तुरुंगातून पळण्यासाठी स्वतःच्या मुलीचा वेश, कैद्याचा डाव हाणून पाडला

तुरुंगातून पळून जाण्यासाठी ब्राझीलमधील कैद्याने स्वतःच्या मुलीप्रमाणे वेशांतर केलं. मात्र तुरुंगातील अधिकाऱ्यांनी त्याचा पर्दाफाश करत त्याला पुन्हा तुरुंगात डांबलं.

तुरुंगातून पळण्यासाठी स्वतःच्या मुलीचा वेश, कैद्याचा डाव हाणून पाडला

रिओ दि जेनेरिओ : तुरुंगातून पळ काढण्यासाठी कैदी काय शक्कल लढवतील, याचा नेम नाही. ब्राझीलमध्ये एका गँगस्टरने तुरुंगातून पळण्यासाठी आपल्या मुलीप्रमाणे वेशांतर केलं. मात्र चतुर पोलिसांनी त्याचा डाव हाणून पाडला. रिओ दि जेनेरिओ तुरुंगातर्फे त्याच्या कारनाम्याचा व्हिडिओ जारी करण्यात आला आहे.

ब्राझीलमध्ये ड्रग तस्करी केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या गँगस्टरची रवानगी राजधानी रिओ दि जेनेरिओतील तुरुंगात झाली होती. हा गँगस्टर आहे 41 वर्षांचा क्लोविनो डा सिल्वा उर्फ शॉर्टी. तुरुंग फोडण्यासाठी गज कापणे, तुरुंगातील पोलिस अधिकाऱ्यांना फूस लावणे, यासारखे प्रकार काही कैदी करताना दिसतात. मात्र क्लोविनोने डोकं लढवून एक प्लॅन आखला.

क्लोविनोची 19 वर्षांची मुलगी त्याला भेटण्यासाठी जेलमध्ये आली. त्याची मुलगी आली, तीच संपूर्ण तयारीनिशी. लेकीची भेट झाल्यावर क्लोविनोने तिचं हुबेहूब वेशांतर केलं. तिचे कपडं घालणं, ही तर पहिली पायरी. त्याने मुलीचा सिलीकॉन मास्क घातला. तिच्या केशरचनेप्रमाणे विगही डोक्यावर चढवला आणि सुरु झाला थरार.

मुलीला तुरुंगात सोडून तो पळ काढणार होता. कारण निष्पाप मुलीला नंतर सोडवून आणणं फारसं कठीण नव्हती. त्यामुळे तिला तुरुंगात ठेवून वेशांतर केलेला क्लोविनो बाहेर पडायची तयारी करु लागला. मात्र तुरुंगातील पोलिस अधिकारी काही साधेसुधे नव्हते. त्यांनी क्लोविनोचा पर्दाफाश केला. त्याने कशाप्रकारे वेशांतर केलं, याचा व्हिडिओही शूट करण्यात आला. अखेर क्लोविनोला पुन्हा तुरुंगात डांबण्यात आलं.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI