Rain Updates: राज्यभरात मुसळधार पाऊस, मोठ्या धरणांमध्ये 32 टक्के पाणीसाठा

मुंबईसह सांगली, सातारा, सिंधूदुर्ग, रत्नागिरी, बीड, यवतमाळ, वाशिम, चंद्रपूर, अमरावतीसह अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला (Mansoon Rain Updates of Maharashtra).

Rain Updates: राज्यभरात मुसळधार पाऊस, मोठ्या धरणांमध्ये 32 टक्के पाणीसाठा

मुंबई : राज्यभरात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईसह सांगली, सातारा, सिंधूदुर्ग, रत्नागिरी, बीड, यवतमाळ, वाशिम, चंद्रपूर, अमरावतीसह अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला (Mansoon Rain Updates of Maharashtra). त्यामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त केलं जातंय. राज्यात गेल्या काही दिवसांत चांगला पाऊस पडतोय. त्यामुळेच राज्यातील धरणांमध्ये पाणीसाठा वाढलाय. सध्या राज्यातील मोठी धरणं 36 टक्के भरली आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत मोठ्या धरणात सध्या 10 टक्के जास्त पाणीसाठा आहे. मध्यम धरणांमध्ये 32 टक्के आणि लघू धरणांमध्ये 14 टक्के पाणीसाठा आहे. राज्यातील सर्व धरणं मिळून सध्या 32 टक्के पाणीसाठा आहे. कोकण विभागातील धरणं निम्मी भरली आहेत, तर नागपूर विभागातील धरणांमध्येही 44 टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा आहे. म्हणजेच गेल्या काही दिवसांमध्ये धरण क्षेत्रात झालेल्या पावसामुळे राज्यातील धरणं 32 टक्के भरली आहेत.

मुंबई

मागील 22 तासांमध्ये मुंबईत अतिमुसळधार पावसाची नोंद झाली. अद्यापही पावसाचा जोर कायम आहे. पुढील 6 तास मुंबईतील विविध भागांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. किंग्ज सर्कल येथे गुडघ्यापर्यंत पाणी साचलं आहे. त्यामुळे हा परिसर जलमय झाला असून येथे गाड्या बंद पडत आहे. लोकांचे हाल होताना दिसत आहेत. बसेस वेळेवर येत नाहीत.

पुढच्या 24 तासांमध्ये मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि अन्य काही ठिकाणी अति मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. घाट परिसरात, कोकणात मुसळधार पावसाची शक्यता आहे. मच्छीमारांसाठी इशारा देण्यात आला आहे. किनारपट्टीच्या भागामध्ये जोरदार वादळी पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे, असं आवाहन करण्यात आलं आहे.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

ठाण्यातही कालपासून (15 जुलै) रिमझिम पाऊस पडत आहे. आज देखील ढगाळ वातावरण असून हवेत गारवा जाणवत आहे. शहरातील जवळपास 5 ठिकाणी झाडे आणि फांद्या कोलमडून पडले. त्यामूळे कोणतीही हानी झालेली नाही. आजही असाच पाऊस पडत राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

सांगली

सांगली जिल्ह्यातील मिरज शहर परिसरात सकाळपासून जोरदार पाऊस झाला. काही ठिकाणी थांबून थांबून पाऊस पडला त्यामुळे घराबाहेर पडलेल्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडालेली पाहायला मिळाली.

बीड

मागील 2 दिवसांपासून बीड जिल्ह्यात मुसळधार पावसाच्या सरी कोसळतायत. या पावसामध्ये ग्रामीण भागातील नदी नाले दुथडी भरुन वाहू लागलेत. दरम्यान धारुर तालुक्यात देखील मुसळधार पाऊस झाल्यानं 2 गावांना जोडणारा पूल खचला आहे. घागरवाडा आणि धारुर या मुख्य गावांना जोडला जाणाऱ्या नदीवरील पुलाला काही दिवसांपासून भगदाड होतं. परंतू मुसळधार पडत असलेल्या पावसाने हा पूल खचलाय. त्यामुळे जीव मुठीत धरुन येथील ग्रामस्थांना हा पूल ओलांडून जावं लागतंय. प्रशासनाने वेळीच लक्ष देऊन या पुलाची दुरुस्ती करावी, अशी मागणी या ठिकाणच्या ग्रामस्थांनी केलीय.

जालना

जालन्यात पावसाचं सकाळी जोरदार आगमन झालंय. भोकरदन तालुक्यात जोरदार, तर परतूर, मंठा, जाफराबाद, घनसावंगीत रिमझीम पाऊस झाला. अंबड व बदनापूरमध्ये सध्या ढगाळ वातावरण आहे. भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई, रेलगाव, करजगाव, शेलुद, देहेड, वरुड, लेह, अण्वा, धावडा परिसरात पाऊस सुरु असल्याने ग्रामस्थांचे घराच्याबाहेर पडणे मुश्किल झालंय.

वर्धा

हिंगणघाट शहरात बुधवारी (15 जुलै) संध्याकाळी पावसाने चांगलंच झोडपून काढलं. मुसळधार पावसाने शहरातील नाला दुथडी भरून वाहत होता. याचदरम्यान नाल्याच्या पुलावरुन पाणी असताना कवघाट रोडवरील जुन्या कांजी येथे राहणाऱ्या असद खान रमजान खान पठाण या 4 वर्षीय बालकाचा पाण्यात वाहून गेल्याने मृत्यू झाला.

पाऊस थांबल्यानंतर आपल्या आजीकडे असलेला असद खान थोड्याच अंतरावर असलेल्या आपल्या घरी जाण्यास निघाला. त्याचवेळी घरासमोर असलेल्या नाला तुडूंब भरुन वाहत होता. आजीच्या घरुन निघालेला 4 वर्षीय बालक घरासमोर साचलेल्या पाण्यातून वाट काढत घरी जाण्यास निघाला. पण पाण्याचा प्रवाह एवढा होता की तो पाण्याच्या प्रवाहासोबत वाहत गेला. याचदरम्यान घरामागील असलेले नाल्याजवळची विटांची भिंत पडल्याने मोठा आवाज झाला. काय पडले ते पाहण्यासाठी असदची आई गेली असता मुलाचा मृतदेह तरंगताना आढळला.

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

सिंधुदुर्ग

मुसळधार पावसानंतर कणकवलीत उड्डाणपुलाच्या संरक्षक भिंतीला भगदाड पडले. त्यामुळे शहरात हल्लकल्लोळ माजला. सर्वच राजकीय पक्षांनी व नागरिकांनी यावरन चौफेर टीका केल्यामुळे महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम थांबवण्यात आले होते. आमदार नितेश राणेंनी या प्रकरणाचा छडा लागत नाही तोपर्यंत महामार्गाचे काम करु न देण्याचा इशाराही दिला होता. मात्र आज पाऊस असून देखील पोलीस संरक्षणात चौपदरीकरणाचे काम सुरु करण्यात आले. लोकांच्या व लोकप्रतिनिधीच्या मागणीला केराची टोपली दाखवत ठेकेदार कंपनीने पोलीस संरक्षणात काम सुरु केल्यामुळे शहरात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

मालवण तालूक्यात सर्वाधिक 152 मिमी पाऊस झाला. जिल्ह्यात 24 तासांमध्ये 588 मिमी पावसाची नोंद झाली. 1 जूनपासून आतापर्यंत 2180 सरासरी पावसाची नोंद झाली. अनेक ठिकाणी सकल भागात पाणी साचले. पावसाची रिपरीप अजूनही सुरुच आहे.

रत्नागिरी

जिल्ह्याला पाऊस सध्या झोडपून काढतोय. रत्नागिरी जिल्ह्यात सकाळपासून पावसाची धुवाधार बॅटिंग सुरु आहे. आज सलग पाचव्या दिवशी रत्नागिरी जिल्ह्यात पाऊस कोसळतोय. दक्षिण रत्नागिरी आणि उत्तर रत्नागिरीत पावसाचा जोर कायम आहे. रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या 24 तासात अतिवृष्टी झालीय. गेल्या 24 तासात रत्नागिरी जिल्ह्यात 97 मिलीमीटर पाऊस झाला. सर्वाधिक पाऊस राजापूर तालुक्यात 135 मिलीमीटर झाला. किनारपट्टी भागात पावसाचा जोर कायम आहे. जिल्ह्यातील सर्वच नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. पुढील 2 दिवस मुसळधार पावसाचा जोर कायम राहणार आहे.

वाशिम

सकाळपासून पावसानं वाशिम जिल्ह्यात दमदार हजेरी लावली. मंगरुळपीर तालुक्यातील सर्वत्र जोरदार पाऊस झाला. शेंदुर्जना परिसरात अतिवृष्टीमुळे पाझर तलाव फुटल्याने शेतीचं मोठं नुकसान झालं. तसेच शेजारी असलेल्या नादखेडा परिसरात अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी घुसल्याने उभ्यापिकासह जमीनीची धूप झाली. यामुळं परिसरातील शेतकऱ्याच्या जवळपास 100 हेक्टर शेतीचं नुकसान झालं. तहसीलदार व महसूलचे कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी पोहचून पाहणी केली. शेतकऱ्यांकडून खरडून गेलेल्या जमिनीचे पंचनामे करुन पिकासह नुकसान झालेल्या जमिनीचा मोबदला मिळावा आणि पाझर तलावाची दुरुस्ती करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

यवतमाळ

जिल्ह्याच्या मारेगाव तालुक्यात जोरदार पाऊस अती पावसाने शेतात पीकात पाणी साचून मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी जमिनीची मोठ्या प्रमाणात धूप झाली. अनेक भागात शेतांमध्ये पाणी साचल्याने आणि काही ठिकाणी नाल्याला आलेल्या पुरात पीक वाहून गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

हेही वाचा :

Maratha Reservation | मराठा आरक्षण वैध ठरवण्यासाठी ठाकरे सरकारची मोर्चेबांधणी, मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली

SSC Results | बारावीचा निकाल जाहीर, आता दहावीचा निकाल कधी? बोर्डाच्या अध्यक्षा म्हणतात….

Mansoon Rain Updates of Maharashtra

Published On - 5:02 pm, Thu, 16 July 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI