भूमीपूजन आणि उद्घाटन आम्हीच करतो, दिखाव्यासाठी काही नसतं : मोदी

भूमीपूजन आणि उद्घाटन आम्हीच करतो, दिखाव्यासाठी काही नसतं : मोदी

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोलापुरात जवळपास एक हजार कोटींच्या योजनांचा शुभारंभ केलाय. शिवाय सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद या नव्या रेल्वेमार्गाची घोषणाही त्यांनी केली. ज्याचं आम्ही भूमीपूजन करतो, त्याचं उद्घाटनही करतो, असं म्हणत मोदींनी गरीबांसाठी घरांच्या कामाचं भूमीपूजनही केलं.

आम्ही ज्याचं भूमीपूजन करतो, त्याचं उद्घाटनही करतो, 30 हजार घरांचं भूमीपूजन झालं आहे, घर बांधून झाल्यावर चावी देण्यासाठी मीच येणार. देखाव्यासाठी आम्ही काहीही करत नाही, अशी घोषणा करताच सोलापुरात उपस्थितांनी ‘मोदी, मोदी’च्या घोषणा दिल्या.

ईशान्य भारताला नेहमीच दुर्लक्षित ठेवल्याबद्दल मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला. ईशान्य भारतातल्या राज्यांमध्ये एक किंवा दोन लोकसभेच्या जागा आहेत. त्यामुळे तिकडच्या कामांकडे फार लक्ष देण्यात आलं नाही. पण भाजपने ईशान्य भारतात अनेक विकासकामं पूर्ण केली, तर अजूनही काही कामं सुरु आहेत, असं मोदी म्हणाले.

कोणकोणत्या कामांचं भूमीपूजन?

सोलापुरातील विडी कामगारांसाठी बांधण्यात आलेल्या 30 हजार घरकुलाचे हस्तांतरण, स्मार्ट सिटीच्या कामाचं उद्घाटन, 180 कोटी रुपयांच्या ड्रेनेज योजनेचं उद्घाटन, देहू-आळंदी पालखी मार्गाचं भूमीपूजन, तुळजापूर-अक्कलकोट राष्ट्रीय महामार्गाचं भूमीपूजन अशा विविध कामांचं भूमीपूजन मोदींच्या हस्ते करण्यात आलं.

सोलापूर ते उस्मानाबाद या राष्ट्रीय महामार्गाचं लोकार्पणही मोदींच्या हस्ते करण्यात आलं. सत्ता मिळाल्यानंतर 2014 मध्ये या रस्त्याच्या चौपदरीकरणाला शुभारंभ मोदींच्याच हस्ते करण्यात आला होता, आज चार वर्षांनी मोदींच्याच हस्ते या रस्त्याचं लोकार्पण करण्यात आलं.

नव्या रेल्वेमार्गाची घोषणा

सोलापूर जिल्ह्यात रेल्वेचं जाळं आणखी वाढणार आहे. सोलापूर – तुळजापूर – उस्मानाबाद या रेल्वेमार्गाला मंजुरी दिल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. तुळजापूर हे देशभरातल्या भाविकांचं श्रद्धास्थान आहे. त्यामुळे हा रेल्वेमार्ग फायद्याचा ठरणार आहे.

सोलापूरला हवाई मार्गाने जोडणार

पंढरपूर आणि बाजूलाच तुळजापूरसारखं देवस्थान असलेला सोलापूर जिल्हा अत्यंत महत्त्वाचा आहे. देशातील अनेक शहरं हवाई मार्गाने जोडण्यात आले आहेत. लवकरच सोलापूर विमानतळही हवाई मार्गाने जोडणार असल्याची घोषणा मोदींनी केली.

मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

हवाई चप्पल घालणाऱ्या लोकांना हवाई सफरसाठी प्रयत्न केले, येत्या काळात सोलापुरात उडाण योजना कार्यान्वित करणार

 

सोलापूर-उस्मानाबाद हायवे चारपदरी झाला, आज त्याचं लोकार्पण झाले, एक हजार कोटीचा हा प्रकल्प सर्वांसाठी खुला झाला.

 

तुकड्यांमध्ये विचार करण्याऐवजी आम्ही सर्वसमावेशक निर्णय घेतले, सबका साथ सबका विकास ही आमच्या सरकारची संस्कृती, आमचे संस्कार

 

आरक्षणाच्या नावावर काही लोक दलितांचे आरक्षण काढण्याबाबत, ओबीसींचे आरक्षण काढण्याबाबत संभ्रम निर्माण करत होते, मात्र आम्ही दहा टक्के आरक्षण वेगळे देऊन विरोधकांना चपराक दिलीय

 

नागरिकत्व विधेयकामुळे पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तानातून परतलेल्या भारतीयांना पुन्हा भारताची ओळख मिळणार, भारत माता की जय म्हणणाऱ्या, भारताबद्दल आस्था असणाऱ्यांना नागरिकत्व मिळणार

 

विरोधकांनी खोटं पसरवलं, Sc/st आरक्षणाबाबत संभ्रम निर्माण केला, मात्र आम्ही सर्वांना दाखवून दिलं, दलित, ओबीसी, आदिवासींचं कोणीही काहीही घेऊ शकणार नाही, उलट आम्ही 10 टक्के अधिक आरक्षण दिलं, विरोधकांना लोकसभेने सणसणीत चपराक दिली

 

संविधान दुरुस्ती विधेयकाला काल लोकसभेत काहींनी विरोध केला, मात्र आज राज्यसभेतही सकारात्मक चर्चा करुन, लोकसभेप्रमाणेच सुखद निर्णय व्हावा अशी आशा करतो

 

सोलापूरच्या धरतीवरुन देशाचं अभिनंदन करु इच्छितो, काल रात्री लोकसभेत ऐतिहासिक विधेयक पास झालं, सामान्य गरिबांना 10 टक्के आरक्षण देऊन, सबका साथ सबका विकास करण्याचं काम आणखी मजबूत केलं

 

सोलापूर-तुळजापूर- उस्मानाबाद रेल्वेमार्गाला मंजुरी दिलीय, तुळजाभवानीच्या आशिर्वादाने ही रेल्वेलाईन लवकरच तयार होईल

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI