‘समाजात फिरताना असुरक्षित वाटतं’, अमोल मिटकरींकडून पोलिस सुरक्षेची मागणी

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन सुरक्षेची मागणी केली आहे.

'समाजात फिरताना असुरक्षित वाटतं', अमोल मिटकरींकडून पोलिस सुरक्षेची मागणी
अमोल मिटकरी आणि अनिल देशमुख

नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन सुरक्षेची मागणी केली आहे (Amol Mitkari demand Police protection). मागील काळात धमक्या आल्याचं सांगत खबरदारीचा उपाय म्हणून आपण ही मागणी करत असल्याचं मिटकरी यांनी सांगितलं. मागील सरकारच्या काळात मागणी करुनही सुरक्षा मिळाली नाही, त्यामुळे महाविकासआघाडी सरकारकडे मागणी करत असल्याचंही त्यांनी यावेळी नमूद केलं.

अमोल मिटकरी म्हणाले, “मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रातील वातावरण खराब झालं आहे. काही दिवसांपूर्वी अज्ञात मारेकऱ्यांनी प्रहारचे अकोल्याचे माजी जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर यांना महाशिवरात्रीच्या दिवशी गोळ्या घालून मारलं. 7-8 दिवस उलटले आहेत, त्यातील एकाही आरोपीला अद्याप अटक झालेली नाही. मागील काळात तत्कालीन सरकारविरोधात आम्ही बंड केला. फॅसिझमविरोधात जो जो बोलतो त्याला त्रास होतो. तशा काही गोष्टी आम्हाला जाणवल्या. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मी या सरकारकडे आणि गृहमंत्र्यांकडे सुरक्षेची मागणी केली आहे.”

आम्ही जेव्हा समाजात फिरतो तेव्हा असुरक्षित वाटतं. दोन-तीन वर्षांपूर्वी धमकीचे फोन आणि मेसेजेस आले होते. त्यानंतर मी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देखील दिलं होतं. मात्र, त्यावर मागच्या सरकारच्या काळात काही कारवाई झाली नाही. आता हे महाविकासआघाडीचं सरकार आहे. पुरोगामी विचारांची पेरणी करणाऱ्या माणसांना हे सरकार सुरक्षा देईल, असा मला विश्वास आहे, असंही अमोल मिटकरी यांनी नमूद केलं.

Amol Mitkari demand Police protection

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI