साडेतीन लाखात सिनेमा, 45 लाखांची कमाई, हॉरर चित्रपटांचे सम्राट ‘रामसे बंधूं’पैकी श्याम रामसे यांचं निधन

1972 साली रामसे बंधूंनी अवघ्या साडेतीन लाखात 'दो गज जमीन के नीचे' या चित्रपटाची निर्मिती केली होती. या चित्रपटाने 45 लाखांचा गल्ला जमवला होता.

साडेतीन लाखात सिनेमा, 45 लाखांची कमाई, हॉरर चित्रपटांचे सम्राट 'रामसे बंधूं'पैकी श्याम रामसे यांचं निधन

मुंबई : भूताच्या चित्रपटांसाठी प्रख्यात असलेल्या ‘रामसे बंधूं’पैकी, दिग्दर्शक श्याम रामसे यांचं निधन (Director Shyam Ramsay Passed Away) झालं. बुधवारी सकाळी छातीदुखीचं निमित्त होऊन त्यांची प्राणज्योत मालवली. मुंबईत वयाच्या 67 व्या वर्षी रामसेंनी जगाचा निरोप घेतला.

छातीदुखीचा त्रास होत असल्यामुळे श्याम रामसे यांना मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र बुधवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला (Director Shyam Ramsay Passed Away).

श्याम रामसे यांना हॉरर चित्रपटांचा जनक मानलं जात असे. त्यांचे वडील पाकिस्तानातील कराचीत राहत असत, मात्र फाळणीनंतर ते मुंबईत स्थायिक झाले.

रामसे कुटुंबातील सात भावंडांनी एकापेक्षा एक भयपटांची निर्मिती करुन प्रेक्षकांना अक्षरशः घाबरवून सोडलं होतं. कुमार रामसे, केशू रामसे, तुलसी रामसे, करण रामसे, श्याम रामसे, गंगू रामसे आणि अर्जुन रामसे असे सात रामसे बंधू कार्यरत होते

ज्येष्ठ बंधू तुलसी रामसे यांच्या साथीने श्याम यांनी 1972 साली ‘दो गज जमीन के नीचे’ या चित्रपटाची निर्मिती केली होती. या चित्रपटाचं चित्रिकरण अवघ्या 40 दिवसांत आटोपलं होतं. पैशासाठी नायकाशी लग्न करणारी तरुणी त्याचा प्रियकराच्या साथीने खून करते आणि त्याचा जमिनीखाली पुरते. त्यानंतर सुरु होणारा भूतांचा खेळ या सिनेमात पाहायला मिळाला होता.

अभिनेता नागार्जुनच्या फार्महाऊसवर मृतदेह आढळल्याने खळबळ

त्या काळात सिनेनिर्मितीसाठी तब्बल 50 लाखांपर्यंत खर्च येत असे, मात्र रामसे बंधूंनी अवघ्या साडेतीन लाखांमध्ये या चित्रपटाची निर्मिती केली होती. तो चित्रपट बरेच आठवडे हाऊसफुल चालला

‘वीराना’, ‘पुराना मंदिर’, ‘पुरानी हवेली’ आणि ‘बंद दरवाजा’ यासारख्या तीसपेक्षा अधिक चित्रपटांची निर्मिती रामसे भावंडांनी केली होती. रामसे ब्रदर्सनी अनेक प्रयोग सिनेनिर्मितीमध्ये केले होते. सत्तर आणि ऐशीच्या दशकातील काळ रामसेंनी आपल्या अनोख्या निर्मितीने गाजवला होता.

Published On - 12:00 pm, Thu, 19 September 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI