उपवास सोडण्यासाठी झोमॅटोवरुन बटर पनीर मागवलं, पुण्यातल्या हॉटेलनं चिकन पाठवलं

उपवास सोडण्यासाठी जेवण ऑर्डर केलेल्या एका ग्राहकाला पनीरऐवजी दोनदा बटर चिकन डिलिवरी केल्याबद्दल झोमॅटो आणि हॉटेलला 55 हजारांना दंड ठोठावण्यात आला आहे. पुण्यातील हिंजवाडी परिसरातील प्रीत पंजाबी स्वाद हॉटेलमध्ये ही घटना घडली आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 17:03 PM, 6 Jul 2019
उपवास सोडण्यासाठी झोमॅटोवरुन बटर पनीर मागवलं, पुण्यातल्या हॉटेलनं चिकन पाठवलं

पुणे : उपवास सोडण्यासाठी बटर चिकन ऑर्डर केलेल्या एका ग्राहकाला दोनदा बटर चिकन डिलिवरी केल्याबद्दल झोमॅटो आणि हॉटेलला 55 हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. षण्मुख देशमुख असे दंड ठोठावणाऱ्या वकिलाचे नाव आहे. पुण्यातील प्रित पंजाबी स्वाद हॉटेलमध्ये ही घटना घडली आहे. दरम्यान पुण्यातील अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने दंडाची रक्कम 45 दिवसांच्या आत ग्राहकाला देण्याचे आदेश दिले आहे. रिपल

नेमकं प्रकरण काय?

षण्मुख देशमुख हे मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठामध्ये वकील आहेत. ते गेल्यावर्षी 31 मे 2018 रोजी काही कामानिमित्त पुण्यात गेले होते. देशमुख हे गणेश भक्त असल्याने त्यांचा त्या दिवशी उपवास होता. त्यामुळे उपवास सोडण्यासाठी त्यांनी झोमेटॉमार्फत प्रीत पंजाबी स्वाद हॉटेलमधून त्यांनी पनीर बटर मसाला मागवलं होतं.

थोड्या वेळाने झोमॅटोच्या एका डिलीव्हरी करणाऱ्या मुलाने त्यांना त्यांचे पार्सल आणून दिलं. त्यांनी जेवणाचे पार्सल उघडले असता, ते पनीर नसून चिकन असल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी तातडीने फोन करुन पार्सल देणाऱ्या झोमॅटोच्या डिलीव्हरी बॉयला बोलवलं आणि त्याबाबतची माहिती दिली.

त्यावेळी त्या डिलीव्हरी बॉयने “माझा यात काहीही दोष नाही. आम्हाला जे पार्सल दिले जातं, ते न उघडता आम्ही संबंधित ग्राहकापर्यंत पोहोचवणे आमच काम असते असे त्याने सांगितले.”

यानंतर देशमुख यांनी प्रीत पंजाबी स्वाद हॉटेलच्या मॅनेजरशी संपर्क साधला. त्यावेळी मॅनेजरने दुसरे जेवण पाठवत असल्याचं सांगितलं. मात्र तेव्हाही हॉटेलने त्यांना पनीर ऐवजी चिकन पाठवले. यानंतर काही दिवसांनी याप्रकरणी षण्मुख देशमुख यांनी वकील संदेश गुंडगे यांच्याद्वारे झोमॅटो आणि हॉटेलला कायदेशीर नोटीस पाठवली. या नोटीसद्वारे धार्मिक भावना दुखावल्याचं सांगत त्यांनी नुकसान भरपाई देण्याची मागणी केली.

ग्राहक मंचाकडे तक्रार

मात्र प्रीत पंजाबी स्वाद आणि झोमॅटोकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी पुण्यातील ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे झोमॅटो आणि हॉटेल विरोधात तक्रार दाखल केली. या प्रकरणी नुकसान भरपाई म्हणून 5 लाख आणि मानसिक त्रासाबद्दल 1 लाख रुपयाची मागणी केली.

दरम्यान या प्रकरणी ग्राहक मंचाकडून झोमॅटो आणि पुण्यातील प्रीत पंजाबी स्वाद हॉटेलवर कारवाई करत नुकसान भरपाई म्हणून 50 हजार आणि मानसिक त्रासाबद्दल 5 हजार असा एकूण 55 हजार रुपये दंड ठोठावला आहे. हा दंड 45 दिवसाच्या आत देण्यात यावा असे आदेश दिले आहे. तसेच जर याप्रकरणी विलंब केल्यास त्यावर 10 टक्के व्याज आकारण्यात येईल असेही यात म्हटले आहे. दरम्यान याप्रकरणी आम्हाला कोणत्याही प्रकारचे आदेश मिळाले नाहीत, असं झोमॅटोचे व्यवस्थापक विपुल सिन्हा यांनी म्हटलं आहे.