शक्तिकांत दास आरबीआयचे नवे गव्हर्नर

शक्तिकांत दास आरबीआयचे नवे गव्हर्नर

मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नरपदाचा उर्जित पटेल यांनी राजीनामा दिल्यानंतर, त्या पदावर शक्तिकांत दास यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शक्तिकांत दास हे 2015 ते 2017 या काळा केंद्रीय अर्थ मंत्रालयाचे सचिव होते. नोव्हेंबर 2016 मध्ये लागू केलेल्या नोटाबंदीच्या निर्णयातही शक्तिकांत दास यांची भूमिका महत्त्वाची होती. ते 15 व्या वित्त आयोगाचे सदस्यही होते.

शक्तिकांत दास यांचा आरबीआयचे गव्हर्नर म्हणून तीन वर्षांचा कार्यकाळ असेल. दास हे अर्थमंत्री अरुण जेटली यांचे निकटवर्तीय समजले जातात. जेटली यांनी अनेकदा दास यांच्या कामाचं कौतुक केले आहे. 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटाबंदी लागू करण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीसंदर्भात अभ्यास करण्यासाठी जी टीम तयार केली होती, त्यातील शक्तिकांत दास हे महत्त्वाचे अधिकारी होते. नोटाबंदीनंतर लहान-मोठे बदल, घोषणाही शक्तिकांत दास हेच करत असत. नोटाबंदी नेमकी काय आहे, हेही जनतेला माध्यमांमधून दास यांनीच समजावून सांगितले होते.

26 फेब्रुवारी 1957 रोजी ओडिसामध्ये जन्मलेले शक्तिकांत दास हे 1980 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. 35 वर्षांच्या भारतीय प्रशासकीय सेवेत त्यांनी टॅक्स, इंडस्ट्री आणि आर्थिक विषयाशी संबंधित विभागांमध्ये महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. ते आता निवृत्त झाले आहेत. मात्र, आता त्यांच्यावर आरबीआयच्या गव्हर्नरपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI