतकऱ्यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.

ट्रक टर्मिनलमध्ये ट्रकांच्या रांगाच रांगा

आजच्या बंदचा फटका एपीएमसी मार्केटलाही बसला आहे. राज्यातून ठिकठिकाणाहून आलेला शेतमाल सध्या वाशी एपीएमसी येथे ट्रक टर्मिनलमध्येच आहे. हा माल घेऊन असंख्य ट्रक उभ्या असल्याने ट्रक टर्मिनलमध्ये हजारोंच्या संख्येने भरलेले व रिकामे ट्रक उभे आहेत. एकीकडे एपीएमसीतील पाचही बाजारपेठ बंद असल्याने एपीएमसी परिसरात शुकशुकाट पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे कोट्यवधी रुपयांची उलाढाल होणाऱ्या बाजारसमितीचे पूर्ण व्यवहार ठप्प झाले आहेत.

नाशिकमध्ये पोलिसांचा फौजफाटा

नाशिकमध्ये बंदला चांगला प्रतिसाद बघायला मिळतोय. शहरातील मुख्य बाजारपेठेत कडकडीत बंद ठेवण्यात आली आहे. तसेच बाजार पेठेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. या बंदमधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या असून बंदला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

अमरावतीत 100 टक्के बंद

अमरावती जिल्ह्यात 100 टक्के भारत बंद पाळण्यात आला आहे. जिल्ह्यातील कृषी केंद्रांसह बाजारपेठा आणि दुकाने सकाळपासूनच बंद आहेत. सर्वपक्षीय आंदोलकांनी रस्त्यावर उतरून बंदला पाठिंबा देतानाच सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

बीडमध्ये बंद यशस्वी

गेल्या 12 दिवसांपासून सुरू असलेल्या दिल्ली येथील शेतकऱ्यांच्या आंदोलनांना समर्थनार्थ आज भारत बंदची घोषणा करण्यात आलीय. बीड जिल्ह्यात माजलगाव, बीड, परळीतील व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाळून शेतकरी आंदोलनाला समर्थन दिले आहे. लॉकडाऊननंतर पहिल्यांदाच आज बीड जिल्ह्यातील अनेक तालुके कडकडीत बंद असलेली पाहावयास मिळाली. परळीमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी कारंजा चौक येथे आंदोलन केले. यावेळी भाजपविरोधी घोषणाबाजी करण्यात आली. परळीत बंद ला संमिश्र प्रतिसाद पहावयास मिळाला.

कल्याणध्ये 100 आंदोलक ताब्यात

भारत बंदच्या पार्श्वभूमीवर कल्याणमध्ये सकाळी 10 च्या नंतर राजकीय पक्षांचे कार्यकर्ते रस्त्यांवर उतरले. कल्याण पश्चिमेत शिवसेना पदाधिकारी अरविंद मोरे आणि राष्ट्रवादीचे कार्यकत्यांनी दुकाने बंद करण्यास सुरुवात केली. कल्याण मलंगरोडवर शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड यांनी आंदोलन केले. कल्याण पूर्व शिवसेना शाखेतर्फे दुकाने बंद करण्यात आली. त्यानंतर कल्याण पूर्वेत काँग्रेस जिल्हा अध्यक्ष सचिन पोटे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनादरम्यान 50 कांग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. कल्याण पूर्वेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून देखील आंदोलन आणि निदर्शने करण्यात आले. कल्याणमध्ये आतापर्यंत पोलिसांनी 100 आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे.

लातूरमध्ये व्यापाऱ्यांचा स्वत:हून बंद

लातूरमध्ये भारत बंदला पाठिंबा देण्यासाठी व्यापाऱ्यांनी स्वतःहून बाजारपेठा बंद ठेवल्या. सामान्य दुकानांसह आडत बाजारही बंद ठेवण्यात आला आहे. पहाटे पासून सुरू होणारी भाजीपाला बाजारपेठही बंद ठेवण्यात आली होती. लातूरच्या रस्त्यांवर आज नेहमीपेक्षा वाहनांची वर्दळ कमी होती. तर बससेवाही काळजी घेऊन सुरू ठेवण्यात आली आहे. लातूरमध्ये जनतेने स्वतःहून बंदला पाठिंबा दिल्याचे चित्र आहे, आगोदरच लॉकडाऊनमध्ये आर्थिक नुकसान झालेल्या व्यापारी आणि इतर लोकांना आता त्यांचं नुकसान नको आहे. त्यामुळे ते स्वतःहून बंदमध्ये सहभागी होताना दिसले. तर उदगीर, निलंगा आणि अहमदपूरमध्ये बंदला संमिश्र प्रतिसाद मिळतो आहे.

अस्लम शेख यांच्या नेतृत्वाखाली मालाडमध्ये निदर्शने

केंद्र सरकारच्या कुषी धोरणांविरोधात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला समर्थन देण्यासाठी व कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी मालाडमध्ये काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरुन जोरदार निदर्शने केली. यावेळी मालवणी व मालाड रेल्वे स्थानक परिसरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. केंद्र सरकारने मंजूर केलेले हे तीन कायदे शेतकऱ्यांना स्वत:च्याच भूमीत मजूर बनवणारे आहेत. या कायद्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना किमान समर्थन मुल्य (M.S.P) देणारी कृषी उत्पन्न बाजार समिती (A.P.M.C) व्यवस्था संपवण्याचा केंद्र सरकारचा डाव आहे, असा आरोप शेख यांनी यावेळी केला. ‘करार शेती’ (Contract Farming)चे आजवर जेवढे प्रयोग देश-विदेशात झाले ते सर्व फसल्याची उदाहरणं ताजी असताना पुन्हा नव्याने काही बड्या उद्योगपतींच्या फायद्यासाठी ‘करार शेतीचा’ (Contract Farming) घाट घातला जातो आहे. १९५५ चा अत्यावश्यक वस्तू कायद्यात बदल करुन बड्या कंपन्यांना साठेबाजीसाठी केंद्र सरकारने रान मोकळं करुन दिलं आहे, असा आरोपही त्यांनी केला.

अब्दुल सत्तार रस्त्यावर

औरंगाबादमध्ये शिवसेनेचे नेते आणि मंत्री अब्दुल सत्तारही रस्त्यावर उतरले. त्यांनी औरंगाबाद-जळगाव मार्गावर तासाभरापासून रास्तारोको केला. यावेळी शेकडो शिवसैनिक आणि शेतकरी उपस्थित होते. केंद्राने शेतकऱ्यांचं ऐकावं आणि त्वरीत कृषी कायदे रद्द करावेत, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

मुरबाडमध्ये संमिश्र प्रतिसाद

मुरबाड तालुक्यात भारत बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला असून सकाळी 9 पर्यंत दुकाने बंद ठेवण्यात आली होती. परंतु 10 वाजेनंतर नंतर 50 % दुकाने उघडली असून एमआयडीसीमधील कारखानेही 50% सुरू होती. मुरबाडमधील मुख्य बाजरपेठेत सकाळी 10 नंतर नागरिकांची रहदारी वाढताना दिसली.

नवी मुंबईत टोलनाक्यांवर तीनदा रास्तारोको

नवी मुंबईतही शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ सर्वपक्षीय कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. वाशी टोलनाक्यावर आंदोलकांनी रास्तारोको करत रोष व्यक्त केला. एकदा नव्हे तर तीन वेळा या टोलनाक्यावर रास्तारोको करून जोरदार आंदोलन केलं. काही आंदोलकांनी सायन-पनवेल महामार्गावरही रास्तारोको केल्याने वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या.

बुलडाण्यात आमदार, खासदार रस्त्यावर

बुलडाण्यात आमदार, खासदारही शेतकरी आंदोलनात सहभागी झाले. बुलडाण्यात शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांच्या नेतृत्वात जोरदार आंदोलन करण्यात आले. शिवसैनिकांनी नागपूर-मुंबई महामार्ग रोखून धरत आपला रोष व्यक्त केला. त्यामुळे या भागात वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती.

बच्चू कडू कडाडले

लॉकडाऊनच्या काळात न दिसणाऱ्या कोरोना विषाणूमुळे आपण बंद ठेवला. मात्र आता हा दिसणारा अतिरेक आहे. दर दिवसा शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. शेतकऱ्यांच्या बाबतीतील केंद्राची भूमिका एखाद्या लुटारू सारखी राहिली आहे. शेतकऱ्यांना लुटण्याचा एकमेव कार्यक्रम केंद्र सरकारने सुरू केला आहे, अशी टीका राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केली. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दिल्लीला जात असताना बच्चू कडू यांनी ही तोफ डागली. (Bharat bandh reaction across in maharashtra)

अबू आझमींची बैलगाडी रॅली

भारत बंदला मुंबईतल्या अनेक भागात थंड प्रतिसाद मिळालेला पाहायला मिळत आहे. मुंबईतल्या गोवंडीच्या शिवाजीनगर या ठिकाणी अनेक दुकानं सुरू असल्याचे पाहायला मिळाले. मात्र, या विभागातील समाजवादी पक्षाचे आमदार अबू असीम आझमी यांनी चक्क बैलगाडीत बसून एक रॅली काढली आणि शिवाजीनगर चौकात येऊन रास्ता रोको सुद्धा केला. मोदी सरकारच्या विरोधात घोषणा देत शेतकरी विरोधी कायदा मागे घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली. समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी यावेळी थोडा वेळ रस्त्यावर बसून रस्ता रोको केला. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी पोलिसांनी अबू आझमी यांना बैल गाडीतून उतरवून गाडीत घातले आणि पोलीस ठाण्यात नेले.

ठाण्यात ट्रॅक्टर, नांगर आंदोलन

दिल्ली येथे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ठाण्यातील जिल्हाधिकारी कार्यालया बाहेर जोरदार आंदोलन करत राष्ट्रवादी काँग्रेसने केंद्र आणि मोदी सरकारचा निषेध केला. या आंदोलनात ट्रॅक्टर, नांगरसह शेतकरी देखील सहभागी झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी ठाणे पोलिसांनी महिला आणि पुरुष कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले. (Bharat bandh reaction across in maharashtra)

संबंधित बातम्या:

संप यशस्वी झाला, फेल झाला की संमिश्र राहीला?

भारत_बंद – महाराष्ट्रातील Live Updates | महाविकास आघाडीतर्फे वाशीत निदर्शने

BHARAT BAND | दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल नजरकैदेत! दिल्लीतील आजची स्थिती काय?

(Bharat bandh reaction across in maharashtra)

Published On - 3:54 pm, Tue, 8 December 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI