बॉलीवूडमध्ये पदार्पण करताच प्रिया प्रकाश ट्रोल

बॉलीवूडमध्ये पदार्पण करताच प्रिया प्रकाश ट्रोल


मुंबई : एका छोट्याश्या व्हिडीओने रात्रभरात इंटरनेट सेंसेशन झालेली मल्याळम अभिनेत्री प्रिया प्रकाश वारीयर बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे. प्रिया ‘श्रीदेवी बंग्लो’ या सिनेमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे. प्रिया ही तिच्या पहिल्या ‘ओरु अदार लव’ या सिनेमाच्या टीझरमध्ये तिच्या दिलखेच अदांमुळे रात्रभरात लोकप्रिय झाली होती. तरुणांमध्ये कित्येक दिवस तिच्या त्या भुवई उंचावणाऱ्या आणि डोळा मारणाऱ्या व्हिडीओची चर्चा होती. यामुळे इंस्टाग्रामवर प्रियाच्या फॉलोअर्समध्येही वाढ झाली होती.

आता प्रियाचा आगामी सिनेमा ‘श्रीदेवी बंग्लो’चा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. हा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर प्रिया प्रकाशला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे. याचं कारण म्हणजे या सिनेमाची काही दृष्य. ‘श्रीदेवी बंग्लो’चा टीझर बघून हे लक्षात येतं की, हा सिनेमा सुपरस्टार श्रीदेवी आणि त्यांच्या मृत्यूवर आधारित आहे. मात्र या सिनेमाच्या टीझरमध्ये श्रीदेवीला कुठल्याही प्रकारची आदरांजली वाहण्यात आलेली नाही, तसेच हा सिनेमा श्रीदेवींच्या मृत्यूवर आधारित असल्याचं कुठेही स्पष्ट करण्यात आलेलं नाही. यामुळे प्रिया प्रकाशला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे.

या सिनेमाच्या टीझरमध्ये एक सुपरस्टार दाखवण्यात आली आहे, जी एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे, संपूर्ण जगभरात तिचे चाहते आहेत. या अभिनेत्रीचं नाव श्रीदेवी आहे. ती एक प्रसिद्ध अभिनेत्री असली तरी ती तणावाखाली आहे. याच दरम्यान ती मद्यपान करते आणि त्यानंतर बाथटबमध्ये बुडून तिचा मृत्यू होतो.

ही कहानी अभिनेत्री श्रीदेवी यांच्या जीवनावर आधारित असल्याचं या टीझरमधून दिसून येते.

जेव्हा प्रिया प्रकाशला हा सिनेमा श्रीदेवींच्या जीवनावर आधारित असण्यासंबंधी प्रश्न विचारण्यात आले, तेव्हा ‘हा सिनेमा त्यांच्या जीवनावर आधारित आहे की नाही, हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला सिनेमा पाहावा लागेल. मी तर यात केवळ एका सुपरस्टारची भूमिका साकारते आहे, जिचे नाव श्रीदेवी आहे’, असे प्रिया प्रकाशने सांगितले.

आता हा सिनेमा खरंच श्रीदेवींच्या जीवनावर आधारित आहे की नाही, हे तर सिनेमा प्रदर्शित झाल्यावरच कळू शकेल.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI