Sharad Pawar | शरद पवारांच्या दौऱ्यांचा धडाका, नाशिकमध्ये ‘कोरोना’ स्थितीचा आढावा घेणार

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक दौऱ्यात शरद पवार जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन सूचना देणार आहेत.

Sharad Pawar | शरद पवारांच्या दौऱ्यांचा धडाका, नाशिकमध्ये 'कोरोना' स्थितीचा आढावा घेणार

नाशिक : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा नाशिक दौरा तळ्यात मळ्यात असताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार मैदानात उतरले आहेत. शरद पवार आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे आज (24 जुलै) नाशिक दौऱ्यावर आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन सूचना देणार आहेत. (NCP President Sharad Pawar Nashik Tour to review COVID19 situation)

नाशिक जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याने स्वतः पवार मैदानात उतरल्याची चर्चा आहे. नाशिकमध्ये आल्यानंतर पवार आधी एमराल्ड पार्क या हॉटेलमध्ये राष्ट्रवादीच्या निवडक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत, त्यानंतर दुपारी नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात पवार बैठक घेणार असून या बैठकीत जिल्हाधिकारी आणि सर्वच विभागाचे प्रमुख उपस्थिती राहणार आहेत.

एकीकडे स्वतः मुख्यमंत्री नाशिक दौऱ्यावर येणार असल्याची माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी एक आठवड्यापूर्वी दिली खरी, मात्र त्यानंतर शरद पवारांनी दौरा ठरवला, आखला आणि बैठक बोलावल्याचे चित्र आहे.

भाजपचा आरोप

दरम्यान, नेत्यांच्या बैठकीला अधिकाऱ्यांनी हजेरी लावू नये, असं परिपत्रक सरकारनेच काढलं. त्यामुळे पवारांच्या बैठकीचे काय करावं, असा प्रश्न सरकारसमोर असेल आणि म्हणूनच राजेश टोपे यांचं नाव आणि बैठक मात्र पवार घेणार, अशी शक्कल लढवल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला आहे.

हेही वाचा : सरकारच्या निर्णयात हस्तक्षेप नाही, सोलापूरशी ऋणानुबंध असल्याने दौरा : शरद पवार

नाशिक शहर आणि जिल्ह्यात कोरोना चा कहर सुरुच आहे. नाशिक जिल्ह्यात कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. जिल्ह्यात काल दुपारपर्यंत तब्बल 369 नवे कोरोना बाधित आढळले होते. नाशिक शहरमधील 286, ग्रामीणमधील 70, तर मालेगावमधील 13 जणांचा यात समावेश आहे.

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

नाशिक शहरातील कोरोनाबाधितांची संख्या 6 हजार 356 झाली आहे, तर जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांचा आकडा10 हजार 394 वर गेला. 400 रुग्ण काल दिवसभरात कोरोनामुक्त झाले. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत 7 हजार 370 रुग्णांनी कोरोनावर मात केली. सद्य स्थितीत जिल्ह्यात 2 हजार 604 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. शरद पवार यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने का होईना, पण जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती बदलेल अशी, आशा व्यक्त केली जात आहे.

(NCP President Sharad Pawar Nashik Tour to review COVID19 situation)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI