सगळ्यांनाच देशद्रोही ठरवता, मग देशात ‘हिंदुस्थानी’ आहे तरी कोण; मेहबुबा मुफ्तींचा भाजपला सवाल

सगळ्यांनाच देशद्रोही ठरवता, मग देशात 'हिंदुस्थानी' आहे तरी कोण; मेहबुबा मुफ्तींचा भाजपला सवाल

या देशात लोकशाही उरणार नाही, अशी व्यवस्था भाजपला निर्माण करायची आहे. | Mehbooba Mufti

Rohit Dhamnaskar

|

Nov 29, 2020 | 5:55 PM

श्रीनगर: भाजपकडून त्यांच्या सर्व विरोधकांना देशद्रोही ठरवले जाते. मग देशात हिंदुस्थानी आहे तरी कोण? फक्त भाजपचे कार्यकर्तेच राष्ट्रप्रेमी आहेत का, असा परखड सवाल जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि ‘पीडीपी’च्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती (Mehbooba Mufti) यांनी विचारला आहे. भाजपचे नेते मुस्लिमांना ‘पाकिस्तानी’, सरदारांना ‘खलिस्तानी’, सामाजिक कार्यकर्त्यांना ‘शहरी नक्षलवादी’, विद्यार्थी नेत्यांना ‘तुकडे तुकडे गँग’ आणि ‘राष्ट्रद्रोही’ म्हणतात. या न्यायाने प्रत्येकजण दहशतवादी किंवा राष्ट्रद्रोही ठरत असेल तर देशात हिंदुस्थानी आहे तरी कोण?, असे मेहबुबा मुफ्ती यांनी भाजपला विचारले. (PDP chief Mehbooba Mufti attack on Central govt)

मेहबुबा मुफ्ती यांना घरातून बाहेर निघण्यास मज्जाव करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर मेहबुबा मुफ्ती यांनी रविवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. या देशात लोकशाही उरणार नाही, अशी व्यवस्था भाजपला निर्माण करायची आहे. गुपकर आघाडीने (PAGD) जम्मू-काश्मीरमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यानंतर सरकारची दडपशाही वाढली आहे. आमच्या उमेदवारांवर बंधने घालण्यात आली असून त्यांना बाहेर पडण्यास मज्जाव केला जात आहे. आम्हाला प्रचार करुनच दिला नाही तर आम्ही निवडणूक जिंकणार कशी, असा सवाल मेहबुबा मुफ्ती यांनी केला.

केंद्र सरकारला मला ताब्यात घ्यायचे आहे. माझ्या पक्षावर बंदी टाकायची आहे. कारण, आम्ही केंद्र सरकारविरोधात आवाज उठवत आहोत. माझी सुटका झाल्यापासून मी अनुच्छेद 370 विषयी बोलत आहे. काश्मीरचा प्रश्न सुटल्याशिवाय ही समस्या सुटणार नाही. मंत्री येतील आणि जातील. केवळ निवडणुका घेणे हे सर्व समस्यांवरील उत्तर नाही, असेही मेहबुबा मुफ्ती यांनी सांगितले.

‘चीनशी चर्चा करता, मग पाकिस्तानशी का नाही?’

जम्मू-काश्मीरमधील लोक पाकिस्तानशी चर्चा करण्याची गरज बोलून दाखवत आहेत, याचा मला आनंद आहे. केंद्र सरकार चीनशी चर्चेच्या 9-10 फेऱ्या पार पाडते. मग पाकिस्तान केवळ मुस्लीम देश आहे म्हणून त्यांच्याशी चर्चा केली जात नाही का? आता सर्वकाही जातीयवादी झाले आहे का, असा सवालही मेहबुबा मुफ्ती यांनी भाजपला विचारला.

संबंधित बातम्या:

देशभरात भाजपकडून ‘गुपकर गँग’वर टीका, पण कारगिलमध्ये सत्तेसाठी फारुख अब्दुल्लांशी युती

देशातील राजकारणाचा पारा वाढवणारी जम्मू-काश्मिरची गुपकर आघाडी काय आहे?

‘काँग्रेस पक्षाचा गुपकर डिक्लेरेशनशी कोणताही संबंध नाही’, फडणवीसांच्या आरोपांना थोरातांचे सडेतोड प्रत्युत्तर

(PDP chief Mehbooba Mufti attack on Central govt)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें