मुलाखतीआधी ‘मुलाकात’, संजय राऊत-कुणाल कामराची दीड तास चर्चा

स्टॅण्ड अप कॉमेडियन कुणाल कामरा आपल्या 'शट अप या कुणाल' या कार्यक्रमात शिवसेना खासदार संजय राऊत यांची मुलाखत घेणार आहे. | Kunal Kamra meets Sanjay Raut for interview

मुलाखतीआधी 'मुलाकात', संजय राऊत-कुणाल कामराची दीड तास चर्चा

मुंबई : स्टॅण्ड अप कॉमेडियन कुणाल कामरा आपल्या ‘शट अप या कुणाल’ या कार्यक्रमात शिवसेना खासदार संजय राऊत यांची मुलाखत घेणार आहे. त्याआधी मुलाखतीची पूर्वतयारी म्हणून हॉटेल ग्राँड हयातमध्ये या दोघांची ‘मुलाकात’ झाली. कुणाल कामराने संजय राऊतांची भेट घेत जवळपास दीड तास चर्चा केली. येत्या आठवड्यात खार येथील एका स्टुडिओत या मुलाखतीचे चित्रीकरण होणार आहे. त्यामुळे ‘सामना’च्या निमित्ताने मुलाखतकाराच्या भूमिकेत दिसणारे राऊत स्व:तच्या मुलाखतीत काय बोलतील याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. (Kunal Kamra meets Sanjay Raut for interview)

कुणाल कामरा नेटीझन्समध्ये चांगलाच प्रसिद्ध आहे. कुणाल स्टॅण्ड अप कॉमेडीसोबतच ‘शट अप या कुणाल’ या कार्यक्रमात मोठमोठ्या सामाजिक तसेच राजकीय व्यक्तींच्या मुलाखती घेतो. कुणालने यूट्यूबवर 2017 मध्ये हा शो सुरु केला होता. भाजप यूथ विंगचे उपाध्यक्ष मधुकिश्वर देसाई यांच्या मुलाखतीने ‘शट अप या कुणाल’च्या पहिल्या सिझनला सुरुवात झाली होती. दुसऱ्या सिझनची सुरुवात संजय राऊत यांच्यापासूनच करणार अन्यथा नाही, असे म्हणत त्याने सोशल मीडियावर राऊतांना मुलाखतीसाठी काही दिवसांपूर्वी आमंत्रण दिलं. संजय राऊत यांनीही कुणाल कामराचे निमंत्रण स्वीकारत मुलाखतीस येण्याचे मान्य केले होते.

कुणालने आतापर्यंत शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी (तत्कालीन काँग्रेस प्रवक्त्या), जेएनयू विद्यार्थी नेते कन्हैया कुमार आणि उमर खलिद, एमआयएम खासदार असदुद्दीन ओवेसी, गीतकार जावेद अख्तर, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार, काँग्रेस नेते मिलिंद देवरा, खासदार तेजस्वी सुर्या यांच्या मुलाखती घेतल्या आहेत.

राज ठाकरेंनाही दिलेले निमंत्रण

दरम्यान, कुणाल कामराने राज ठाकरेंनाही ‘शट अप या कुणाल’साठी निमंत्रण दिले होते. “मी बरंच संशोधन केलं. तुम्ही मुंबईतील किर्ती वड्याचे मोठे चाहते असल्याचं लक्षात आलं. म्हणून मी तुम्हाला तुमचा आवडता पदार्थ लाच म्हणून देतो आहे. जेणेकरुन तुम्ही माझ्या ‘शट अप या कुणाल’ या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी वेळ द्याल.” असे कुणालने काही महिन्यांपूर्वी ट्वीट केले होते.

संबंधित बातम्या :

Shut Up Ya Kunal | कुणाल कामराची साद, संजय राऊतांचा प्रतिसाद, कुणालचं निमंत्रण स्वीकारलं   

Shut Up Ya Kunal | संजय राऊतांनी ‘शट अप’चे ओपनिंग केले तरच दुसरा सिझन; कुणाल कामराचे निमंत्रण   

कुणाल कामराकडून राज ठाकरेंना वडापाव ऑफर, कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी विनंती 

(Kunal Kamra meets Sanjay Raut for interview)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI