केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचं कोरोनाने निधन

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे (Mos Railways Suresh Angadi dies of Coronavirus).

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचं कोरोनाने निधन

नवी दिल्ली : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. त्यांच्यावर नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरु होते. सुरेश अंगडी यांची कोरोना टेस्ट 11 सप्टेंबर रोजी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं. एम्स रुग्णालयाच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी त्यांना वाचवण्यासाठी शर्थीने प्रयत्न केले. मात्र, आज त्यांची प्राणज्योत मालवली (Mos Railways Suresh Angadi dies of Coronavirus).

सुरेश अंगडी यांना 11 सप्टेंबर रोजी असिम्प्टेमेटिक कोरोनाचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर त्यांना नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र, आज (23 सप्टेंबर) वयाच्या 65 व्या वर्षी त्यांचा कोरोना संसर्गाने मृत्यू झाला.

कोण आहेत सुरेश अंगडी?

सुरेश अंगडी हे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री होते. ते 2014 पासून कर्नाटकमधील बेळगाव येथून खासदार म्हणून निवडून येत होते. 2019 मध्ये त्यांच्याकडे मोदी मंत्रिमंडळात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली. ते संसदीय समितीचे अध्यक्षही होते.

त्यांच्या राजकीय कारकीर्तीची सुरुवात अगदी स्थानिक पातळीपासून झाली. 1996 मध्ये त्यांच्याकडे बेळगाव भाजपच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. 1999 पर्यंत त्यांनी या पदावर काम केलं. त्यानंतर 2001 मध्ये त्यांना बेळगाव भाजपचा अध्यक्ष म्हणून निवडण्यात आलं. 2004 पर्यंत भाजपचे बेळगाव लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी मिळेपर्यंत ते या पदावर होते. 2004 मध्ये त्यांनी काँग्रेसच्या उमेदवाराला लोकसभा निवडणुकीत मोठ्या फरकाने पराभूत केलं. ते 2004 नंतर 2009, 2014, 2019 असे सलगपणे खासदार म्हणून निवडून येत राहिले.

सुरेश अंगडी यांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर दु:ख व्यक्त केलं आहे. “सुरेश अंगडी हे असामान्य कार्यकर्ता होते. त्यांनी कर्नाटक राज्यात भाजपचा पाया मजबूत करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. ते प्रभावशाली व्यक्ती होते. सुरेश अंगडी यांचं जाणं अत्यंत दुखद आहे. आम्ही त्यांच्या परिवारासोबत आहोत”, अशा शब्दात मोदींनी शोक व्यक्त केला आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीदेखील ट्विटरवर शोक व्यक्त केला आहे. “सुरेश अंगडी यांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर खूप वाईट वाटलं. त्यांनी निस्वार्थ भावनेने केलेली लोकसेवा सदैव लक्षात राहील”, अशा शब्दात अमित शाह यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.

Published On - 9:40 pm, Wed, 23 September 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI