मुथूट दरोडाप्रकरणात नाशिक पोलिसांना मोठं यश, मुख्य आरोपीला सुरतमधून अटक

मुथूट दरोडाप्रकरणात नाशिक पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. पोलिसांनी मुख्य आरोपीच्या सुरतमध्ये जाऊन मुसक्या आवळल्या आहेत.

मुथूट दरोडाप्रकरणात नाशिक पोलिसांना मोठं यश, मुख्य आरोपीला सुरतमधून अटक
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Jun 24, 2019 | 3:03 PM

नाशिक: मुथूट दरोडाप्रकरणात नाशिक पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. पोलिसांनी मुख्य आरोपीच्या सुरतमध्ये जाऊन मुसक्या आवळल्या आहेत. जितेंद्र बहादूर सिंग, असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. संबंधित आरोपी आंतरराज्यीय टोळी चालवत असल्याचे तपासात उघड झाले आहे.

पोलिसांनी आरोपींकडून 3 मोटारसायकल जप्त केल्या आहेत. चोरलेल्या गाड्यांचे चेसी नंबर नष्ट करण्यात आले होते. त्यानंतर या गाड्या सुरतला गाडी डिलरपर्यंत पोहोचल्या जात असल्याचेही पुरावे मिळाले आहेत. उत्तरप्रदेश, बंगाल, बिहार येथे पोलिसांचे पथक तपास करत आहे. फेब्रुवारी 2019 मध्ये रचलेल्या या गुन्ह्यात एकूण 6 आरोपी आहेत. मुख्य आरोपी जितेंद्र सिंग याला सुरतवरुन अटक करण्यात आली.

दरम्यान, पोलिसांनी दरोडा आणि गोळीबारप्रकरणी याआधी 2 संशयितांना  ताब्यात घेतलं होतं. हे दोघेही उत्तर प्रदेशचे रहिवासी होते. पप्प्या आणि जितेंद्र सिंग अशी आरोपींची नावं होती.

मुथूट दरोडा प्रकरण काय आहे?

नाशिकमध्ये 14 जून रोजी सिटी सेंटर मॉल जवळच्या मुथूट फायनान्स कार्यालयात सकाळी सकाळीच दरोडा टाकण्यासाठी सशस्त्र दरोडेखोर आले होते. त्यांच्याकडे रिव्हॉल्वर होती. चोरट्यांना जे कोणी अडवेल, त्यांच्यावर ते फायरिंग करत होते. यावेळी झालेल्या गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या ऑडिटरचा मृत्यू झाला होता. तसेच वॉचमनसह 3 जण जखमी होते. चोरट्यांनी राऊंड फायर केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती.

या थरारक घटनेनंतर नाशिक पोलिसांवर चहूबाजूंनी टीका झाली होती. नाशिक पोलिसांनी या घटनेनंतर तपासाची चक्र वेगाने फिरवली. पोलिसांना आरोपींच्या दुचाकी मिळाल्या होत्या. आरोपी आपल्या गाड्या सोडून पळून गेले होते. अखेर पोलिसांना 2 आरोपींच्या मुसक्या आवळण्यात यश आलं होते. त्याआधारे त्यांनी आता अन्य आरोपींच्याही मुसक्या आवळल्या.


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें