मानवाचा वंशज ‘येती’च्या पाऊलखुणा दिसल्या, भारतीय सैन्याचा दावा

मानवाचा वंशज 'येती'च्या पाऊलखुणा दिसल्या, भारतीय सैन्याचा दावा

नवी दिल्ली : भारतीय सैन्याने पहिल्यांदाच हिममानवर ‘येती’च्या उपस्थितीचा दावा केलाय. सैन्याकडून याबाबतचे काही फोटोही शेअर करण्यात आले आहेत. बर्फामध्ये पाऊलखुणा असल्याचं या फोटोंमध्ये दिसतंय. या पाऊलखुणा येतीच्या सांगितल्या जात आहेत. भारतीय सैन्याच्या माऊंटायरिंग एक्सपेडिशन टीमला 9 एप्रिल रोजी मकालू बेस कॅम्पवर जवळपास 32 इंच लांब आणि 15 इंच रुंद पाऊलखुणा दिसून आल्याचं भारतीय सैन्याने सांगितलंय. शिवाय या पाऊलखुणा येतीच्या असू शकतात, असंही म्हटलंय. हा हिममानव पहिल्यांदा मकालू-बरुन राष्ट्रीय उद्यानात दिसल्याचा दावा करण्यात आला होता.

भारतीय सैन्याच्या दाव्याची पडताळणी होणार

भारतीय सैन्याकडून हिममानवाशी संबंधित फोटो आणि व्हिडीओ लवकरच जारी केले जाणार आहेत. येतीबद्दल आतापर्यंत केवळ दंतकथा सांगितल्या गेल्या आहेत, पण आता त्याचं अस्तित्व असल्याचं समोर येऊ शकतं. यापूर्वीही नेपाळमधील माऊंट मकालू पर्वतावर येतीला पाहिल्याचा दावा करण्यात आला होता. पण याचं कोणतंही प्रमाण आढळून आलं नाही. त्यामुळे भारतीय सैन्याने दावा केल्यानंतर शास्त्रज्ञांकडून आता पडताळणी केली जाण्याची शक्यता आहे.

कोण आहे येती?

महाकाय वानरासारख्या दिसणाऱ्या येतीला मानवांचा पूर्वज मानलं जातं. 1832 साली पहिल्यांदाच एका गिर्यारोहकाने उत्तर नेपाळमध्ये दोन पायांवर चालणाऱ्या एका महाकाय वानराला पाहिल्याचा दावा केला होता. तेव्हापासून या वानराची कहाणी सांगितली जाते. पण या वानराबाबत स्पष्ट माहिती अजूनपर्यंत मिळू शकलेली नाही.

येतीची ओळख

जगातील सर्वात रहस्यमय प्राण्यांपैकी एक म्हणून येतीची ओळख आहे. काही संशोधकांच्या मते, येती हा ध्रुवीय भालूच्या वंशाचा आहे. येतीचा चेहरा वानरासारखा दिसतो असं सांगितलं जातं. शिवाय मानवासारखाच तो दोन पायांवर चालतो. अनेकदा येतीला पाहिलं गेल्याचं सांगण्यात आलंय. लडाखमधील काही बौद्ध मठांनीही येतीला पाहिल्यादा दावा केला होता. येतीचं निवासस्थान नेपाळ आणि तिबेटमधील हिमालय क्षेत्र मानलं जातं.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI