पुण्यातील सर्व उद्यानं बंद होणार, महापौरांच्या पालिका प्रशासनाला सूचना

| Updated on: Jun 16, 2020 | 8:12 AM

कोरोनाचा वाढता संसर्ग आणि पुणेकरांचा बेशिस्तपणा यामुळे अखेर ही उद्याने बंद करण्याची मागणी होत आहे (Pune mayor demand to close all gardens in Pune).

पुण्यातील सर्व उद्यानं बंद होणार, महापौरांच्या पालिका प्रशासनाला सूचना
पुणे महानगरपालिका
Follow us on

पुणे : लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात नागरिकांना काही सवलती देताना पुण्यातील विविध भागातील 31 उद्याने सुरु करण्यात आले. मात्र, कोरोनाचा वाढता संसर्ग आणि पुणेकरांचा बेशिस्तपणा यामुळे अखेर ही उद्याने बंद करण्याची मागणी होत आहे (Pune mayor demand to close all gardens in Pune). स्वतः पुणे महानगरपालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनीच आयुक्तांना पत्र लिहून शहरातील सर्व उद्याने पुन्हा बंद करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे पुण्यातील सुरु असलेले सर्व 31 उद्यानं पुन्हा बंद होण्याची शक्‍यता आहे.

एकिकडे कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे, तर दुसरीकडे कोरोना रुग्णांचे मृत्यूही होत आहेत. त्यामुळे अशा स्थितीत उद्यानं उघडून काय साधायचं आहे? असा सवाल महापौर मोहोळ यांनी केला आहे. मोहोळ यांनी उद्यानं बंद करण्याच्या मागणीवर महानगरपालिका प्रशासन आज अंतिम निर्णय घेण्याची शक्यता आहे.

अनलॉक 1 नावाने लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात नागरिकांना काही बंधनं घालून उद्यानं आणि मैदानं खुली करण्यात आली. मात्र, नागरिकांकडून योग्य काळजी घेतली जात नसल्याचे दिसून आले. उद्यानात येणाऱ्या नागरिकांवर लक्ष ठेवण्यासाठी कर्मचारी नेमावे लागले. आधीच अपुरे कर्मचारी असताना गरजेच्या नसलेल्या बाबींना प्राधान्य नको, अशी भूमिका घेत महापौर मुरलीधर मोहोळ यांनी उद्याने बंद करण्याचा आग्रह धरला आहे. त्यांनी महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांना तसे पत्रही देऊन आदेश काढण्याची मागणी केली आहे. या पार्श्‍वभूमीवर उद्यान खात्यातील अधिकाऱ्यांसह चर्चा करून आज निर्णय घेतला जाणार आहे.

‘कंटेनमेंट झोनमधील 15 परिसरात नवे रुग्ण नाही, 66 पैकी 15 कंटेन्मेंट झोन कमी’

कंटेनमेंट झोनमधील 15 परिसरात गेल्या काही दिवसांत नवे रुग्ण आढळले नाहीत आणि जुने रुग्ण बरे झालेत. त्यामुळे हे 15 परिसर आता कंटेन्मेंट झोनमधून वगळण्यात येणार आहेत. रुग्ण सापडून त्यांची संख्या वाढलेल्या 5 ते 6 परिसरांचा मायक्रो कंटेन्मेंट झोनमध्ये समावेश होणार आहे. याबाबतचे आदेश आज काढले जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, कंटेन्मेंट झोन आणि त्याबाहेरील हद्दीत आता सुरु असलेली दुकानेच सुरु राहणार आहेत. नव्याने काही व्यवहार सुरु करण्याच्या हालचाली तुर्तास तरी नाहीत, असे महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

शहरातील गेल्या 15 दिवसांमधील कोरोना संसर्गाचा आढावा घेण्यासाठी महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी बैठक झाली. त्यात विशेषतः कंटेन्मेंट झोन कमी करण्याचा निर्णय झाल्याचे सांगण्यात आले. रुग्ण संख्या पाहून कंटेन्मेंट झोन कमी-अधिक केला जात आहे. या पार्श्वभूमीवर सध्याच्या 66 पैकी 15 कंटेन्मेंट झोन कमी करून त्याठिकाणचे किमान व्यवहार सुरु करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. तर, याच काळात काही परिसरात रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे अशा 5 परिसरात नव्याने बंधने लादली जाणार आहेत.

हेही वाचा :

Maharashtra Police | मुंबईत तीन तर पुण्यात एका पोलिसाचा कोरोनामुळे मृत्यू

Pune | पुण्यात परप्रांतीय प्रवाशी, मजुरांचा ओघ, 15 दिवसात 13 हजार परप्रांतीय दाखल

Pune mayor demand to close all gardens in Pune