वाशिममध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनोखी जनजागृती

जगभर थैमान घालत असलेल्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आगामी धुलिवंदनामध्ये नैसर्गिक रंग खेळण्यासंदर्भात प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे.

वाशिममध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनोखी जनजागृती

वाशिम : जगभर थैमान घालत असलेल्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आगामी धुलिवंदनामध्ये नैसर्गिक रंग खेळण्यासंदर्भात प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे (Promotion of Natural colour due to corona). त्याअनुषंगाने वाशिम जिल्ह्यातील मालेगाव ‘हॅपी फेसेस द कॉन्सेप्ट स्कूल’ येथे विद्यार्थ्यांना नैसर्गिक रंग निर्मितीचे प्रशिक्षण देण्यात आलं. यावेळी रासायनिक रंगांचा चेहरा आणि त्वचेसाठी असणाऱ्या अत्यंत घातक परिणामांची माहितीही देण्यात आली.

वसंत ऋतूत बहरणारा पळस आणि निसर्गातील इतर उपलब्ध फुलांपासून विद्यार्थ्यांनी रंग बनवून धुलिवंदनासाठी नैसर्गिक रंग वापरण्याचा संकल्प केला. यावेळी शालेय शिक्षक राम धनगर आणि अनिल गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना निरनिराळ्या फुलांपासून विविध रंग बनवण्याचे प्रात्यक्षिक करुन दाखवले.

रंगीबेरंगी फुलांपासून नैसर्गिक रंग निर्माण करण्यासंदर्भात प्रात्यक्षिकांसह शिक्षक राम धनगर यांनी माहिती दिली. ते म्हणाले, “वसंत ऋतू आणि त्यासोबत झाडांची पानगळ देखील सुरु झाली. किंबहुना, काही दिवस आधीच ही पानगळ सुरु होते. वसंत ऋतू सुरु झाला की जंगलामध्ये वेगवेगळ्या रंगाची फुले फुलायला लागतात. जणू रंगांची उधळणच सुरू होते. आपल्या जंगलामध्ये भगव्या रंगाची उधळण करत पळस फुलायला लागतो. याचे शास्त्रीय नाव बुटिया मोनोस्पर्मा (Butea monosperma) असं आहे. झुडूप किंवा वृक्ष वर्गात याचा समावेश होतो. भारतातील सगळ्या वर्षां वनात/पानझडीच्या वनात पळस सहज आढळणारी वनस्पती आहे. शहरात मात्र पळस तसा फारसा पाहायला मिळत नाही.”

पळसाची फुले झाडाच्या शेंड्यालगत असतात. साधारणपणे पळस जेव्हा फुलतो त्यावेळी पानगळ सुरु असते. उन्हाची लाही लाही होत असताना भगव्या भगव्या ज्वाळा दिसाव्यात तसा पळसाचा फुलोरा दिसतो आणि म्हणूनच ब्रिटिशांनी या फुलांना “Flame of the Forest” असं नाव दिलं. गडद भगव्या रंगाच्या या फुलांचा आकार काहीसा पोपटाच्या चोचीसारखा असतो. फुलाला पाच पाकळ्या असतात. या फुलांना वाळवून त्यापासून नैसर्गिक भगवा आणि लाल रंग तयार करून नैसर्गिक रंगानेच होळी साजरी करावी, असं आवाहन या कार्यशाळेत करण्यात आलं.

चीनमधून सुरु झालेला कोरोना विषाणूचा संसर्ग झपाट्याने जगभरात फोफावत आहे. त्यामुळे चीनमधून येणाऱ्या वस्तूंच्या आयातीवरही निर्बंध आहेत. तरीही खबरदारी म्हणून या विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी होळीला रासायनिक रंगाऐवजी नैसर्गिक रंग वापरण्याचं आवाहन केलं जात आहे. दरम्यान शाळेचे संचालक दिलीप हेडा आणि कविता हेडा यांनी नैसर्गिक रंग निर्मिती कार्यशाळेचं आणि विद्यार्थ्यांनी केलेल्या दृढ संकल्पाचं कौतूक केलं. यावेळी प्राचार्य मिलिंद लाहोटी, उपप्राचार्य विठ्ठल गौरकर समन्वयिका ममता जोशी यांच्यासह शालेय शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

Promotion of Natural colour due to corona

Published On - 9:00 pm, Fri, 6 March 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI