राष्ट्रवादीच्या खासदाराच्या जेवणात अंड्याचं कवच, एअर इंडियाकडून केटररला दंड

राष्ट्रवादीच्या खासदार वंदना चव्हाण यांनी 1 ऑक्टोबरला पुण्याहून दिल्लीला जाताना एअर इंडियाच्या विमानात ऑमलेटमध्ये अंड्याच्या कवचाचे तुकडे सापडल्याचा दावा ट्विटरवरुन केला होता

राष्ट्रवादीच्या खासदाराच्या जेवणात अंड्याचं कवच, एअर इंडियाकडून केटररला दंड

नवी दिल्ली : राष्ट्रवादीच्या खासदार वंदना चव्हाण यांच्या जेवणात अंड्याचं कवच आढळल्यामुळे एअर इंडिया विमान कंपनीने संबंधित केटररला दंड (NCP MP Vandana Chavan Complains) ठोठावला आहे. पुणे-दिल्ली फ्लाईटमध्ये देण्यात आलेल्या ऑमलेटमध्ये अंड्याचं कवच आढळल्याची तक्रार चव्हाण यांनी रविवारी केली होती.

राष्ट्रवादीकडून राज्यसभेवर खासदार असलेल्या वंदना चव्हाण 1 ऑक्टोबरला पुण्याहून दिल्लीला चालल्या होत्या. यावेळी विमानात आपल्याला दिलेल्या ऑमलेटमध्ये अंड्याच्या कवचाचे तुकडे सापडल्याचा दावा त्यांनी केला होता. तसे फोटो ट्वीट करत वंदना चव्हाण यांनी संताप व्यक्त केला होता.

एअर इंडियाच्या विमानात पुरवल्या जाणाऱ्या अन्नपदार्थाच्या दर्जाबाबत चव्हाण यांनी नाराजी (NCP MP Vandana Chavan Complains) व्यक्त केली. ‘काही दिवसांपूर्वी भल्या सकाळी एअर इंडियाच्या फ्लाईटने पुण्याहून दिल्लीला जात होते. ब्रेकफास्टला मी ऑमलेट मागवलं. तीन-चार घास खाऊन झाल्यावर अंड्याच्या कवचाचे तुकडे त्यात दिसले’ असं ट्वीट वंदना चव्हाण यांनी रविवारी केलं.

हे कमी म्हणून की काय, कुजलेले बटाटे, अर्धवट शिजलेले दाणे, जॅमच्या डब्यावर पांढुरकी पावडर अशा गोष्टीही निदर्शनास आल्या. मी एअर इंडियाकडे तक्रार नोंदवली आहे. ती संबंधितांपर्यंत पोहचेल आणि कारवाई केली जाईल, अशी आशा व्यक्त करते, असं चव्हाण यांनी दुसऱ्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

‘एअर हॉस्टेसचा याच्याशी थेट संबंध नाही, हे मी समजू शकते. परंतु ही गोष्ट दाखवून दिल्यानंतर त्यांचा थंड प्रतिसाद पाहून मी अवाक झाले. ही बाब ट्विटरवर शेअर करावी की नाही, हा प्रश्न मनात होता, परंतु जनतेच्या हितासाठी पोस्ट करण्याचं ठरवलं’ असं वंदना चव्हाण यांनी पुढे लिहिलं आहे.

ट्वीटमध्ये वंदना चव्हाण यांनी एअर इंडिया, पंतप्रधान नरेंद्र मोदी, पंतप्रधान कार्यालय, डीजीसीए, नागरी उड्डाण मंत्रालय आणि मंत्री हरदीप पुरी यांना टॅग केलं आहे.

इंदापुरात राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांचा हर्षवर्धन पाटलांना पाठिंबा

भविष्यात हा प्रकार टाळण्यासाठी एअर इंडियाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. संबंधित केटररला दंड म्हणून हँडलिंग चार्जेस आणि संपूर्ण फ्लाईटच्या खाद्यपदार्थाची रक्कम देण्यास सुनावल्याची माहिती एअर इंडियाकडून देण्यात आली आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI