“लढून मरावं, मरुन जगावं, हेच आम्हाला ठावं”, मराठा आरक्षणावर संभाजीराजेंचं युवकांना आत्महत्या न करण्याचं आवाहन

संभाजीराजेंनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन युवकांनी आत्महत्येचा निर्णय घेऊ नये असं आवाहन केलंय (Sambhajiraje Chhatrapati on Beed Maratha youth suicide on reservation).

"लढून मरावं, मरुन जगावं, हेच आम्हाला ठावं", मराठा आरक्षणावर संभाजीराजेंचं युवकांना आत्महत्या न करण्याचं आवाहन

मुंबई : बीड जिल्ह्यातील विवेक कल्याण राहाडे या मराठा समाजातील तरुणाने आरक्षण न मिळाल्याने शिक्षणापासून वंचित राहिल्यामुळे नैराश्यातून आत्महत्या केल्याची घटना घडली. त्यानंतर राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. खासदार संभाजीराजे यांच्यासह शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे आणि भाजप नेते निलेश राणे यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. संभाजीराजेंनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन युवकांनी आत्महत्येचा निर्णय घेऊ नये असं आवाहन केलंय (Sambhajiraje Chhatrapati on Beed Maratha youth suicide on reservation). विनायक मेटेंनी मात्र हा आघाडी सरकारच्या निष्क्रियतेचा बळी असल्याचा आरोप केला आहे.

खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले, “बीडमधील विवेक राहाडे या युवकाने समाजासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली. त्यांच्या परिवारासोबत आमच्या संवेदना आहेत. घरातील कर्तृत्वाला आलेला युवक असा अकाली जाणं, ही कधीही न भरुन निघणारी हानी आहे. मी त्यांच्या दुःखात सहभागी आहे. मराठा आरक्षणाची अटीतटीची लढाई आपण लढत आहोत. कोणत्याही परिस्थितीत हा लढा असाच चालू राहिल. मला विश्वास आहे की आपण नक्की जिंकू! हा लढा सुरु असताना युवकांनी आत्महत्या करु नयेत. आत्महत्या हा पर्याय अजिबात नाही.”

“एक लक्षात ठेवा हा समाज, ‘लढून मरावं, मरुन जगावं, हेच आम्हाला ठावं’, असे पोवाडे गाणारा आहे. माझ्या शूर सरदारांनो खचून जाऊ नका. आज परिस्थिती जरी आपल्या विरोधात वाटत असली, अंधारात जात असलेली वाटत असली तरी, उद्या नक्की पहाट होईल. सर्व काही ठीक होईल. आपण लढाई जिंकूच! माझ्या निडर वाघांनो तुम्हीच जर असे हतबल होऊन आत्मबलिदान देणार असाल, तर मला चांगलं वाटणार आहे का? या लढाईतील प्रत्येक मावळा माझ्यासाठी लाखमोलाचा आहे. सर्वांना माझी नम्र विनंती आहे कोणीही असे पर्याय निवडू नयेत. समाजासाठी बलिदान दिलेल्या या मावळ्याला विनम्र श्रध्दांजली,” असं म्हणत संभाजीराजेंनी संबंधित युवकाला श्रध्दांजली वाहिली.

“ही आत्महत्या म्हणजे आघाडी सरकारच्या निष्क्रियतेचा बळी”

शिवसंग्राम प्रमुख विनायक मेटे यांनी ही आत्महत्या म्हणजे आघाडी सरकारच्या निष्क्रियतेचा बळी असल्याची तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. भाजपचे नेते निलेश राणे यांनी देखील विवेक राहाडे आत्महत्येवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले, “मराठा आरक्षणासाठी आणखी एक तरुण भावाचे आत्मबलिदान. बीड जिल्ह्यातील विवेक कल्याण रहाडे या आपल्या तरुण बांधवाने आरक्षण न मिळाल्यामुळे आत्महत्या केली.”

विवेक राहाडे आत्महत्या प्रकरणानंतर बीड जिल्ह्यातील केतुरा गावात विषण्ण वातावरण आहे. वातावरण बिघडू नये म्हणून केतुरा गावात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यामुळे गावाला पोलीस छावणीचे स्वरुप आले आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांकडूनही विवेक राहाडे या तरुणाच्या कुटुंबियांच्या भेटीगाठी सुरु आहेत.

हेही वाचा :

Maratha Reservation | संभाजीराजेंच्या भूमिकेला पहिला थेट विरोध, सुरेश पाटील यांचं रोखठोक मत

आम्हाला EWS मध्ये आरक्षण नको, संभाजीराजेंची भूमिका, मुख्यमंत्र्यांकडून तात्काळ आदेश जारी

मराठा आरक्षणाचा पेच सोडवण्यात ओबीसी समाज सहकार्य करेल, संभाजीराजेंना ओबीसी नेत्यांचा शब्द

Sambhajiraje Chhatrapati on Beed Maratha youth suicide on reservation

Published On - 11:35 am, Thu, 1 October 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI