गोपीनाथ मुंडेंचा मृत्यू नेमका कसा झाला? रवीशंकर प्रसाद यांनी सविस्तर सांगितलं

गोपीनाथ मुंडेंचा मृत्यू नेमका कसा झाला? रवीशंकर प्रसाद यांनी सविस्तर सांगितलं


नवी दिल्ली: अमेरिकेतील हॅकरने लंडनमध्ये केलेल्या दाव्यांमुळे भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूबाबत देशभरात खळबळ उडाली आहे. ईव्हीएम हॅकिंगची माहिती असल्यामुळे गोपीनाथ मुंडे यांची हत्या झाली, असा दावा हॅकरने केला. हॅकरच्या या दाव्यानंतर भाजपने पत्रकार परिषद घेऊन त्याला उत्तर दिलं. केंद्रीय माहिती तंत्रज्ञान आणि कायदे मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी हॅकरचे दावे खोडून काढलेच, शिवाय खळबळ उडवून देणं हे काँग्रेसचं षडयंत्र असल्याचा आरोपही केला.

मुंडेंचा मृत्यू घातपात नाही
यावेळी रवीशंकर प्रसाद यांनी गोपीनाथ मुंडे यांचा मृत्यू घातपात नसल्याचा दावा केला. रवीशंकर प्रसाद म्हणाले, “गोपीनाथ मुंडेंचे निधन कार अपघातात झालं. शवविच्छेदन अहवाल अर्थात पोस्टमोर्टम केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांच्या डोक्याच्या मागील बाजूस लागल्याचं सांगितलं होतं. गोपीनाथ मुंडे आमचे मोठे नेते होते, त्यांच्याबाबत अशाप्रकारचा आरोप करणं अशोभनीय आहे.

“शपथग्रहणानंतर गोपीनाथ मुंडे यांचं दिल्लीत कार अपघातात निधन झालं. सुधीर गुप्ता या एम्सच्या डॉक्टरांनी त्यांचं पोस्टमॉर्टम केलं. त्यांनी स्वत: 2 टीव्ही चॅनल्सवर सांगितलं होतं की मी त्यांचं पोस्टमॉर्टम केलं. गोपीनाथ मुंडे यांचा मृत्यू कार अपघातात त्यांच्या मानेला दुखापत झाल्याने झाला”. – रवीशंकर प्रसाद

गोपीनाथ मुंडे यांचं निधन

केंद्रीय ग्रामविकास मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या गोपीनाथ मुंडे यांचं 3 जून 2014 रोजी कार अपघातात निधन झालं होतं. गोपीनाथ मुंडे हे दिल्लीतून महाराष्ट्राकडे येण्यासाठी विमानतळाकडे निघाले होते. त्यावेळी दिल्लीतील मोतीबाग परिसरात समोरुन येणाऱ्या इंडिका कारने त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. गाडीच्या मागील सीटवर बसलेल्या गोपीनाथ मुंडेंना जबर मार बसला. त्यानंतर गंभीर जखमी झालेल्या मुंडेंवर एम्समध्ये उपचार सुरु होते.  गोपीनाथ मुंडेंना हृदयविकाराचा झटाकाही आला होता. त्यानंतर सकाळी आठ वाजता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं होतं.

कसा झाला अपघात? 3 जून 2014 मधील माहिती

  • गोपीनाथ मुंडे सकाळी मुंबईला येण्यासाठी विमानतळाकडे निघाले
  • मोतीबाग परिसरात सकाळी 6.20 वाजता त्यांच्या गाडीला समोरुन येणाऱ्या इंडिका कारने धडक दिली
  • गाडीत मुंडे ज्या बाजूला बसले होते, त्याच बाजूला इंडिकाने जोरदार धडक दिली
  • धडकेनंतर मुंडे गाडीतच पडले
  • त्याचवेळी गोपीनाथ मुंडेंना हृदयविकाराचा झटका आला
  • दिल्लीतील एम्समध्ये मुंडेंचं निधन झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली

काँग्रेसने देशाचा अपमान केला
दरम्यान, काँग्रेसने देशाचा अपमान केल्याचा आरोप रवीशंकर प्रसाद यांनी यावेळी केला. “या संपूर्ण प्रकारामुळे देशाच्या 2014 च्या जनमताचा अनादर झाला आहे.  देशातील 90 कोटी जनतेचा हा अपमान आहे. 2014 च्या निवडणुकीपूर्वी यूपीए सरकार केंद्रात सत्तेत होतं. सत्तेत नसताना आम्ही निवडणूक आयोगावर निर्बंध लादले हा आरोप चुकीचा आहे”, असं रवीशंकर प्रसाद म्हणाले.

संबंधित बातम्या

EVM हॅकिंगचा लंडनमध्ये काँग्रेसकडून राजकीय स्टंट : भाजप 

मुंडेंबाबत खळबळजनक दावा करणारा हॅकर सय्यद शुजा नेमका कोण आहे?

‘रॉ’ म्हणजे नेमकं काय?

 गिरीश महाजनांनी वायफायने ईव्हीएम हॅक केल्याचा आरोप 

सुप्रिया सुळेंच्या दोन मागण्या, मुंडेंच्या मृत्यूची सीबीआय चौकशी नको आणि….

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI