पेस्ट कंट्रोलनंतर हलगर्जी जीवावर, पुण्यात दाम्पत्याचा मृत्यू

पेस्ट कंट्रोल करणाऱ्या व्यक्तीने जी काळजी घ्यायला सांगितली होती, ती मजली दाम्पत्याने घेतली नसल्याचा दावा केला जात आहे.

पेस्ट कंट्रोलनंतर हलगर्जी जीवावर, पुण्यात दाम्पत्याचा मृत्यू

पुणे : घरात पेस्ट कंट्रोल केल्यानंतर दाखवलेली हलगर्जी पुण्यातील दाम्पत्याच्या जीवावर बेतली आहे. पेस्ट कंट्रोलनंतर दारं-खिडक्या बंद करुन घरात बसल्यामुळे दोघांचा मृत्यू (Pune Pest Control Couple Death) झाला.

घरात पेस्ट कंट्रोल केल्यानंतर काळजी घेण्याचा सल्ला नेहमी दिला जातो, मात्र याकडे दुर्लक्ष केल्याने जीव गमवावा लागण्याच्या घटना याआधीही समोर आल्या आहेत. पुण्यात बिबवेवाडी परिसरातील गणेश विहार सोसायटीतही असाच प्रकार घडला.

64 वर्षीय अविनाश सदाशिव मजली आणि त्यांची 54 वर्षीय पत्नी अपर्णा अविनाश मजली यांचा मृत्यू झाला. मजली दाम्पत्याने मंगळवारी सकाळी 9 वाजता घरात पेस्ट कंट्रोल करुन घेतलं होतं. त्यानंतर दोघंही 11 वाजताच्या सुमारास मजली यांच्या मोठ्या भावाच्या घरी गेले. घरात पेस्ट कंट्रोल केल्याची माहिती त्यांनी भावाला दिली होती.

त्याच दिवशी संध्याकाळी सात वाजताच्या सुमारास दोघंही पुन्हा आपल्या घरी परतले. मात्र पेस्ट कंट्रोल करणाऱ्या व्यक्तीने जी काळजी घ्यायला सांगितली होती, ती मजली यांनी घेतली नसल्याचा दावा केला जात आहे. दारं-खिडक्या बंद करुन, फॅन न लावता दोघंही घरात टीव्ही पाहत बसले.

काही वेळाने दोघंही घरात चक्कर येऊन पडले. मजली यांची 21 वर्षीय कन्या श्रावणी मजलीने दोघांना सह्याद्री रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. मात्र उपचारापूर्वीच दोघांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं. या प्रकरणी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली (Pune Pest Control Couple Death) आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI