अर्णव गोस्वामींना अंतरिम जामीन नाहीच, कोर्टाने अर्ज फेटाळला; तळोजातील मुक्काम कायम

अनव्य नाईक आत्महत्याप्रकरणात अटकेत असलेले पत्रकार अर्णव गोस्वामी यांचा अंतरिम जामिनासाठीचा अर्ज फेटाळण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. (Bombay HC rejects Arnab Goswami's interim bail plea)

अर्णव गोस्वामींना अंतरिम जामीन नाहीच, कोर्टाने अर्ज फेटाळला; तळोजातील मुक्काम कायम

मुंबई: अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणात अटकेत असलेले पत्रकार अर्णव गोस्वामी यांचा अंतरिम जामिनासाठीचा अर्ज फेटाळण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता अर्णव यांना जामिनासाठी सत्र न्यायालयात धाव घ्यावी लागणार असून सत्र न्यायालयातून जामीन मिळेपर्यंत त्यांना तळोजा तुरुंगातच राहावं लागणार आहे. (Bombay HC rejects Arnab Goswami’s interim bail plea)

अर्णव गोस्वामी यांच्यावतीने त्यांच्या वकिलाने एफआयआर रद्द करण्यासाठी आणि जामीन मिळण्यासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला होता. तीन दिवस त्यावर दोन्ही बाजूने युक्तिवाद करण्यात आला. त्यानंतर आज कोर्टाने हा अर्ज फेटाळून लावत अर्णव यांना जामीन देण्यास नकार दिला. हे एक्सट्रा ऑर्डिनरी प्रकरण नाही. त्यामुळे जामिनासाठी ज्या प्रचलित यंत्रणा आणि पद्धती आहे. त्यानुसारच अर्ज करून जामीन घेण्यात यावा, असे निर्देश कोर्टाने दिले आहेत. या प्रकरणात जामीन दिल्यास ही प्रथा पडून जाईल आणि कोणीही उठसूठ उच्च न्यायालयात येऊन जामिनासाठी अर्ज करेल, असं मतही कोर्टाने व्यक्त केलं. तसेच जामिनासाठी सत्र न्यायालयात जाण्याचे निर्देशही कोर्टाकडून देण्यात आले आहेत.

कोर्टाच्या या स्पष्ट निर्देशामुळे आता अर्णव यांच्या वकिलांना जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज करावा लागणार आहे. त्यानंतर त्यावर सत्र न्यायालय निर्णय देईल. तोपर्यंत अर्णव यांना तळोजा तुरुंगातच राहावं लागणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

राज्यपालांचा देशमुखांना फोन

दरम्यान, अर्णव यांना अटक झाल्यापासून भाजप नेते त्यांना जामीन देण्याची सातत्याने मागणी करत आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रविवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेटही घेतली होती. यानंतर आज लगेचच राज्यपालांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी दुरध्वनीवरून चर्चाही केली.

त्यावेळी अर्णव गोस्वामी यांची सुरक्षा आणि आरोग्याबाबत राज्यपालांनी चिंता व्यक्त केली. अर्णव गोस्वामी यांना त्यांच्या कुटुंबीयांना भेटून दिले जावे, असेही त्यांनी सांगितले. याशिवाय, अर्णव गोस्वामी यांच्या घरात ज्याप्रकारे पोलिसांचा फौजफाटा शिरला आणि त्यांना अटक करण्यात आली, याविषयीही राज्यपालांनी गृहमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त केल्याचे समजते.

 

संबंधित बातम्या:

हायकोर्टाने स्वत: दखल घ्यावी, अर्णव गोस्वामींच्या धक्काबुक्कीची चौकशी करावी : देवेंद्र फडणवीस

अर्णव गोस्वामींच्या जीवाला धोका असल्यामुळे राज्यपालांना गृहमंत्र्यांशी बोलावे लागले: राम कदम

राज्यपालांनी अर्णव गोस्वामींची चिंता करु नये, सरकार त्यांची योग्यप्रकारे काळजी घेतेय: भुजबळ

(Bombay HC rejects Arnab Goswami’s interim bail plea)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI