कुलभूषण जाधव सुटणार का? आंतरराष्ट्रीय कोर्टात महत्त्वाचा निकाल

Namrata Patil

Updated on: Jul 17, 2019 | 10:45 AM

किस्तानच्या अटकेत असलेले भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या कथित हेरगिरी प्रकरणात सुनावण्यात आलेल्या फाशीवर आज (17 जुलै) आंतरराष्ट्रीय न्यायलयात महत्त्वपूर्ण निकाल दिला जाणार आहे. 

कुलभूषण जाधव सुटणार का? आंतरराष्ट्रीय कोर्टात महत्त्वाचा निकाल
kulbhushan jadhav

kulbhushan jadhav case नवी दिल्ली : पाकिस्तानच्या अटकेत असलेले भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव (kulbhushan jadhav) यांच्या कथित हेरगिरी प्रकरणात सुनावण्यात आलेल्या फाशीवर आज (17 जुलै) आंतरराष्ट्रीय न्यायलयात ( International Court of Justice ICJ) महत्त्वपूर्ण निकाल दिला जाणार आहे. पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांना हेरगिरी प्रकरणात फाशीची शिक्षा सुनावली होती. त्याप्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायलयात आज महत्त्वपूर्ण निकाल देण्यात येणार आहे. नेदरलँडमधील द हेगच्या (Netherlands – The Hague) पीस पॅलेसमध्ये दुपारी 3 वाजता म्हणजे भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6.30 च्या सुमारास याबाबत निकाल दिला जाणार आहे. भारताकडून आंतरराष्ट्रीय कोर्टात ज्येष्ठ वकील हरीश साळवे बाजू मांडत आहेत.

नेमकं प्रकरण काय?

कुलभूषण जाधव यांना 3 मार्च 2016 रोजी बलुचिस्तान येथून पाकमधील गुप्तचर यंत्रणांनी अटक केल्याचा दावा पाकिस्तानने केला होता. तर भारताने पाकिस्तानचा दावा खोडून काढत कुलभूषण जाधव हे इराणमध्ये व्यापारा निमित्ताने गेले असताना त्यांना अटक केल्याचे सांगितले होते. कुलभूषण जाधव कमांडिंग ऑफिसर दर्जाचे नौदलातील अधिकारी आहेत आणि ते भारतातील ‘रॉ’साठी काम करीत असल्याचा दावा पाकिस्ताने केला होता. तसेच कुलभूषण जाधव हे पाकमध्ये हेरगिरी करत असल्याचा आरोपही पाकिस्तानने केला होता. तसेच जाधव यांनी इराणमार्गे पाकमध्ये प्रवेश केल्याचे पाकिस्तानचे म्हणणे होते.

शिक्षा काय?

त्यानंतर 10 एप्रिल 2017 रोजी या प्रकरणी पाकिस्तानच्या मिलिट्री कोर्टाने हेरगिरी आणि दहशतवादाची कलमे लावून कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावली. याप्रकरणी भारताने आंतरराष्ट्रीय न्यायलयात दाद मागितली होती.

आंतरराष्ट्रीय कोर्टात फाशीला स्थगिती

पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांच्याशी संपर्क साधण्यासाठी अनेकदा काऊन्सलर अॅक्सेस नाकरल्यानंतर भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर 18 मे 2017 रोजी आंतरराष्ट्रीय कोर्टाने फाशीला स्थगिती दिली होती. तसेच जोपर्यंत आंतरराष्ट्रीय न्यायालयात निकाल लागत नाही, तोपर्यंत त्यांना शिक्षा न देण्याचे आदेश आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिला होता.

भारताचे म्हणणे काय?

48 वर्षीय कुलभूषण जाधव हे नौदलातील निवृत्त अधिकारी आहेत. 14 वर्ष सेवा केल्यानंतर त्यांनी मुदतीपूर्वीच निवृत्ती स्वीकारली. 2003 मध्ये ते निवृत्त झाल्याचा दावा भारताने केला. कुलभूषण जाधव यांच्यावर पाकिस्तानने ठेवलेले हेरगिरीचे आरोप रद्द करून त्यांची शिक्षा रद्द करावी आणि तातडीने त्यांची सुटका करावी, अशी मागणी भारताने केली.

तसेच याप्रकरणी  फेब्रुवारी 2019 मध्ये चार दिवस दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेण्यात आला होता. यावेळी भारताने प्रामुख्याने दोन मुद्द्यांवर लक्ष केंद्रीत केलं. व्हिएन्ना कराराचं उल्लंघन आणि consular access नाकारल्याचा मुद्दा भारताने पुढे केला.

नौदलातून निवृत्त झाल्यानंतर कुलभूषण जाधव व्यवसाय करत होते, पण त्यांचं इराणमधून अपहरण करण्यात आल्याचं भारताने सांगितलं. भारताने अनेकदा consular access मागूनही पाकिस्तानने सतत नकार दिला होता. तत्कालीन परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी स्वतः यामध्ये लक्ष घालून पाकिस्तानशी अनेकदा संपर्क साधला होता.

त्यानतंर कुलभूषण जाधव हे हेरगिरी करत असल्याचा युक्तीवाद पाकिस्तानकडून करण्यात आला होता. कुलभूषण जाधव यांची फाशी रद्द व्हावी यासाठी भारताने वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रयत्न केले आहेत.

आई आणि पत्नीची भेट

कुलभूषण जाधव यांच्या पत्नी आणि आई या दोघींना भेटण्याची मुभा देण्यात आली होती. 25 डिसेंबर 2017 रोजी दोघीही कुलभूषण जाधव यांना भेटून आल्या होत्या. मात्र एवढ्या वर्षांनी भेटून कुलभूषण यांच्या जवळही जाता आलं नव्हतं. दोघांच्या मध्ये काच लावलेली होती आणि फोनद्वारे संभाषण करायला लावलं, ज्यामुळे जवळून भेटही होऊ शकली नाही.

आतापर्यंत काय काय घडलं ?

 • 3 मार्च 2016 : कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणांकडून अटक
 • 25 मार्च 2016 : कुलभूषण जाधव हे पाकिस्तानच्या ताब्यात असल्याची माहिती
 • 10 एप्रिल 2017 : पाकिस्तान मिलिट्री कोर्टाने कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावली
 • 8 मे 2017 : फाशीविरोधात भारताची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव
 • 9 मे 2017 : आंतरराष्ट्रीय कोर्टाने दोन्ही बाजूच्या वकिलांना कोर्टात उपस्थित राहण्यास सांगितले.
 • 15 मे 2017 : दोन्ही बाजूच्या वकिलांकडून युक्तिवाद
 • 18 मे 2017: आंतरराष्ट्रीय कोर्टाकडून कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती
 • 25 डिसेंबर 2017: कुलभूषण जाधव यांच्या आई आणि पत्नीने त्यांची भेट घेतली
 • 28 डिसेंबर 2017: तत्कालिन परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी या भेटीबदद्ल संसदेत माहिती
 • 18 ते 21 फेब्रुवारी 2019 : आंतरराष्ट्रीय कोर्टात (आयसीजे) भारत आणि पाकिस्तानचा पुन्हा युक्तीवाद
 • 4 जुलै : कुलभूषण जाधव यांच्या फाशीप्रकरणी अंतिम निकाल 17 जुलै 2019 रोजी जाहीर करणार
 • 17 जुलै : निकालाकडे देशाचे लक्ष

कोण आहेत कुलभूषण जाधव?

कुलभूषण जाधव यांचा जन्म 16 एप्रिल 1970 रोजी महाराष्ट्रातील सांगलीत झाला. सध्या त्यांचे कुटुंब मुंबईतील अंधेरी भागातील पवईमध्ये वास्तव्यास आहे. त्यांचे वडील सुधीर जाधव हे मुंबई पोलिस दलाचे माजी कर्मचारी आहेत. कुलभूषण जाधव यांचे लग्न झाले असून त्यांना दोन मुलं आहेत.

कुलभूषण जाधव यांना 3 मार्च 2016 रोजी बलुचिस्तान येथून पाकमधील गुप्तचर यंत्रणांनी अटक केल्याचा दावा पाकिस्तानने केला होता. तर भारताने पाकिस्तानचा दावा खोडून काढत कुलभूषण जाधव हे इराणमध्ये व्यापारा निमित्ताने गेले असताना त्यांना अटक केल्याचे सांगितले होते.

कुलभूषण जाधव हे नौदलातील निवृत्त अधिकारी आहेत. 14 वर्ष सेवा केल्यानंतर त्यांनी मुदतीपूर्वीच निवृत्ती स्वीकारली. 2003 मध्ये ते निवृत्त झाले. त्यानंतर त्यांनी त्यांच्या व्यवसायाला सुरुवात केली.

तसेच कुलभूषण जाधव यांना अटक झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी आपला मुलगा हेर असल्याचा आरोप फेटाळून लावला आहे. ‘माझ्या मुलाला यात अडकवण्यात आलं आहे. कुलभूषण इराणच्या चबाहारमध्ये सल्लागार म्हणून व्यवसाय करतो,’ अशी माहिती त्यांच्या वडिलांनी दिली होती.

संबंधित बातम्या :

कुलभूषण जाधव प्रकरण : भारताने तीन तासात पुराव्यांसह पाकिस्तानचा बुरखा फाडला

कुलभूषण जाधव प्रकरण : अखेर अंतिम सुनावणीची तारीख ठरली

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI